कलाईडीस्कोप : सहवासातील आनंद   | पुढारी | पुढारी

कलाईडीस्कोप : सहवासातील आनंद   | पुढारी

रसिका, तिला एकंदरीत शरीर बंधाबद्दल, नात्याबद्दल असणार्‍या शंका, याविषयी आपण पाहत होतो. ‘या सहवासातील आनंद म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न तिने केला व त्यावर तिला मी काही प्रश्न विचारले.हे प्रश्न विचारल्यानंतर ती जराशी अंतर्मुख झाली आणि तिने एक उसासा सोडत काहीतरी खूप आतलं कबूल करावं तसं सांगितलं.

‘डॉक्टर, या विषयांवर इतका विचार मी खरंतर केलेलाच नाही.’ ती पुढे म्हणाली, ‘तुम्ही जे विचारताय त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. माझं लग्न झालं तेव्हा हे स्थळ पाहून, पसंती देऊन-घेऊन केलेलं लग्न असल्याने मी त्याही वेळेस खूप साधा विचार केला होता. इतकाच की, मुलगा एक चांगली नोकरी करतोय. मलाही माझं काम करण्यावर बंदी आणत नाहीये. लग्नानंतर विचार-आचार यांचं स्वातंत्र्य आहे, तर बाकी नाही का म्हणायचं? तसं त्याचं दिसणं मला फारसं आवडलं नव्हतं, किंवा खूप काही आकर्षणही वाटलं नव्हतं. ते हळूहळू एकमेकांच्या सोबतीने तयार होईल हे डोक्यात होतं. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, माझं वाढणारं वय हाही होताच. शिवाय आई-वडील, त्यात त्यांची ढासळणारी तब्येत. इथे कुठेतरी आपलं लग्न जमत नाहीये, होत नाहीये किंवा आपण मुलगे नाकारतोय याचा त्यांच्यावर जास्त परिणाम होतोय का? हा सल मात्र सतत राहत होता. त्यामुळे या स्थळाआधी मी प्रत्येक मुलाचा जितका विचार करायचे ते याच्याबाबत झालं नाही.’ हे रसिकाच्याच बाबत काय, परंतु कित्येक व्यक्‍तींबाबत अगदी सहज घडतं. आपण याच व्यक्‍तीशी लग्न का केलं असावं, हे सांगणं शक्य असेलच असे नाही.

पुढे ती म्हणाली, ‘त्यामुळे मी कधीही स्वतः त्याच्याकडे हे विषय काढले नाहीत किंवा हेही विचारलं नाही, की तुला मी कशी आवडले?  किंवा माझ्यातलं नेमकं काय आवडलं? कारण मला भीती अशी की, जर त्यानेही माझ्यासारखाच विचार करून लग्न केलं असेल, आणि ते त्याने मला, मी विचारल्यानंतर सांगितलं तर मला ते रुचेल का किंवा त्याने किती त्रास होईल? तेव्हा मीही विषय टाळला. हे आता तुम्हाला सांगायचं कारण, मला कधीकधी शंका येते, ती आमच्या दोघांमध्येही असायला हवं तितकं आणि त्या विशिष्ट प्रकारचं आकर्षणच निर्माण झालेलं नसावं का? आणि त्यामुळे तर मला यात काय एव्हढं? असं वाटतंय की काय?’

संबंधित बातम्या

हे सांगून रसिका थोडीशी गहिवरली. तिची शंका रास्तच होती. त्याचं कारण तिला असणारी भीती. स्वतःविषयी जोडीदाराकडून नेमकं काय ऐकायला मिळेल, याबद्दल कुतूहल वाटण्याऐवजी वाटणारी असुरक्षितता किंवा दडपण. यातून तिच्या मनात हे येणं अगदीच स्वाभाविक होतं.

पण तरीही त्यावरचं उत्तर होतं, जोडीदारासोबत संपूर्ण मोकळेपणानं बोलणं! का आणि कसं ते पुढच्या लेखात पाहू!

Back to top button