खेळकर वातावरणात काम | पुढारी

खेळकर वातावरणात काम

आज सर्वत्रच स्त्रिया नोकरी करताना दिसतात. नोकरी करणार्‍या महिलांचा दिवसभरातील आठ तासांपेक्षा जास्त वेळ हा ऑफिसमध्येच जातो. ऑफिसमधील काम करत असताना ताण हा येतोच. त्यातल्या त्यात स्त्रियांना घरातील जबाबदारी आणि ऑफिसमधील काम या दोन्ही जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. हे करत असताना थोडी कसरत होते. (working women)  हे करत असताना चांगली सहकारी सिद्ध करण्याची जबाबदारी प्रथम तुमची आहे.

घरातील राग ऑफिसमध्ये काढणे किंवा सहकार्‍यांबद्दलची नाराजी आपल्या बोलण्यातून दाखवणे, फोन आपटणे किंवा रागाने बोलणे असे केल्याने ऑफिसमधील वातावरण डिस्टर्ब होते. तुमच्याविषयी गैरसमज वाढत जातो. ताणतणाव वाढतो आणि याचा परिणाम तुमच्या करिअरवर होतो. आरोग्यावरही होतो. हे तोटे सहन करण्यापेक्षा खेळकर वातावरण ठेवणे अधिक उत्तम.

ऑफिसवर्क हे टीमवर्क असते. तुमचे तुमच्या सहकार्याशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्याशिवाय तुमचे काम उत्कृष्ट होऊ शकत नाही. तुमच्या स्त्री/पुरुष सहकार्‍यांबद्दलची तक्रार किंवा काही राग असेल तर तो तुम्ही सरळ सरळ सामंजस्याने व्यक्त करा. त्यांच्याही तुमच्याबद्दलच्या तक्रारी शांतपणे ऐकून घ्या. मग तुमचे म्हणणे पटवून द्या. यामुळे वातावरण निवळेल. खेळकर राहील. तुम्हाला काम करणे सोपे जाईल.

संबंधित बातम्या

स्त्री म्हणून डावलले जाते, मला माझ्या कुवतीप्रमाणे काम मिळत नाही, अशी तक्रार न करता, तुम्ही तुमची कुवत सिद्ध करा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया आहेत. त्यांना म्हणावा तसा वाव मिळतो. त्यामुळे तणाव निर्माण न करता सर्वांशी हसत खेळत राहा. नेहमी डोकं शांत ठेवून काम करावे. पतीशी किंवा मित्राशी किंवा घरातील कोणत्याही भांडणाचा परिणाम तुमच्या ऑफिसमधील कामावर होणार नाही, याची खबरदारी घ्या. कारण ही सर्व नाती सांभाळून तुम्हाला ऑफिसमध्ये एक यशस्वी कर्मचारी म्हणून सिद्ध करायचे असते. त्यामुळे जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला तर अनेक समस्या हातोहात सुटतात.

 

Back to top button