ड्रीमगर्ल | पुढारी | पुढारी

ड्रीमगर्ल | पुढारी

सायली रावले, अलिबाग

‘हॅलो सर, डेटिंग कंपनीमध्ये तुमचं स्वागत आहे… हाऊ कॅन आय हेल्प यू?’ समोरुन आलेल्या एका तरुणीच्या मधूर आवाजाने अशोक काका भलतेच खूश झाले. ‘हॅलो सर…?’ तिच्या पुन्हा बोलन्याने ते भानावर आले.. त्यांनी तिला कंपनीबद्दलची सगळी माहिती विचारून घेतली आणि खात्री झाल्यावर कंपनीची मेंबरशिप घ्यायला तयार झाले…

अशोक पवार… खारघरमध्ये एका आलिशान सोसायटीमध्ये राहणारे 65 वर्षीय गृहस्थ.. कायम हसतमुख, आयुष्य अगदी मौजेने जगणारे… रिटायरमेंटनंतर मात्र घरी कंटाळायचे. अधून-मधून मित्रांसोबत गप्पा, पिकनिक व्हायच्या, पण ते तेवढ्यापुरतेच. बायको रेणुका काही वर्षांपूर्वीच गेल्याने ते त्यांचा मुलगा श्रेयससोबत राहायचे. पण श्रेयसही त्याच्या उद्योगधंद्यात व्यस्त असल्याने वडिलांसोबत वेळ घालवायला त्याला वेळ मिळत नसे. म्हणून कोणीतरी जवळची व्यक्ती आपल्यासोबत असावी असं त्यांना नेहमी वाटायचं आणि अशा वाटण्यातूनच त्यांना सोशल नेटवर्किंग साईटवर या डेटिंग कंपनीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी लगोलग त्या कंपनीला संपर्क साधून सगळी खात्री करून घेतली. त्या डेटिंग कंपनीच्या निशा नावाच्या मुलीने अशोक काकांना आपल्या मधूर आवाजाने भुलवून ठेवले होते. काका दररोज तिला फोन करून तिच्याशी तासन्तास बोलायचे. काही दिवसांनी निशाने अशोक काकांच्या मोबाईलवर काही तरुण मुलींचे फोटो पाठविले आणि त्यांना सांगितलं की, जर त्यांना यापैकी कोणत्याही मुलीला भेटायचं असेल तर ते भेटू शकतात, मात्र त्यासाठी त्यांना कंपनीला पैसे द्यावे लागतील.

निशाचं बोलणं ऐकून अशोक काकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते निशाने पाठविलेले फोटो न्याहाळत बसले. तेवढ्यात त्यांच्या मुलाने, श्रेयसने त्यांना हाक मारली आणि तो काकांच्या खोलीत गेला.. त्याला बघून काका थोडे गोंधळले आणि त्यांनी आपला मोबाईल लपवला. श्रेयसला त्यांचं वागणं जरा विचित्रच वाटलं. पण ‘असेल काहीतरी पर्सनल’ असा विचार करून त्याने विषय सोडून दिला आणि त्यांना घेऊन जेवायला बाहेर गेला.. मात्र, अशोक काकांचं जेवणाकडेही लक्ष नसल्याचं त्याला जाणवलं. श्रेयसने त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र अशोक काकांनी त्यांना काहीच सांगितलं नाही आणि ‘काळजी करू नकोस’ असं म्हंटलं. त्यामुळे श्रेयसनेही विषय वाढविला नाही. 

दुसर्‍या दिवशी अशोक काकांनी घाईघाईने निशाला फोन केला. त्यांनी तिला तिने फोटो पाठविलेल्या एका तरुणीला भेटण्याबद्दल सांगितलं. ‘ठीक आहे सर, पण त्यासाठी आधी तुम्हाला बुकिंग अमाऊंट भरावी लागेल..’ निशाने त्यांना सांगितलं.  आपल्या ‘ड्रीमगर्ल’ ला भेटायला मिळणार या आनंदात अशोक काकांनीही कसलाही विचार न करता पैसे देण्यास कबूल केले. निशाने सर्व बँक डिटेल्स पाठविल्या आणि प्रथम 20 हजार रु. खात्यात भरायला सांगितले. अशोक काकांनी क्षणाचाही विलंब न करता निशाने सांगितलेल्या खात्यात 50 हजार रु. ट्रान्सफर केले… त्यानंतर पुढील काही दिवस निशाने अशोक काकांना बोलण्यात भुलवून ठेवलं आणि काकांना पुन्हा त्याच अकाऊंटमध्ये दीड लाख रु. ट्रान्सफर करण्यास सांगितले… अशोक काकांनी दुसर्‍या वेळीही पैसे ट्रान्सफर केले. निशाने जवळपास 3 ते 4 वेळा अशोक काकांकडून लाखो रुपये ट्रान्सफर करून घेतले होते, मात्र तिने कबूल केल्याप्रमाणे कोणत्याही तरुणीची भेट अद्याप अशोक काकांशी करून दिली नव्हती..

2 दिवसांनी श्रेयसने त्याच्या कामासाठी बँकेतून स्वतःचे आणि अशोक काकांच्या खात्यातील रक्कमेचे डिटेल्स मागवून घेतले.. त्यात त्याला अशोक काकांनी लाखोंची रक्कम एका ठराविक अकाऊंटमध्ये वारंवार ट्रान्सफर केल्याचं आढळलं.. त्याला कळेचना की, बाबा एवढी मोठी रक्कम कोणाला देतायेत?.. तर दुसरीकडे अशोक काकांना मात्र आता संशय येऊ लागला होता. त्यांनी निशाला फोन करून आता ते पैसे देणार नाहीत असं सांगितलं.. हे ऐकल्यावर निशा त्यांना ब्लॅकमेल करू लागली… त्यांनी फोनवर तरुण मुलींशी केलेलं संभाषण, ई-मेल्स कंपनीकडे असून हे सर्व पुरावे अशोक काकांच्या घरी पाठविण्याची धमकी ती काकांना देऊ लागली… काका घाबरून ती म्हणेल तेवढी रक्कम तिच्या बँक खात्यात जमा करू लागले…

मात्र, श्रेयसने बाबांशी बोलायचं ठरवलं… अशोक काकांनी त्याला सर्व हकीकत सांगितल्यावर श्रेयसने थेट पोलिस स्टेशन गाठलं आणि डेटिंग कंपनीविरोधात तक्रार दाखल केली.. इन्स्पेक्टर थोरातांनीही डोक्याला हात मारला! पण, घटनेचं गांभिर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरविली.. त्यांनी अशोककाकांना निशाला फोन करायला सांगितला जेणेकरून तिचा नंबर टे्रस करता येईल.. अशोक काकांनी इन्स्पेक्टर थोरातांच्या सांगण्यावरून निशाला फोन केला आणि पैसे द्यायला कबूल असल्याचं सांगून तिला बोलण्यात गुंतवून ठेवलं.. तेवढ्या वेळात पोलिसांनी तिचा नंबर ट्रेस केला आणि तिच्या अड्ड्यावर धाड टाकली…. तिथे तिचे आणखी 2 साथीदार पोलिसांच्या हाती लागले… त्यांना इन्स्पेक्टर थोरात पोलीस स्टेशनला घेऊन आले. गुन्हा कबूल करून घेतला.. मात्र अशोक काकांसारख्या शिकलेल्या माणसानेही अशा कंपन्यांवर विश्वास ठेवल्याने त्यांचे नुकसान झाले त्याबद्दल त्यांनाही समज दिली…

Back to top button