भान ठेवून व्यवहार करावेत! | पुढारी | पुढारी

भान ठेवून व्यवहार करावेत! | पुढारी

डॉ. वसंत पटवर्धन

येत्या काही दिवसात राजस्थान, मध्यप्रदेश वगैरे पाच राज्यांत निवडणुका जाहीर होतील व त्यानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजायला लागतील. या सर्व बाबींचा शेअर बाजारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीबद्दल जागरूक रहायला हवे. फेडरल रिझर्व्हने अमेरिकेत व्यवहार वाढवले की इकडे रिझर्व्ह बँकही रेपोदर वाढवेल.

गेल्या शुक्रवारी शेअर बाजारात एकच कोलाहल माजला व अनेक शेअर्सची कत्तल झाली. येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांची पुनर्नियुक्‍ती फक्‍त 31 जानेवारी 2019  पर्यंतच रिझर्व्ह बँकेने केली असून संचालक मंडळाने नवीन प्रमुख नेमण्याची कार्यवाही सुरू करावी, असे सांगितले आहे. कपूर यांचे व्यवहार आपल्या कुटुंबीयांबरोबरही असल्याबद्दल त्यांच्या बहिणीनेच तक्रार केली आहे. व्यवस्थापनातील या घोळामुळे शेअर खूपच तुटला व काही दिवसांपूर्वी हा शेअर 300 रुपयांवर होता तो आता 180 रुपयांपर्यंत खाली आला आहे. जोखीम घेऊ शकणार्‍या धाडसी गुंतवणूकदारांनी जर खरेदी केली तर सहा महिन्यांतच किमान 30 टक्के नफा मिळावा. पण हे प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारी  व जोखमीवर ठरवायचे आहे. इथे फक्‍त माहिती दिली आहे व लेखकाची काहीही जबाबदारी नाही.

संबंधित बातम्या

येस बँकेच्या आधी आय. एल. अँड एफ. एस. (इन्फ्रास्ट्रक्‍चर लीझिंग अँड फायनान्शिअल सिरीस) 1LPS च्या कर्जाचे भांडवली हप्ते व त्यावरील व्याज देण्यासंबंधी अडचणी सुरू झाल्या होत्या. ‘गंडस्योऽपरि पीटिका’ म्हणीप्रमाणे पहिल्या गळवावर व दुसरा गळू झाल्यासारखे झाले आहे. 

पण गुंतवणूकदारांनी त्यामुळे दबकून जाण्याचे कारण नाही. नाल्कोप्रमाणेच त्यांनी बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, आयशर मोटर्ससारख्या सुरक्षित शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. या कंपन्यांमध्ये (Largecap) असून, अन्य शेअर्सप्रमाणे शुक्रवारी ते खूप तुटले आहेत. मारुती सुझुकी 7348 रुपयाला आहे. आज ती कदाचित आणखीही खाली मिळेल. बारा महिन्यांतील मारुती सुझुकीच्या कमाल भावाचे व किमान भावाचे आकडे 10,000 रुपये व 7293 रुपये असे आहेत. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 26.2 पट आहे.

बजाज फायनान्स 2168 रुपयाला शुक्रवारी बंद झाला. वर्षभरातील त्याचा 2994 रुपयाचा कमाल भाव लक्षात घेता सध्याच्या भावाला खरेदी आकर्षक वाटते. बजाज फायनान्स हा नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीतला इस्पिकचा एक्‍का आहे व हुकुमाचा एक्‍काही आहे. तिमाहीचे विक्री व नफ्याचे आकडे जेव्हा प्रसिद्ध होतात तेव्हा तो किमन 300 रुपयांनी वाढलेला असतो. तिच्याकडील व्यवस्थापनाखालची बिंदगी प्रचंड आहे. प्रेशर कुकर, मिक्सर, ग्राईंडर्सपासून ती स्कुटर्स, मोटारीपर्यंत सर्वांसाठी कर्जे देते. अनर्जित कर्जाची रक्‍कम व टक्केवारी मामुली आहे. त्यामुळे भागभांडारात हा सदैव हवा. सध्याच्या भावालाही तिचे किं/उ गुणोत्तर 41  पट आहे.

गेल्या शुक्रवारी गुंतवणुकीसाठी आकर्षक असलेले ग्राफाईट इंडिया, स्टर्लाईट टेक्नॉलॉजी व होमरेड्डी भरपूर उतरले. त्यामुळे ते जरूर घ्यावेत. चीनच्या ग्राफाईट कंपन्या आता पुन्हा सुरू होत असल्याने त्या दोन शेअर्सची नवलाई आता नऊ-दहा महिनेच रहावी. 

स्टर्लाईट टेक्नॉलॉजी आपल्या ऑप्टिक फायबर केबल्सचे उत्पादन दुप्पट करणार आहे. त्यासाठी संचालक मंडळाने 320 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. नवीन दीड कोटी टन ऑप्टिकल फायबर्सचे उत्पादन त्यामुळे वाढेल व एकूण उत्पादन 3.3 कोटी टन होईल. टप्प्या टप्प्याने जून 2020 पर्यंत हा प्रकल्प पुरा होईल. त्यासाठी अंतर्गत शिल्‍लक व थोडे कर्ज अशा मार्गाने भांडवल उभे राहील. 

ऑप्टिकल फायबर्समध्ये स्टर्लाईटचे उत्पादन वाढले की नक्‍त नफा आपोआप वाढेल. गेल्या शुक्रवारी हा शेअर 294 रुपयाला मिळत होता. बाजारातली पडझड थांबली व दर तिमाहीचे विक्री व नक्‍त नफ्याचे आकडे प्रसिद्ध झाले की दर तिमाहीला तो किमान दहा टक्के वाढावा. (बजाज फायनान्सही असाच वाढतो.)

स्टर्लाईट टेक्नॉलॉजीचा गेल्या बारा महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे 415 रुपये व 220 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 30.2 पट दिसते. वर्षभरात तो पुन्हा 415 रुपयांवर जावा. कदाचित तेजी वाढली तर तो 470 रुपयेही होऊ शकेल. रोज सुमारे 12 ते 15 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. 

शेअर बाजार हा एखाद्या समुद्रासारखा असतो. त्याला सारखी भरती-ओहोटी असते आणि चिमुकल्या माशापासून, शार्क व व्हेलसारखे मासेही तिथे वावरत असतात. कसलेला नाविक नसेल किंवा उत्तम पोहणारा कुणी असेल तर त्याची होडी आत ओढली जाईल किंवा त्याच्या पायाखालची वाळू कधी सरकेल हे सांगता येत नाही. पाणी आणि अग्‍नी, वारा आणि प्रकाश या गोष्टी जीवनाला आवश्यक असतात. पण सुयोग्य प्रमाणातच असाव्या लागतात. या सर्वांचं भान जसे ठेवायला लागतो तसे शेअर बाजारातही कायम भान ठेवून व्यवहार करावे लागतात. मोह आणि भीती (Greed & Fear) हे बाजाराचे आवश्यक घटक आहेत व त्यांचा सामना करण्यासाठी शेअर बाजाराचे ज्ञान स्वतः द्यावे लागते. चार लोकांचा, तज्ज्ञांचा, दलालांचा सल्‍ला जरूर घ्यावा पण त्यावर अवलंबून राहू नये. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हा समर्थांचा गुरुमंत्र सदैव लक्षात ठेवावा लागतो. 

येत्या काही दिवसात राजस्थान, मध्यप्रदेश वगैरे पाच राज्यांत निवडणुका जाहीर होतील व त्यानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजायला लागतील. या सर्व बाबींचा शेअर बाजारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीबद्दल जागरूक रहायला हवे. फेडरल रिझर्व्हने अमेरिकेत व्यवहार वाढवले की इकडे रिझर्व्ह बँकही रेपोदर वाढवेल. नुकतेच तिने बाजारातील द्रवता  दोन लक्ष कोटी वाढवण्यासाठी, बँकांकडील वैधानिक द्रवता परिमाण कमी केले आहे. व्याजदरात वाढ झाली की गृहवित्त संस्थाही आपले व्याजदर वाढवतील. सध्या गृहवित्त कंपन्यांतील दिवाण हौसिंग फायनान्स हा शेअर 300 रुपयांपर्यंत उतरला आहे. तिच्यात माफक गुंतवणूक करायला हरकत नाही. पण बजाज फायनान्स, स्टर्लाईट टेक्नॉलॉजी, नान्को, हिंडाल्को यांना पसंती आधी द्यावी.

Back to top button