करिअरला बुस्ट देणारी ‘संकेतस्थळे’ | पुढारी | पुढारी

करिअरला बुस्ट देणारी ‘संकेतस्थळे’ | पुढारी

सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. बालवाडीत प्रवेश घ्यायचा असो किंवा परदेशी विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असो. ऑनलाईनशिवाय पर्याय राहिलेला नाही. पूर्वी तासन्तास रांगेत उभा राहून फी भरावी लागत होती आता ही फी आपण काही मिनिटांत पे करू शकतो. तंत्रज्ञानाच्या या बदलामुळे शिक्षणातही आमूलाग्र बदल झाले आहे. 

पुस्तकी किडा ही संकल्पना कालबाह्य होऊन टेक्नोसॅव्ही हा नवीन शब्द नावारूपास आला आहे. ऑफलाईन मार्केटमध्ये जेवढे अभ्यासक्रम किंवा पुस्तक उपलब्ध नसतील तेवढे ऑनलाईनवर पहावयास आणि वाचावयास मिळतात. पुस्तक विकत घेण्याचे प्रमाणाच कमी झाले असून ऑनलाईनच्या माध्यमातून आपण कोठेही पुस्तक वाचू आणि हाताळू शकतो. हेच ऑनलाईन तंत्रज्ञान आपल्या करिअरला देखील बुस्ट करणारे किंवा पुढे नेण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

घरबसल्या ऑनलाईनवरून आपण आपले आवडीच्या क्षेत्रातील माहिती आणि ज्ञान घेऊ शकतो आणि ते विकसित करू शकतो. जर आपण उच्च शिक्षण घेतले असेल तर आणखी त्याला बळ देण्यासाठी ऑनलाईनचा वापर करू शकतो. ऑनलाईनवरूनही आता दुरुस्तीची कामे शिकवली जातात. त्याप्रमाणे आपण घरातील जुजबी कामे सहजपणे करू शकतो. त्यामुळे ऑनलाईनमुळे ज्ञान मिळवण्यासाठी जग ओपन झाले असून आता त्यावर कोणाचीही मक्तेदारी राहिली नाही. आज ऑनलाईनवर असंख्य संकेतस्थळे असून ती आपल्या करिअरला दिशादर्शक ठरू शकते. माहितीचे महासागर असल्याने आपल्याला नेमकी कोणते संकेतस्थळ गरजेचे आहे, हे पाहणे जरा कष्टप्रद ठरू शकते. त्यामुळे काही अशी संकेतस्थळे आहेत की ती सर्वसाधारणपणे करिअर करणार्‍या युवकांना फायदेशीर ठरू शकतील. नोकरी समाधानकारक नसेल, पगार कमी असेल किंवा नोकरीची चांगली संधी निर्माण झाली असेल तर अशा प्रकारची इत्यंभूत माहिती आपल्याला ही संकेतस्थळे उपलब्ध करून देतात. 

GetRaised : जगातील सर्वात मोठा प्रश्‍न म्हणजे वेतनश्रेणी. नोकरदार मंडळींना मिळणारे वेतन हे समाधानकारक असेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे बहुतांशी मंडळी उत्पन्न वाढवण्यासाठी आणि वेतनश्रेणी वाढण्यासाठी नोकर्‍या बदलत राहतात. कमी वेतन असेल तर कर्मचारी कामात पूर्ण योगदान देईलच हे सांगता येत नाही. गेटरेझड हे संकेतस्थळ आपल्या कामाच्या स्वरूपानुसार किती वेतन हवे, याची माहिती देण्यास साह्यभूत ठरते. या संकेतस्थळावर आपला हुद्दा आणि वेतन याचा उल्लेख केल्यास हे संकेतस्थळ आपल्याला संबंधित पदासाठी किती वेतन हवे याची माहिती देत आपण कमी वेतनात काम करत आहोत की नाही, हे ही सांगते. करिअरमधील उत्पन्न वाढविण्यासाठी हे संकेतस्थळ आपल्याला मदतगार ठरू शकते. 

Skillshare  : सुमारे दहा लाखांहून अधिक यूजरनी स्किलशेअर ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपले कौशल्य आणखी विकसित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करावा याची माहिती दिली जाते. स्किलशेअरमुळे कौशल्य वाढतेच त्याचबरोबर मोफत ऑनलाईन कोर्सेसही उपलब्ध आहेत. इच्छुक करिअरमधील अभ्यासक्रम आपण निवडू शकतो. 

Career Bliss  :  करिअर ब्लिझ हे संकेतस्थळ आपल्याला विविध कंपन्यांतील वेतनाची तुलना करते. त्याचबरोबर कंपनीच्या कामगिरीचा आढावा, नोकरीची संधी याबाबतची माहितीही देते. आपल्या करिअरसाठी पोषक असणारी संधी संबंधित कंपनीत आहे की नाही, याचीही माहिती देते. 

High brow : एखादा अभ्यासक्रम करायचा म्हटलं तर आपला वेळ आणि पैसा बराच खर्ची पडतो. जर तो युवक नोकरी करणारा असेल तर त्याला उच्च शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. अशा स्थितीत हायब्रो हा मोफतपणे ईमेलच्या माध्यमातून शिक्षण देणारे व्यासपीठ आहे. दररोज सकाळी संकेतस्थळाकडे नोंदणी केलेल्या मेलमध्ये येणार्‍या माहितीपुस्तीकेतून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. 

Opportunity  :  हे संकेतस्थळ नोकरीच्या नवीन संधीची माहिती उपलब्ध करून देणारे व्यासपीठ मानले जाते. या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर जनसंपर्कही वाढतो आणि चांगल्या नोकरीची संधी कधी कधी मिळू शकते. संपर्क वाढवताना आपला बराच काळ जातो. परंतु या संकेतस्थळामुळे विशेष वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. आपल्या करिअरला मार्गदर्शन करणारी किंवा साह्यभूत ठरणार्‍या मंडळींची या संकेतस्थळामुळे ओळख होते.
 

Back to top button