मन की बात : निरांजनाची ज्योत सांगते…  | पुढारी

मन की बात : निरांजनाची ज्योत सांगते... 

माणसाला आयुष्यात कायम बदल हवे असतात. पूर्वीचे आटोपशीर, साचेबद्ध आयुष्य शिक्षण, औद्योगिक क्रांती, शहरीकरण  यामुळे हळूहळू बदलू लागले. घर, कपडे, खाणे, आचार-विचार, राहणीमान यात खूप सारे बदल होऊ लागले. पाश्चात्य लोकांचे तर अगदी अंधानुकरण करण्यात आपला समाज अग्रेसर होत आहे. पण कधीतरी प्रत्येक माणसाला आपली नाती, गणगोत, संस्कृती याची किंमत उशिरा का होईना; पण पटायला मात्र लागते. हेही नसे थोडके…

तर नुकताच आपला प्रेमदिवसाचा पूर्ण आठवडा जगभरात व अर्थातच आपल्या इथेदेखील युगुलांनी प्रेमात पार तर पाडला! न जाणो पुढील वर्षीपण हीच जोडी राहील की नाही? ही एक साशंकता. पण, आपल्या छोट्या तनुला  हा वीक मात्र आयुष्यभराचा खास आनंद देऊन गेला, हेही तितकेच खरे! तर आपली पाच वर्षांची ही छोटी तनू. ती दोन वर्षांची असताना  तिची आई म्हणजे आपली नायिका राधा आपल्या श्याम नामक नायकाला सोडून आपल्या  दुसर्‍या घरी  राहायला  आली होती. आठवडाभर शाळा, खेळ, पाळणाघर  आणि आई या चक्रात  अडकलेल्या तनुला रविवार मात्र बाबाबरोबर मज्जा करायला मिळायचा. घरी आल्यावर आईने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे न कंटाळता द्यावी लागायची, नाहीतर पुढच्या वेळी आई तिला बाबाकडे पाठवणार नाही, ही एक भीती असायची. 

राधा आणि श्याम आपल्या उच्चवर्गाचे प्रतिनिधी.. राधा आयटी कंपनीत उच्च पदावर, तर श्याम बँकेत मॅनेजर. गलेलठ्ठ पगारामुळे स्वबळ भावना जरा जास्तच वाढीला. कोणत्याही बाबतीत माघार कोण घेणार? हा एक अटीतटीचा प्रश्न असायचा.  कारण आर्थिक  स्थैर्य असल्यामुळे कोणालाच कोणाची फार गरज नाही, ही एक सततची फुशारकी होती. पहिले वर्ष नवी नवलाई आणि मग आपले जॉब प्रोफाईल वाढवण्यात गेले. मग तनू येण्याची चाहूल लागल्यावर ते नऊ महिने पैसा फेको व बायांच्या तालावर नाचो, असे होऊन गेले. खरी मजा तनुच्या जन्मानंतर होऊ लागली. मिळून दोघे जण ही भावना फारशी रुजली नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीत कुरबुरी ते वितंडवाद यावर गाडी घसरू लागली. माघार कोण आणि का घेणार? या हट्टापायी एका सुंदर त्रिकोणाची फारकत मात्र झाली. आणि यात बिचार्‍या तनुचा तर काहीही दोष नसताना एकट्या आईबरोबर राहवे लागणे, हे त्या कोवळ्या जीवाला अती क्लेशदायक होऊ लागले.

संबंधित बातम्या

…मग सुरू झाले कोर्टाची पायरी चढ-उतार करणे. जोडप्यांना घटस्फोट मिळण्याचे त्रास हे त्यांच्या बरोबरच फॅमिली कोर्टातील प्रत्येक व्यक्तीलापण होत असतात. काही ठिकाणी अगदीच विकृत गोष्टी असतील, तर हे काम लवकर हातावेगळे झाले तर बरे! अशीच तयारी असते. जिथे इगो, घमेंड, आत्मप्रौढी यामुळे लहानग्या लेकरांना शिक्षा मिळताना मात्र वकील किंवा समुपदेशक यांनादेखील खूप मनस्ताप सोसावा लागतो. ते फक्त सल्ला किंवा  मार्गदर्शन न करता समस्येची उकल करून जणू समुचित विचारांची पेरणीच करत असतात. त्याप्रमाणे प्रत्येक बैठकीत ते आपल्या या व अशा कित्येक जोड्यांना  एकत्र राहण्याचे फायदे व घटस्फोटाचे तोटे समजावून सांगत असतात. विभक्त झाल्यावर मुलांच्या भावविश्वावर होणारे परिणाम फार भयंकर असतात. आयुष्याच्या मध्यावर असा यू-टर्न घेणे किती धोक्याचे आहे, या सततच्या सकारात्मक विनंती, सल्ले यामुळे काही जोडपी परत प्रेमाचा धागा बांधतील, हीच भावना ओतप्रोत भरलेली असते.

तर मंडळी, आपल्या या जोडीतील त्याने मनाचा हटवादीपणा सोडून चक्क माघार घेत आपल्या लाडक्या तनुला कवेत घेत  गृहस्थाश्रमाचा दुसरा अंक  चालू ठेवण्यात आपली 100% तयारी दाखवली; तो दिवस होता प्रॉमिस डे..! आदर, मान, एकमेकांची कदर, कौतुक करत रुठना, मनाना, झगडा तो कभी मेलमिलाप;  या गोष्टींसाठी दोघेही साथ देण्यास मनापासून नव्याने तयार झाले! ही अतिशय आनंदाची गोष्ट ठरली!!

पेल्यातील  वादळे पेल्यात नाही  शमली तर  काचेला तडा हा जाणारच. पण, अगदी ग्लास फुटायची वेळ न  आणतासुद्धा  थोडासा तेरा थोडासा मेरा असे म्हणून हम अब एक है! ही जादूपण आयुष्यात घडू शकते, हे त्रिवार सत्य आहे. फक्त  मी, माझे, मला  यापेक्षा  आपण  दोघे, आपले ही गुंतवणूक मोलाची  ठरते…तेरे बिना जिया जाये ना… बिन तेरे, तेरे बिन सजना…

Back to top button