‘सकारात्मकतेने संधीचे सोने करण्याचा हा काळ…!’ | पुढारी

'सकारात्मकतेने संधीचे सोने करण्याचा हा काळ...!'

Covid-19 च्या काळात ‘शाळा बंद आणि शिक्षण सुरू’ ही संकल्पना नव्याने उदयास आली आणि शिक्षण हे बंद खोलीतच घेण्याची बाब नसून ही सतत आणि चिरंतन चालणारी प्रक्रिया असल्याचे शिक्षकांसोबतच विद्यार्थी आणि पालकांच्या मनावर सुद्धा बिंबवले गेले. या काळामध्ये शिक्षण क्षेत्रातील अनेक संकल्पनांमध्ये अमुलाग्र आणि आवश्यक बदल घडून आले. एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाताना अत्यावश्यक असलेल्या डिजिटल युगाला या काळात खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात सुद्धा चालना मिळाली. 

तंत्रज्ञानाला विशेषतः मोबाईल सारख्या वस्तूला आजपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून समजणाऱ्या ग्रामीण समाजात इंटरनेट, गुगल सर्च, अनेक ऑनलाईन मीटिंग, वर्ग घेता येणारे ॲप, व्हॉट्सअॅप, फेसबुक, युट्यूब यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटकांची जाणीव झाल्याने काही प्रमाणात का होईना परंतु जागतिक आव्हानांना पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये सुद्धा निर्माण करता आली. या काळात विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शोधाच्या प्रक्रियेकडे झुकल्यामुळे खऱ्या अर्थाने ज्ञानरचनावाद व क्रिएटिव्ह थिंकींगची प्रक्रिया निर्माण झाली असून, नक्कीच या covid-19 काळाचा फायदा येणाऱ्या काळात समाजावर उमटलेला दिसेल. 

या काळात शाळा बंद असल्याने शाळांचे महत्त्व सुद्धा समाजाला अनपेक्षितपणे समजलेले आहे. तसेच शिक्षण घेण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग सुद्धा या माध्यमातून निर्माण झाले आहेत. म्हणून या आलेल्या संकटाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू या आणि संधीचे सोने बनवूया….!

संबंधित बातम्या

ज्ञानेश्वर गणपत झगरे

(स.शिक्षक) 

जि. प. प्रा. शाळा, उमरखेडा, ता भोकरदन, जि. जालना

Mob-9923528494

Mail- dnyaneshwarzagre@gmail.com

Back to top button