बुजगावणं | पुढारी | पुढारी

बुजगावणं | पुढारी

डी. एच. पाटील, म्हाकवे, कोल्हापूर

शेजारच्या शेतातील जानबा नानाजवळ आला. दोघेही थंडीवर बोलत होते. थोड्यावेळाने जानबाला काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. ‘नाना, कसलातरी वास येतोय. कुठं जनावर मेलंय वाटतं?’ असे म्हणत दोघे हातात खुरपे घेऊन रानाच्या सभोवताली फिरले. वास मात्र रानाच्या मध्यभागातून येत होता. दोघे तिथे आले; मात्र कुठेच काही दिसेना. नकळत जानबाची नजर एका उभ्या केलेल्या बुजगावण्याकडं गेली न् तो दचकला…

पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यानंतर यावर्षी थंडीचे प्रमाण वाढले होते. नऊ वाजले तरी अंगातून हुडहुडी जात नव्हती. रात्रभर गोंगाट करणारी कुत्री पाय दुमडून झोपत होती.  थंडी वाढल्याने शाळूचे पीकही जोमात होते.  बर्‍याच ठिकाणी शाळू पिकांची उंची सात फुटांवर होती. गावच्या पाणंदीच्या वरच्या बाजूला असणारा पळस फुलून गेला होता. पळसाच्या फुलातील मकरंद चाखायला पक्ष्यांची झुंबड उडाली होती. सकाळी थंडीत पोपटाची पोपटपंची सुरू होती. कोवळी सोनेरी किरणं दवबिंदूचे अस्तित्व पळवून लावत होती. या थंडीतच शाळू हुरड्यावर आल्याने पाखरे राखण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली होती.  

नानाचा शाळू हुरड्यावर आला होता.  पहाटेच्या थंडीत नाना पाखरं राखायला बिरोबाचा माळ गाठायचा.  आजही तो लगबगीने पाखराकडं निघाला होता. पाणंद ओलांडून तो माळावर आला. पळसाच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता.  तो रानात आला. चार मेढ्यांच्या मचाणावर चढला. गोफण हातात घेतली अन् मातीची ढेकळं पिकात भिरकावून दिली तसा पाखरांचा भिरा उडाला अन् लाईटच्या तारेवर बसला. नानाची गोफण फिरत होती. तोंडातून हुर्रर्रयाऽऽ अहाऽऽ असे आवाज निघत होते. 

सूर्यकिरणं आता बरीच वर आलेली. नानानं शेतातील कचरा गोळा करून शेकोटी पेटवली. दिवस बराच वर आल्यावर पाखरांच्या संख्येत घट झाली. ऊन बरंच झालं होतं. शेजारच्या शेतातील जानबा नानाजवळ आला. दोघेही थंडीवर बोलत होते. मात्र थोड्यावेळाने जानबाला काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. ‘नाना, कसलातरी वास येतोय.  काय जनावर मेलंय वाटतं?’ असे म्हणत दोघे हातात खुरपे घेऊन रानाच्या सभोवताली फिरले. वास मात्र  रानाच्या मध्यभागातून येत होता. दोघे तिथे आले; मात्र कुठेच काही दिसेना.नकळत जानबाची नजर एका उभ्या केलेल्या बुजगावण्याकडं गेली न् तो दचकला.

बुजगावण्यामधून पाण्याचे घाण थेंब खाली पडत होते. दोघे घाबरले. जवळ जाऊन त्यानी पाहिले. बुजगावणं हातातल्या खुरप्यानं फाडलं अन् ते दचकले.  बुजगावण्यात एका तरुणाचा कुजलेला मृतदेह होता.  दोघेही गावाकडे सटकले. नाना पूर्ण घाबरून गेला होता.  जानबानं सरपंचांना गाठले. बातमी ऐकून सरपंचही दचकले. मग शहानिशा करून पोलिस ठाण्यात वर्दी दिल्यानंतर तासाभरात पोलिस दाखल झाले. पोलिसांनी बुजगावणं खाली काढले. भाताचे पिंजर अन् त्यात मृतदेह लपविला होता. 

पंचनामा  करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी नानाचा शाळू पिंजून काढला. शेताजवळील भाग तपासून पाहिला. त्यात गावतील बघे आणि पोलिस यांनी नानाचा बराचसा शाळू तुडवून आडवा केला. नाना बघतच होता. पण ‘ह्यो तपासाचा किडा वारंवार नको’ असं नानाला वाटत होतं. पोलिसांना तपासात फारसं काही आढळून आलं नाही.  

पोलिसांनी गावात, जवळपासच्या गावातील कोणी तरुण बेपत्ता आहे का? याची चौकशी केली असता मयत तरुण हा गावातील नसल्याचे दिसून आले.  मृतदेहावरील कपडे पाहता तो चांगल्या घरातील वाटत होता. यामुळे तो शहरी भागातील असावा असा अंदाज पोलिसांनी बांधून तपास सुरू केला. याबाबत अनेक पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची तपासणी करण्यात आली; मात्र संबंधित वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद कुठेही आढळून येत नव्हती. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी पोलिसांना धडपड करावी लागत होती.   पोलिस तपास सुरू असताना वैद्यकीय अहवाल आला. त्यात, मयत इसमाचा खून करण्यात आला असून डोक्यात जड वस्तूचा मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करून पाच दिवसांपूर्वी हा खून झाल्याचे म्हटले होते. आता सहा-सात दिवस उलटूनही ओळख पटत नसल्याने वृत्तपत्रात बातमी देण्यात आली नि ही मात्रा लागू पडली. पोलिस तपासणीसाठी बाहेर पडत असतानाच एक तरुण हातात एक वृत्तपत्र घेऊन आला. ‘साहेब,  या फोटोतील तरुणाला मी ओळखतो.’ आवाज ऐकताच साहेब जागेवरून उठले. तरुणाला बसायला खुर्ची दिली. 

‘हा तरुण कुलाब्याला राहतो. शिवाय चांगल्या कामावर आहे. मी रिक्षाने बर्‍याचदा याला  सोडले आहे ऑफिसला.’ पोलिसांनी त्याच्याकडून घरचा  व ऑफिसचा पत्ता घेतला.  पत्त्यावर पोलिस पोहोचले. तिथे एका तरुणीने दार उघडले. मयताचा फोटो दाखविताच तिने ‘राजू’ म्हणून हंबरडा फोडला. 

‘साहेब, राजू कंपनीच्या कामासाठी गेले होते दुबईला. पंधरा दिवसांसाठी. ते तिकडूनच कधीतरी फोन करतात. आठवडा होऊन गेला तरी फोन आला नाही म्हणून मी वाट पाहत होते अन् हे कसे काय झाले ओऽ’

‘हे पहा, राजूचा खून करण्यात आलाय. तुमचा कुणावर संशय?’

‘साहेब, देवमाणूस होते ते. कामाशिवाय दुसरा कसलाही विचार करत नव्हते ते.’ असे म्हणून ती रडू लागली.

पोलिसांनी राजू काम करत असलेल्या कंपनीत चौकशी केली. तिथे राजू दुबईला गेल्याचे दिसत होते. तो त्यानंतर परतही आला होता. सर्व कागदपत्रे योग्य दिसत होती. राजू मुंबईत येऊन दोन दिवस झाले होते. मुंबईत पोहोचले असल्याचे विमानतळावर आढळून येत होते. मग तो घरी येण्याऐवजी त्याचा मृतदेह चाळीस किमीच्या खेड्यात कसा पोहोचला? हा प्रश्न पोलिसांना पडला.

पोलिसांनी पुन्हा कंपनीत चौकशी केली. राजूचे कुणाबरोबर भांडण, लफडे आहे का? अशी चौकशी केली. मात्र येथेही पोलिस अपयशी ठरले.  

पोलिसांनी कंपनीच्या जवळपास पाळत ठेवली.  तो काम करत असलेल्या केबिनच्या शिपायाला आत टाकण्याची धमकीही दिली. पाहुणचार दिला; मात्र ‘साहेब, खूप चांगले होते. अडीनडीला सर्वांना मदत करायचे. कधीच कोणाला रागावत नव्हते.’ मग मात्र राजूचा खून कोणी, का करावा? हे कोडे सुटत नव्हते. आता मात्र पोलिसांनी राजूच्या बायकोवर पाळत ठेवली. एके दिवशी एक तरुण राजूच्या घरात जाताना दिसला. साध्या वेशातील पोलिसांनी त्याला हटकताच तो तरुण पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. पाहुणचार दिला. मग तो पोपटासारखे बोलू लागला.

‘साहेब, आम्हीच दोघांनी मारलं राजूला. मी राजूचा मित्र. नेहमीच त्याच्या घरी यायचो. यातूनच माझे  व त्याच्या बायकोचे प्रेम जमले. तो बाहेर गेला की आम्ही दोघेच घरी असायचो. एके दिवशी आम्ही दोघे राजूला सापडलो. खूप राडा झाला. त्या दिवसापासून आम्ही चोरून भेटू लागलो. त्याची बायको – राणीनं मला ‘राजूला संपव, त्याशिवाय आपण भेटायचं नाही’ असं बजावलं.  तो दुबईला गेला होता. तिथून तो मुंबईत आला. 

मी ड्रायव्हरच्या रूपात गाडी घेऊन आलो. वाटेत सरबतामधून गुंगीचं औषध पाजलं. बेशुद्ध झाल्यावर वाटेतच त्याचा खून केला. माझ्या पाहुण्याच्या गावात घेऊन गेलो. तिथे मृतदेह पुरणार होतो पण शेतात एक बुजगावणं उभा केलेले दिसले. मग यात मृतदेह लपविला अन् माघारी मुंबईला आलो.’

खुनी कितीही हुशार असला तरी तो फसतोच. राजूच्या मित्राने ड्रायव्हरचं सोंग घेऊन आपल्या मित्राचा काटा काढला. तर त्याच्या बायकोने प्रामाणिकपणाचे सोंग घेऊन आपल्या नवर्‍याला फसवले. पण, शेवटी एक बुजगावणंच जेलमध्ये घेऊन गेलं दोघांना!

Back to top button