हाताला सजवणारे दागिने | पुढारी

हाताला सजवणारे दागिने

मुळातच स्त्रीसुलभ स्वभाव नटणे, मुरडणे, शृंगार करणे याला प्राधान्य देतो. त्यात कोणताही दागिना हा आवडीचाच ठरतो. स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये नेकलेस, राणीहार, कोल्हापुरी साज, ठुशी, कमरपट्टा, अंगठी, इयररिंग्ज, नथ, बांगड्या, तोडे असे किती दागिने? घालावे तेवढे थोडेच. या सर्व दागिन्यांची फॅशन काहीवेळा जुनी होते; पण तीच फॅशन काही वर्षांनी पुन्हा नवीन ढंगात आणि नव्या थाटात येते. मग काय स्त्रियांनाही हा दागिना घडवण्याचा मोह आवरतच नाही.

वरील दागिन्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा दागिना राहून गेला, तो म्हणजे हाथफूल. (पूर्वीच्या काळी त्याला बिंदल्या म्हणत असत. लहान बाळासाठी हा दागिना केला जात असे.) हे हाथफूल पूर्वी राजघराण्यातील स्त्रियांच्या हातामध्ये दिसत असे. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारच्या दागिन्यांचा समच्चुय पाहायला मिळतो. डोके, कान,नाक, गळा, हात, पाय, कंबर अशा शरीराच्या अनेक भागांना त्या त्या दागिन्यांनी सजवले जायचे. तसाच हा हात सजवण्यासाठीचा हातफूल.

पूर्वी जसा राजघराण्यात हा दागिना असायचा तसा आता बिंदी आणि हातफूल नववधूच्या हातात दिसतो. लग्नामध्ये वधूचा हात मेंदीशिवाय या हाथफुलानेही सजवला जातो. पूर्वीपेक्षा हा हातफूल आता मोठ्या आकारात असल्याने हा सोन्या-चांदीपेक्षा इमिटेशन ज्युलरीमध्येच अधिक प्रमाणात पहायला मिळतो. असे असले तरी आजही अनेक राजेशाही किंवा उद्योगपतींच्या लग्नसमारंभात सोन्याचे हाथफूल सजलेले दिसते. हे हाथफूल म्हणजे तीन, दोन किंवा पाच अंगठ्या आणि त्याला जोडूनच बांगडी किंवा ब्रेसलेट.

संबंधित बातम्या

एकूणच काय हा दागिना परिधान केला की वधूचा कोमल हात अजून सुंदर आणि उठावदार दिसण्यास मदत होते. इमिटेशन प्रकारात कुंदन, जडाऊ, ऑक्सिडाईड, बीडेड किंवा फक्त चेन असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सोन्याच्या हातफुलामध्ये लहान फुले, खडे, रत्न जडवलेली पहायला मिळतात. लग्नाच्या दिवशी वापरल्यावर नंतर त्याचा फारसा वापर होत नसल्यामुळे सोन्यापेक्षा इमिटेशन हाथफूल घेण्याकडेच अलीकडे कल वाढलाय. (दागिना )

Back to top button