व्यक्‍तिगत अपघात विम्याचे फायदे | पुढारी | पुढारी

व्यक्‍तिगत अपघात विम्याचे फायदे | पुढारी

वर्षा शुक्ल

दुर्घटना कधीही घडू शकते; परंतु जर ते विचारात घेऊन आर्थिक नियोजन केलेले असेल तर ते आपल्याला दु:खाचा सामना करण्यासाठी सक्षम बनविते. त्याचबरोबर आपण दुर्घटनेच्या परिणामांमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सन्मानपूर्वक जीवन जगता येते. त्या द‍ृष्टीने व्यक्‍तिगत अपघात विमा पॉलिसी आपल्याला चांगले संरक्षण देते. ही पॉलिसी आपल्या आणि कुटुंबीयांच्या आर्थिक स्थिरतेसाठी असून ती अगदी स्वस्तात उपलब्ध आहे.

आपल्याला कधीच काही होणार नाही, असा विचार करणे सोपे असते. परंतु दुर्घटना कोणाच्याही बाबतीत कधीही घडू शकतात. एखाद्या दुर्घटनेचा दूरगामी परिणामही होऊ शकतो. त्यामुळे एखादी दुर्घटना आपल्या बाबतीत घडलीच तर आपल्या कुटुंबीयांचे काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करून ठेवला पाहिजे. एखाद्या दुर्घटनेत जखमी झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्या घटनेचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात; त्यामुळे अशा कोणत्याही परिस्थितीपासून रक्षण व्हावे म्हणून प्रत्येकाकडे व्यक्‍तिगत अपघात विम्याचे कवच असावे, असा सल्ला दिला जातो. व्यक्‍तिगत अपघात विमा ही एक बेनिफिट पॉलिसी आहे. दुर्घटनेमुळे जर मृत्यू किंवा अपंगत्व आले, तर त्यातील जोखीम या पॉलिसीद्वारे कव्हर केली जाते. एखाद्या दुर्घटनेमुळे पूर्णतः किंवा अंशतः अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत आयुर्विम्याची पॉलिसी कव्हर देऊ शकत नाही. दुसरीकडे एखादी आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल, तर ती केवळ रुग्णालयात होणार्‍या खर्चाचीच भरपाई करते.

या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍तिगत अपघात विमा पॉलिसी आपल्याला अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीपासून संरक्षण देते. ही अत्यंत स्वस्त पॉलिसी असते. 15 लाख रुपयांचे कव्हर आपल्याला दिवसाला एक रुपया प्रीमियम भरून घेता येते. ती वार्षिक आधारावरही उपलब्ध आहे. दरवर्षी पॉलिसीचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. याखेरीज या पॉलिसीत कोणताही प्रतीक्षा अवधी नसतो. म्हणजे पॉलिसी घेतल्याबरोबर त्याचे लाभ सुरू होऊ शकतात.

एखाद्या दुर्घटनेमुळे जर अपंगत्व अथवा मृत्यू आला तर अशा स्थितीत व्यक्‍तिगत अपघात विमा पॉलिसी आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत प्रदान करते. अपघातात कोणत्या स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत, त्या गंभीर आहेत की नाहीत, याच्याशी या पॉलिसीचा काहीही संबंध असत नाही. रस्त्यावरील छोटी दुर्घटना किंवा सायकलवरून पडणे, हात फ्रॅक्चर होणे किंवा मैदानावर खेळताना पायाला दुखापत होणे अशा छोट्या-मोठ्या दुर्घटनांमुळे होणारा खर्च या पॉलिसीच्या माध्यमातून कव्हर केला जातो.

आकस्मिक मृत्यू किंवा पूर्णपणे विकलांग अवस्था (कोमा किंवा पक्षाघाताच्या स्वरूपात) झाल्यास अशा परिस्थितीत हे कव्हरेज अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. तात्पुरत्या अपंगत्वाची शक्यताही गृहीत धरायला हवी, कारण असे अपंगत्व आपल्या नियमित उत्पन्‍नात खंड पाडू शकते. कमी किमतीत अशा मूलभूत कव्हरची निवड करणे हे शहाणपणाचे काम आहे. कारण त्यामुळे आपल्या कुटुंबावर भविष्यात ओढवू शकणार्‍या संकटापासून कुटुंबाचे रक्षण करता येते. व्यक्‍तिगत अपघात विमा पॉलिसीला वर्ल्डवाइड कव्हरेज असते. यात मृत्यूबरोबरच कायमस्वरूपी अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स बेनिफिट, चिल्ड्रेन्स एज्युकेशन बेनिफिट, फ्रॅक्चर केअर, ईएमआय पेमेन्ट आणि लोन प्रोटेक्टर या बाबी अंतर्भूत असतात. 

पॉलिसीमध्ये अनेक प्रकारचे कव्हरेज लिहिलेले असते आणि त्यातून आपल्यासाठी अत्यंत अनुकूल असणारे कव्हरेज आपण निवडू शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती जर खेळाडू असेल तर हेल्थ इन्श्युरन्सच्या बेसिक कव्हरेज व्यतिरिक्‍त या कव्हरचाही लाभ घेता येईल. जर एखाद्याच्या कर्जाची परतफेड सुरू असून हप्‍ते नियमित भरले जाणे आवश्यक असेल तर अशा व्यक्‍तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कर्जाच्या सुरक्षिततेचा पर्याय निवडता येतो. व्यक्‍तिगत अपघात विमा हा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. दुर्घटना कधीही घडू शकते; परंतु जर ते विचारात घेऊन आर्थिक नियोजन केलेले असेल तर ते आपल्याला दुःखाचा सामना करण्यासाठी सक्षम बनविते. त्याचबरोबर आपण दुर्घटनेच्या परिणामांमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सन्मानपूर्वक जीवन जगता येते. त्या द‍ृष्टीने व्यक्‍तिगत अपघात विमा पॉलिसी आपल्याला चांगले संरक्षण देते. 

 

Back to top button