करिअरचा ‘ग्रीन ऑप्शन’ | पुढारी

करिअरचा ‘ग्रीन ऑप्शन’

अक्षय ऊर्जा, जैवविविधतेचे संरक्षण, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर, पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या कल्पना मानल्या जातात. अशाच उद्योगांचे, कल्पनांचे नामाभिधान ‘गो ग्रीन कॉन्सेप्ट’ असे करण्यात आले आहे. जी कंपनी अथवा उद्योग पर्यावरणाचे संरक्षण करण्यात आपले योगदान देते अशा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर्‍या उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अशा उद्योगांमध्ये नोकरी करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हेतू पर्यावरणप्रेमी युवकांना साध्य करता येतो.

पाणी बचत करणारी उपकरणे तयार करणार्‍या कंपन्या, विजेची बचत करणार्‍या उपकरणांची निर्मिती करणार्‍या कंपन्या, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असणार्‍या कंपन्या यामध्ये असणार्‍या नोकर्‍यांची संधी लक्षात घेऊन त्या दिशेने शिक्षण घेण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यकर्ते, पत्रकार यांचीही आवश्यकता आहे. कार्बन फायनान्स कन्सल्टंट, अ‍ॅनालिस्ट यासारख्या नोकर्‍यांच्या संधीही अलीकडच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. अलीकडच्या काळात शहरांमध्ये ग्रीन बिल्डिंग उभ्या केल्या जाऊ लागल्या आहेत. ग्रीन बिल्डिंग याचा अर्थ ज्या इमारतीत पर्यावरणपूरक यंत्रणा बसवण्यात आलेली आहे अशी इमारत. अशा इमारतींचे डिझाईन तयार करण्यासाठी यापुढील काळात आर्किटेक्ट, अभियंतेही लागणार आहेत.

शेतकर्‍यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांना या शेतीचे महत्त्व पटवून देणारे संशोधकही आगामी काळात लागणार आहेत. सौरऊर्जा, पवनऊर्जा यांचा वापर करून विजेची बचत करणे, ही ऊर्जा किफायतशीर दरात निर्माण करणारे तंत्रज्ञान तयार करणे यासाठी आवश्यक असलेले अभियंते ही काळाची गरज आहे. याखेरीज हायड्रोजन हा शाश्वत ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून पुढे येत आहे.

असे ‘ग्रीन जॉब्स’ मिळवण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट अभ्यासक्रम शिकावे लागतात. अनेक विद्यापीठांमधून याविषयीचे पदवी अभ्यासक्रम शिकवले जाऊ लागले आहेत. पर्यावरण शास्त्रातील पदवी, अभियांत्रिकीमधील एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग ही पदवी, याच विषयातील बी.टेक हा अभ्यासक्रम, कार्बन फायनान्स, एन्व्हायर्मेंटल इंजिनिअरिंगमधील एम. टेक, हायड्रॉलिक्स अँड फ्लड इंजिनिअरिंगमधील एम.ई., एन्व्हायर्मेंटल मॅनेजमेंटमधील पीएच.डी., एन्व्हायर्मेंटल सायन्समधील, फॉरेस्ट इकॉलॉजीमधील पीएच.डी. असे वेगवेगळे अभ्यासक्रम अलीकडच्या काळात युवकांना पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ऊर्जानिर्मिती कंपन्या, सरकारची प्रदूषण नियंत्रण मंडळे आदी ठिकाणी, यासंदर्भातील कंपन्यांमध्ये रिन्युएबल अँड फ्युएल सेल रिसर्च, डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग, इन्स्टॉलेशन अँड मॉनिटरींग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकर्‍या मिळू शकतात. इंधनाची बचत करणार्‍या तंत्रज्ञानाचे संशोधन केल्यास वाहन उत्पादन कंपन्यांमध्येही नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याचबरोबर एनर्जी ऑडिटर या नव्या पदासाठी नोकर्‍या उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) पर्यावरणाला उपकारक ठरतील अशी सॉफ्टवेअर्स तयार करणारे अभियंते, संशोधक यांच्याही नोकर्‍या विदेशात उपलब्ध होत आहेत. कार्बन अकौंटिंग अँड व्हेरिफिकेशन या क्षेत्रात कार्बननिर्मितीवर नियंत्रण आणणारे संशोधन केल्यास किंवा झालेल्या संशोधनाचा अभ्यास केल्यास नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कार्बन फायनान्समध्ये सीडीएम पोझिशन, कार्बन क्रेडिट मार्केट, इमिशन ट्रेडिंग या विषयातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

जयदीप नार्वेकर 

Back to top button