नोकरीसाठी अर्ज करताना… | पुढारी

नोकरीसाठी अर्ज करताना...

सतीश जाधव

नोकरीसाठी करण्यात येणार्‍या ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जात कमीत कमी चुका व्हाव्यात, यासाठी दक्ष असणे आवश्यक आहे. अशा प्रकारची चूक ही नवीन नोकरीच्या ठिकाणी स्थान पक्के करताना अडथळे आणू शकते.

संबंधित बातम्या 

नोकरीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आपण व्यक्तिमत्त्व शिबिर लावतो, सफाईदारपणे इंग्रजी बोलता यावे यासाठी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावतो. मात्र, जी महत्त्वाची बाब आहे आणि त्यावरून आपले व्यक्तिमत्त्व ठरत असते, अशा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे फारसे लक्ष देत नाही. अर्जात काय ‘फॉरमॅलिटी’ असते, असे म्हणून तो कसातरी लिहून पाठविला जातो. येथेच आपली गल्लत होते. सुवाच्च अक्षरात लिहिलेला अर्ज हा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणारा ठरू शकतो, हे आपल्याला जॉब मिळाल्यावर उमगते. ऑनलाईन अर्ज भरताना आपण पुरेसा वेळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

स्पेलिंग आणि व्याकरणातील चुका

नोकरीच्या अर्जात अशा प्रकारच्या चुका गंभीर मानल्या जातात. वरिष्ठ पदासाठी अर्ज करताना त्यात स्पेलिंग आणि व्याकरणात चूक राहिल्यास कंपनी किंवा संस्था आपल्याला कॉल पाठवताना दहादा विचार करू शकते. उमेदवार हा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदासाठी अर्ज भरत असतो. अर्ज भरताना ती नोकरी मिळेल, याची शाश्वती नसल्याचा विचार मनात ठेवतो. जन्मतारीख चुकणे, परीक्षेतील गुण चुकणे, पदव्यांचे नाव चुकणे यासारख्या गोष्टी नकळतपणे घडू शकतात. गोंधळाची मन:स्थिती असताना अर्ज न भरणे अधिक उत्तम. जाहिरात आल्यानंतर तत्काळ अर्ज पाठवणे कधीही चांगले; कारण उशिरा पाठविल्यास अर्ज वेळेत पोहोचेलच याची खात्री नाही आणि उशीर झाला म्हणून गडबडीत लिहिलेला अर्ज नोकरीची संधी चुकवू शकतो.

कव्हरिंग लेटर

नोकरीचा अर्ज हा उमेदवाराविषयी माहिती सांगणारा सोपा आणि चांगला मार्ग समजला जातो. उमेदवाराचे शिक्षण, इतिहास, अनुभव, भविष्यातील नियोजन याची माहिती आपल्याला अर्जातून मिळत असते. वेतन, पदाची अपेक्षाही आपल्याला अर्जातून कळू शकते. अन्य उमेदवारापेक्षा आपली पात्रता किती उजवी आहे, हे अर्जातून पटवून देता आले पाहिजे. ओघवत्या भाषेत सादर केलेला अर्ज कंपन्याच्या एचआर विभागाला पटणारा ठरू शकतो. अर्जाचा ढोबळ साचा ठरलेला असतो. त्या साच्याप्रमाणे अर्ज लिहावा; परंतु त्यातही आपल्या लिखाणाची शैली उत्तम वाटावी, अशा शब्दांचा उपयोग करून कव्हरिंग लेटर लिहिण्याचा प्रयत्न करावा.

कंपनीची माहिती मिळवणे

कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा जाहिरातीवरून आपण संबंधित कंपनीला अर्ज पाठवून देत असतो; परंतु ज्या कंपनीत आपल्याला अर्ज करायचा आहे, त्या कंपनीची ध्येय- धोरणे, वाटचाल, गुंतवणूक, विस्ताराबाबत माहिती काढणे अनिवार्य आहे. आजकाल गुगल, लिंकडेनवरून कंपनीची माहिती एका क्लिकवर आपल्याला मिळते. कंपनीबाबत जुजबी माहिती मिळवल्यास त्याचा फायदा आपल्याला मुलाखतीच्या वेळी निश्चित होतो आणि आपण कोणत्या प्रोफाईलमध्ये फिट बसू शकतो, याचाही अंदाज आपल्याला येतो.

अपूर्ण आणि अर्धवट अर्ज

आपण कोणत्या निकषात आणि जॉब प्रोफाईलमध्ये बसतो, त्याच ठिकाणी अचूक अर्ज पाठवणे योग्य ठरते. संपूर्ण नाव, माहिती, पत्ता, शैक्षणिक पात्रता, ई-मेल अ‍ॅड्रेस आदींबाबत परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ज्या पदाला पात्र नाही, तेथे अकारण अर्ज पाठवू नये. कामाचा अनुभव, मिळालेले पुरस्कार, मान-सन्मान, शिष्यवृत्ती, सामाजिक कार्य आदींबाबत सविस्तर माहिती अर्जात असायला हवी. ऑनलाईन अर्जातही गरज भासल्यास पीडीएफ फाईलसोबत जोडून आपण करत असलेल्या अर्जाला आणखी ‘वजनदार’पणा येतो.

सूचना न पाळणे

काही वेळेस नोकरीच्या नियुक्तीसाठी सविस्तर माहिती दिलेली असते, तर काही ठिकाणी अस्पष्ट माहिती असते. परंतु, आपल्याला कोणत्या ठिकाणी जॉब पाहिजे, हे निश्चित केले पाहिजे. वरवर जाहिरात पाहून किंवा वाचून अर्ज भरणे धोकादायक ठरू शकते. नोकरीची जाहिरात काळजीपूर्वक पाहिली, तर आपल्याला काही गोष्टी क्लिअर होऊ शकतात. नोकरीचा अर्ज भरताना आपण अतिशयोक्ती टाळायला हवी. रेफरन्स मागितले असेल, तर ज्यांच्या ओळखी आहेत आणि जो व्यक्ती आपल्याबद्दल सांगू शकेल, अशाच व्यक्तींची नावे द्यावीत. कमीत कमी शब्दांत अर्ज भरावा आणि थोडक्यात आपल्याबाबत विवरण द्यावे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास रोजगारातील अडचणी कमी होण्यास हातभार लागू शकतो.

Back to top button