टाळा अनावश्यक खर्च | पुढारी

टाळा अनावश्यक खर्च

आपले महिन्याचे बजेट बनवून पैसे खर्च करावे, असा सल्ला नोकरदार महिलेला अथवा गृहिणीलाही देण्याची गरज नाही; पण बजेट बनवले तरीही काहीवेळा असे होते, की सगळे पैसे खर्च होतात आणि नंतर ते कुठे खर्च झाले याबाबत आपण विचार करत बसतो. असे होऊ नये म्हणून आपल्या लहान आणि साधारण खर्चांवर लक्ष द्यावे. यामुळे आपण जवळील पैशांबाबत अधिक जागरूक राहू शकतो. दैनंदिन जीवनात बर्‍याचदा आवश्यकता नसणार्‍या गोष्टींसाठी आपण पैसे खर्च करतो. त्याकडे आपले लक्ष जात नाही. या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास महिना संपला, तरीही आपली पर्स भरलेली राहील.

बर्‍याच महिला आपले आवडते कपडे धुण्यासाठी ड्रायक्लिनिंगला पाठवतात. एका ड्रेससाठी 40 रुपयांहून अधिक खर्च होतो. ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा. बाजारात आज अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आपण घरीच कपड्यांना ड्रायक्लिनिंगसारखी चमक आणू शकतो. या उत्पादनांचा वापर करून 100 रुपयांत आपण 20 कपडेही धुवू शकतो. अशी उत्पादने जवळच्या दुकानात सहज मिळू शकतात.

अलीकडे प्रत्येक व्यक्तीला फिट व्हायचे असते. त्यासाठी जीम मेंबरशीप घेतली जाते. एकदा मेंबरशीप घेतली म्हणजे जीमला गेले नाही तरीही एक-दोन हजार रुपये महिना द्यावेच लागतात. हा खर्च टाळून नियमितपणे जवळच्या बागेत सकाळी किंवा सध्याकाळी जॉगिंग करता येऊ शकते. तेथे अनेक नवी माणसे तर भेटतीलच; पण त्याचबरोबर शुद्ध हवादेखील मिळेल. शिवाय यासाठी कुठलेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

संबंधित बातम्या

आपल्या मित्र-मैत्रणींसोबत जेवण घेणे कोणाला आवडत नाही. अशा वेळी हॉटेलमध्ये गेल्यानंतर येणारे मोेठे बिल नियंत्रणात आणता येऊ शकते. त्यासाठी संपूर्ण जेवणाऐवजी कधी कधी स्नॅक्सही खावे. यामुळे थोडेफार पैसे नक्कीच वाचतील. रात्रीच्या जेवणाऐवजी दुपारच्या जेवणाला मैत्रिणींसोबत जावे. ते थोडेसे स्वस्त पडते. आणखी खर्च कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे बिले वेळेवर भरणे होय. व्यस्ततेमुळे बर्‍याचदा फोन बिल, इलेक्ट्रीक बिल अंतिम तारखेपर्यंत भरत नाही आणि त्यानंतर लेट फी सोबत पैसे भरतो. यामुळे आपल्याच खिशातील जास्तीचे पैसे जातात. असे होऊ नये म्हणून दिलेल्या मुदतीतच आठवणीने बिल भरावे.

बरेचजण ऑफिसला गेल्यावर तेथील कँटिनमध्ये किंवा जवळच्या हॉटेलमध्ये जेवण घेतात. त्याऐवजी घरूनच डबा घेऊन गेल्यास बरेचसे पैसे वाचू शकतात. यामुळे घरातील चांगले अन्नही खाण्याची संधी मिळेल. ऑफिसमधील काहीजण एकत्रपणे डबा खायला बसले तर वेगवेगळ्या पदार्थांची चवही चाखायला मिळेल. तसेच वारंवार चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर तिही बदलावी. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहेच; पण चहा-कॉफीसाठी खर्च केलेल्या पैशांचा हिशेब महिन्याकाठी केल्यास तो आकडा बघून आश्चर्य वाटेल. हा खर्च सहज टाळता येण्यासारखा आहे. अशाप्रकारे छोट्या छोटया कृतींद्वारे आणि थोडेसे सजग राहून आपण अनावश्यक खर्च नक्कीच टाळू शकतो.

Back to top button