विपुलता कोर्सेसची, गरज सुयोग्य निवडीची | पुढारी

विपुलता कोर्सेसची, गरज सुयोग्य निवडीची

जगदीश काळे

आज जग कमालीचं बदललं आहे. करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. उच्च शिक्षणासाठी गाव, शहर सोडून जाण्याचे दिवस आता राहिले नाहीत. इंटरनेटसारख्या सुविधांमुळे शिक्षणच आपल्या दारी आलं आहे. तरीही दहावी बारावीनंतरचे पर्याय निवडताना थोडी सावध पावलं उचलली पाहिजेत. 

कॉम्प्युटरमधील अद्ययावत ज्ञान असणं ही काळाची गरज आहे. यासंबंधीचे विविध कोर्सेस चालवले जातात. योग्य निवड करून हे शिक्षण घेता येईल. जागतिकीकरणात मुख्यत: फॅशन डिझायनिंग, जाहिरात, अ‍ॅनिमेशन अशा क्षेत्रांना फारच महत्त्व आलं आहे. विविध संस्थांमार्फत मल्टिमीडिया आणि ग्राफिक्ससारखे कोर्सेस चालवले जातात. ग्राफिक डिझायनिंगमधील वाढत्या मागणीमुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांना देशात तसंच परदेशातही चांगली मागणी असते. वेगवेगळ्या तांत्रिक, व्यावसायिक तसंच क्रिएटीव्ही क्षेत्रात ग्राफिक डिझायनर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. प्रकाशन व्यवसायात या क्षेत्रातील तज्ज्ञांना चांगल्या संधी आहेत. त्याचबरोबर सातत्याने विस्तारणार्‍या जाहिरात क्षेत्रातही ग्राफिक डिझायनरना चांगली मागणी असते. आपल्या क्रिएटीव्हीटीचा वापर याठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घेता येतो. मल्टिमीडिया क्षेत्रात काम करायचं झाल्यास डिरेक्टर, थ्री मॅक्स, अडॉब प्रिमिअर या गोष्टींचं ज्ञान असायला हवं. अनेक खासगी संस्थांमार्फत तीन-चार महिन्यांच्या मुदतीचे ग्राफिक डिझायनिंगचे कोर्सेस चालवले जातात. 

पूर्वी सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् अशा तीन महत्त्वाच्या शाखांकडे विद्यार्थी वळायचे. पण, आज मात्र  इतर शाखांबरोबरच प्रोफेशनल, कमर्शिअल, टेक्निकल, नॉन टेक्निकल कोर्सेसकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. करिअरसाठी कोणतंही क्षेत्र निवडताना आपल्या मार्कांचा, एखाद्या विषयातील आपल्या इंटरेस्टचा, त्या क्षेत्राला असणार्‍या मागणीचा यांचा विचार करतानाच आपल्या आर्थिक कुवतीचाही विचार करायला हवा. सर्वसामान्यपणे माहिती असणार्‍या आणि मागणी असणार्‍या शाखा म्हणून आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स या शाखांचा उल्लेख केला जातो. त्याचप्रमाणे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल शाखांकडेही विद्यार्थ्यांचा कल असतो. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथस्, कॉम्प्युटर शाखेत स्पेशलायजेशन करता येईल. तसंच बर्‍याच कॉलेजेसमध्ये व्होकेशन हा विषयही असतो.  कॉमर्समध्ये अकाऊंट, बुक किंपिंग,  सेक्रेटरीअल प्रॅक्टिस, मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांचा समावेश असतो. आर्टसमध्ये पोलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, सोशिओलॉजी, मॅथ्स, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, लॉजिक, हिस्टरी, जिओग्राफी, फिलॉसॉफी किंवा लिटरेचरमध्ये स्पेशलायजेशन करता येईल. 

दहावीनंतर तीन वर्षे कालावधीचा इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेता येईल. यासाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर इंजिनिअर, इन्फर्मेशन टेक्नोलॉजी, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा पर्याय तुमच्याकडे आहे. दहावीनंतर एमसीव्हीसी या कोर्सला प्रवेश घेता येतो. या कोर्समध्ये टेक्निकल, कॉमर्स, अ‍ॅग्रीकल्चर, फिशरीज, हेल्थ आणि मेडिकल सर्व्हिसेस, होमसायन्स असे सहा ग्रुप असतात. हा दोन वर्षांचा कोर्स केल्यानंतर स्वयंरोजगाराकडे वळता येतं. 

नॉन टेक्निकल कोर्समध्ये कमर्शिअल आर्ट, अ‍ॅनिमेशन अँड ग्राफिक, इंटिरिअर डिझायनिंग, फोटोग्राफी, पेंट, टेक्नॉलॉजी, एअरलाईन्स मॅनेजमेंट आदी क्षेत्रांकडे वळता येतं. आयटीआय ही दहावीनंतर तांत्रिक शिक्षण देणारी संस्था आहे. दोन वर्षांचा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर एक ते दोन वर्षे उद्योग प्रशिक्षण घेता येईल. 

बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आर्किटेक्चर करायचं असेल तर गणित आणि क्रिएटिव्हीटी या दोन्हींचा मेळ तुम्हाला साधता यायला हवा. अनेक पॉलिटक्निक्समध्ये लेदर टेक्नॉलॉजी हा कोर्स उपलब्ध आहे. क्रिएटिव्हीटीमध्ये इंटरेस्ट असणार्‍यांसाठी सिरॅमिक टेक्नॉलॉजी हा सुटेबल पर्याय म्हणता येईल. बर्‍याच पॉलिटेक्निक्समध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. एविएशन इंडस्ट्रीमध्ये स्वारस्य असणार्‍यांसाठी कमर्शिअल एविएशनचा कोर्स उपलब्ध आहे. नॉटिकल सायन्स, मरिन इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर गणित आणि फिजिक्स या विषयांमध्ये इंटरेस्ट असायला हवा. 

याशिवाय पॅरामेडिकल सायन्स, फार्मसी, मेडिसीन, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ऑप्टोमेट्री, नसिर्र्ग, डेअरी टेक्नॉलॉजी, इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय लॉ, सोशल वर्क, फाईन आर्ट, जर्नालिजम, फॉरेन लँग्वेज अशा पर्यायांचाही विचार करता येईल. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपला कल, आवड, आर्थिक स्थिती, बाजारपेठेची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य त्या पर्यायांची निवड करायला हवी.  

Back to top button