मुलांना शिस्त कशी लावायची? | पुढारी

मुलांना शिस्त कशी लावायची?

शिस्त आपल्याला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर फायद्याचीच ठरते. यश मिळवण्यासाठी शिस्त असणे गरजेचे असते. मुलांनाही शिस्तीचे पाठ शिकवले, तर ते त्यांच्या चांगल्यासाठीच असते; मात्र मुलांना शिस्त लावायची असेल, तर आधी स्वत:ला काही प्रमाणात का होईना शिस्त असणे गरजेचे आहे.

काही बाबतीत आपल्याला शिस्त नसेलही कदाचित; पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांसमोर शिस्तीने वागा. वास्तविक मुले आपल्या आई-वडिलांच्या सवयींचे बर्‍याचदा अनुकरण करतात. ते जे काही करताना मुले पाहतात, ते ते करतात. म्हणूनच लहान मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टींमध्येही शिस्तीने वागा.

अनेक वेळा मुले कितीही समजावले, तरी ऐकत नाहीत. दंगामस्ती करतात, खोड्या करतात. काही ना काही गडबड करत राहतात. अगदी उच्छाद मांडतात. वस्तूंचे महत्त्व समजून न घेता त्यांचा खेळखंडोबा करतात. मुलांना वस्तूंचे महत्त्व समजून देण्यासाठी काही वेळा ती वस्तू त्यांच्याकडून काढून घ्या आणि त्यांना सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. त्या वस्तूशिवाय त्यांचे अडते आहे, हे त्यांच्या लक्षात आले की, मग ती वस्तू सांभाळायची कशी, हे नीट समजावून देऊन त्यांना ती परत करा. मुलांना शिस्तीचे महत्त्व कळण्यासाठी काही वेळा त्यांना दिल्या जाणार्‍या सवलतीही काढून घ्या. या सवलती मिळाल्या नाहीत, तर त्यांना त्यांचे महत्त्व लक्षात येईल.

मुलांना शिस्त लावण्याच्या नादात त्यांच्याशी प्रमाणाबाहेर कठोर आणि कडक वागू नका. लहान मुले दंगामस्ती करणारच हे लक्षात घ्या. त्यांच्यातला खोडकरपणा प्रमाणाबाहेर वाढणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी, तसेच शिस्तीच्या बडग्याखाली मुलांची मने कोमेजून जाणार नाहीत, याचीही दक्षता घ्यायला हवी. म्हणूनच एखादे काम मुले तुम्ही सांगितलेल्या नियमांनुसार करत असतील, तर त्याबद्दल त्याला शाबासकी द्या. तसे प्रोत्साहन त्यांना मिळाले, तर ती आणखी शिस्तीने वागायचा प्रयत्न करतील.

मुलांना शिस्त लावताना त्यांच्यावर रागावून चालणार नाही. रागाच्या भीतीने मुले तुमचे ऐकतील; पण कुठेतरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल, हे लक्षात घ्या. त्यातून मुलांना गोष्टी लपवण्याची सवय लागते आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यालाच घातक वळण लागण्याचा धोका असतो. म्हणूनच मुलांना शिस्त लावताना स्वत:चा राग काबूत ठेवणे गरजेचे असते. स्वत:वर ताबा ठेवलात, तर मुलांना तुम्ही समजून घेऊ शकाल आणि त्यांना समजावूही शकाल. शिस्त लावण्यासाठी मुलांना धाक दाखवणे, मारहाण करणे आजिबात योग्य नाही. यामुळे भावनिकद़ृष्ट्या मुले कमजोर होतील आणि तुमच्यापासून दूरही जातील. काही चूक केल्यास त्याची शिक्षा म्हणून मुलांना कधीही मारू नका.

Back to top button