आहारतज्ज्ञ बनायचंय? | पुढारी | पुढारी

आहारतज्ज्ञ बनायचंय? | पुढारी

अनिल विद्याधर

आहार आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. सात्विक आहारामुळे आपला दिवस चांगला जातो. अनियमित जेवण, अपुरे भोजन या कारणांमुळे आजाराला निमंत्रण मिळते. डायटेशियन, न्यूट्रिशियन म्हणजेच आहारतज्ञ हे भोजनात सात्विकता आणि पोषक तत्त्व आणण्याचे काम करतात. कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य चांगले आणि सुदृढ राहवे यासाठी आहारतज्ञ मोलाची भूमिका बजावतो. आहारतज्ज्ञाच्या वेळापत्रकाचे पालन केल्यास शरीरात ऊर्जा कायम राहते आणि आहारात संतुलन राहते. कोणत्या व्यक्तीला कोणत्या घटकाची अधिक गरज आहे, हे सांगण्याचे काम आहारतज्ज्ञ करतात. सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रात आहारतज्ज्ञांची मागणी वाढत चालली आहे. पंचतारांकिंत हॉटेल्स, रुग्णालय, व्यायामशाळा, शाळा आणि महाविद्यालय आदी ठिकाणी आहारतज्ज्ञांची नेमणूक केली जात आहे. यावरून नागरिकांचे सकस आणि सात्विक आहाराबाबतची सजगता वाढत असल्याचे दिसून येते. 

डायटेशियन किंवा न्यूट्रिशियन हे लोकांना फिट ठेवण्याचे काम करतात. आहारतज्ज्ञ हे लोकांना वेळोवेळी आहारासंबंधीची माहिती देत असतात. आधुनिक काळात आणि धावपळीच्या युगात लोकांना सकस आणि पौष्टिक आहार कसा मिळेल याबाबत आहारतज्ज्ञ सल्ला देत असतात, तसेच आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, कोणते पदार्थ टाळावेत, याबाबत मार्गदर्शन करत असतात. डायटेशियन हे शरीराच्या गरजेनुसार डायट चार्ट करत असतात. याप्रमाणे न्यूट्रिशियन हा शरिरावर भोजनामुळे होणार्‍या परिणामाचा आणि तेलकट पदार्थाच्या प्रभावाचा अभ्यास करतात. न्यूट्रिशियन हा शरिराला होणारे संभाव्य आजार टाळणे आणि सल्ला देण्याचे काम करत असतो. शरिर तंदुरुस्त राहण्यासाठी माहिती देतो. एकूणात काय तर दोघांचे कामही चुकीचे आहारापासून नागरिकांना दूर ठेवणे हेच आहे. वय आणि कामाच्या आधारावर आपला डायट कसा असावा याची अचूक माहिती एक न्यूट्रिशियन आणि डायटिशियन देत असतो. 

कामाचे स्वरुप: न्यूट्रिशियन आणि डायटेशियनचे काम सकस भोजन देणे आहे. लोकांच्या पोटात योग्य आहार कसा जाईल याबाबत ते मागदर्शन करत असतात. न्यूट्रिशियन आणि डायटेशियन हे योग्य आहाराचे माहिती देऊन आपले शरिर आरोग्यदायी कसे राहिल, याबाबत ते दक्ष असतात. आजारी असलेल्या मंडळींना कोणता आहार करावा कोणता टाळावा याचाही सल्ला ते देतात. पोषकयुक्त आहार केल्यास शरीर आजारापासून दूर राहते, मात्र चुकीचा आहार घेतल्यास पोट आजाराचे आगार बनते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. न्यूट्रिशियन संघटना, रुग्णालय, शाळा, हॉटेल आदी ठिकाणी सल्ला देण्याचे काम आहारतज्ज्ञ करत असतो. 

व्यक्तिमत्त्व: जर आपल्याला आहारविज्ञानात रस असेल तर आपण या क्षेत्राची निवड करु शकता. चांगले संवादकौशल्य आणि संयम असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दुसर्‍यांची चिंता म्हणजेच काळजी घेण्याची वृत्ती देखील आपल्या अंगी असावी. हा गुण करियरला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतो.

नोकरीचे पर्याय : देशातच नाही तर परदेशातही रोजगाराच्या विपूल संधी आहेत. कॉलेज, शाळा, हेल्थ क्लिनिक्स, फूड कंपनी, फुड मॅन्यूफॅक्चर्स, रिसर्च लॅब, केटरिंग डिपार्टमेंट, हेल्थ केअर सेंटर याठिकाणी आपल्याला रोजगार सहजपणे मिळू शकतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देतात. त्यामुळे आपल्याला देश-विदेशात फिरण्याची संधी मिळते. एवढेच नाही तर अध्यापन क्षेत्रातही करिअर करू शकते. स्पा आणि अनेक क्लिनिकमध्ये ग्राहकांसाठी आरोग्यदायी आणि कमी कॅलरीचे फूड चार्ट तयार करण्यासाठी आहारतज्ञ मदत करत असतात. 

वेतन : करिअरच्या प्रारंभीच्या काळात पंधरा ते वीस हजार वेतन मिळते. अनुभवाच्या जोरावर वेतनवाढ मिळत जाते. जेवढा अधिक अनुभव मिळेल, त्याप्रमाणात वेतन मिळू शकते. सरकारी रुग्णालयात आपल्याला सरकारी कर्मचार्‍याप्रमाणे वेतन भत्ते लागू होतात. त्याचेवेळी खासगी शिक्षक किंवा रुग्णालयात आपल्याला अनुभवानुसार संस्था वेतन निश्चित करते. 

पात्रता : बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डायटिशियन आणि न्यूट्रिशियनचा अभ्यासक्रम करण्यासाठी आपल्याला शास्त्र विषयासह बारावी होणे गरजेचे आहे. पदवीला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला मान्यताप्राप्त बोर्डाची बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. न्यूट्रिशियन आणि डायटिशियनच्या अनेक खासगी संस्था उपलब्ध असून त्या शॉर्ट टर्म आणि डिप्लोमा कोर्स देखील चालवतात. त्याचा कालावधी हा सहा महिने ते बारा महिन्याचा राहतो. 

अभ्यासक्रम

•बीएससी अँड न्यूट्रिशियन अँड डायटेटिक्स

•बीएससी होम सायन्स

•एमएससी न्यूट्रिशियन अँड डायटेशियन

•मास्टर इन सायन्स फूड अँड न्यूट्रिशियन

•डिप्लोमा इन न्यूट्रिशियन अँड फूड टेक्नॉलॉजी  •पीएचडी फूड सायन्स

Back to top button