रोपांची शक्ती : सिलिकॉनची संजीवनी | पुढारी

रोपांची शक्ती : सिलिकॉनची संजीवनी

रोपांना आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी एकंदर 18 पोषक तत्त्वांची गरज असते. सिलिकॉन हा त्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. रोपांची शक्ती आणि कठोरता वाढविण्याचे काम मुख्यत्वे सिलिकॉन हा घटक करतो.

सिलिकॉनची उच्च क्षमता रोपांच्या ऊतींमध्ये सामावलेली असते. रोपांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सिलिकॉन महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण प्रतिकार तंत्राने तो युक्त आहे. मातीत ऑक्सिजननंतर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा सिलिकॉन हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. सिलिकॉन डायऑक्साईड हा मातीच्या द्रव्यमानाच्या 50 ते 70 टक्के प्रमाणात आढळणारा घटक आहे. तसे पाहायला गेल्यास रोपांची वाढ आणि विकासात सिलिकॉनची असलेली भूमिका विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत दुर्लक्षितच झाली होती. कारण, निसर्गात सिलिकॉनची कमतरता किंवा तो विषारी होण्याची लक्षणे आणि परिणाम तोपर्यंत स्पष्टपणे दिसून आले नव्हते. शिवाय, मातीत सिलिकॉन भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे वनस्पती शास्त्रज्ञांनी त्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते.

नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमच्या स्वरूपात रासायनिक खतांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मातीतील सिलिकॉनचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे सिलिकॉनचे महत्त्व शास्त्रज्ञांना समजले. मातीत सिलिकॉनचे असलेले महत्त्व ही आता सर्वमान्य बाब झाली आहे. सिलिकॉन हा घटक रोपांची वाढ, विकास आणि उत्पादनक्षमता याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती देणारा घटक म्हणून काम करतो. हा घटक भात, ऊस, गहू आणि मका या पिकांचे उत्पादन वाढविणारा तसेच काकडी, भात, ऊस आणि गव्हासारख्या पिकांच्या अनेक प्रजातींवर मातीद्वारे संक्रमित होणारे रोग आणि पानांवर पडणारे बुरशीजन्य रोग यांपासून रक्षण करणारा घटक असल्याचे सिद्ध झाले आहे. जलतणावाच्या परिस्थितीत सिलिकॉनचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित होते. अनेक प्रकारच्या जैविक आणि अजैविक रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता सिलिकॉनमध्ये असते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अनेक पिकांवर पडणार्‍या बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाजन्य आजारांना नियंत्रित करण्यास सिलिकॉन सक्षम असतो.

उदाहरणार्थ, पाने आणि खोडांवर पडणारे विविध रोग, भुर्‍या रंगाचे कीटक, पाने वाळविणार्‍या किडींचा प्रतिकार करण्यास सिलिकॉन सक्षम आहे. विशेषतः भात आणि उसाच्या पिकांवर पडणारे रोग सिलिकॉनमुळे नियंत्रित होतात आणि या पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते. काकडी, जवस आणि गव्हाच्या पिकावर पडणारे बुरशीजन्य रोग सिलिकॉनमुळे नियंत्रित करता येतात. त्याचप्रमाणे उसाच्या पेरावर आणि पानांवर पडणार्‍या तांबेर्‍यापासून बचावासाठीही हा घटक प्रभावी ठरतो. या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्याची प्रतिकारक्षमता पिकामध्ये निर्माण करणारा हा घटक आहे. कोशिकांच्या तळाशी सिलिकॉनचा दुहेरी स्तर जमा होऊन अनेक रोगांपासून पिकांचा बचाव करतो. त्यामुळे बाहेरून बुरशी आणि बॅक्टेरिया पानात प्रवेश करू शकत नाहीत. तसेच संक्रमणाची प्रक्रिया रोखली जाते.

स्टेम बोरर, लिफ हॉपर अशा किडींबरोबरच अनेक प्रकारच्या कीटकांपासून पिकांचा बचाव करण्याची क्षमता सिलिकॉनमध्ये असते. या प्रकारचे कीटक पिकाची पाने कुरतडतात. या प्रक्रियेच्या विरोधात एक सक्षम प्रतिकारतंत्र तयार करण्याचे काम सिलिकॉन करतो. रोपांच्या ऊतींमध्ये सिलिकॉन रोगप्रतिकारक क्षमता तयार करतो. त्यामुळे कीटक पिकांचे नुकसान करू शकत नाहीत. रासायनिक घटकांपासून पसरणार्‍या दुष्परिणामांपासून म्हणजेच क्षार, धातूजन्य विषारी द्रव्ये, पोषक तत्त्वांचे असंतुलन अशा धोक्यांपासून तसेच पीक सुकणे, किरणोत्सर्ग, उच्च तापमान, थंडी अशा नैसर्गिक घटकांपासून पिकांचा बचाव करण्यासाठीही सिलिकॉन उपयुक्त आहे. पाने आणि ऊतींमध्ये सिलिकॉन विशेषत्वाने सामावला जातो आणि तेथे त्याचा प्रभाव दिसूनही येतो.

रोपांमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस यांची उपलब्धता वाढविण्याबरोबरच या द्रव्यांचे जमिनीद्वारे होणार्‍या संक्रमणापासून संरक्षण करण्याचे कामही सिलिकॉन करतो. त्यामुळे नायट्रोजन आणि फॉस्फरसचे जमिनीतील प्रमाणही वाढते. जमिनीत अनेक हानिकारक खनिजेही असतात. लोह आणि मँगनीजसारखी खनिजे मातीत अधिक प्रमाणात असल्यास पिकांच्या वाढीसाठी ते चांगले नसते. ही अतिरिक्त खनिजे नियंत्रित करण्याचे काम सिलिकॉन करतो. त्यामुळे या खनिजांच्या अतिरिक्त वाढीमुळे पिकांचे होणारे नुकसान टळू शकते. रोपांची तणाव प्रतिरोधकता वाढविण्याचे कामही सिलिकॉनचे आहे. कारण सिलिकॉन हा रोपांमध्ये सामावला जाणारा सर्वांत मोठा घटक आहे. त्यामुळेच पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तो एक आवश्यक घटक आहे. रोपांवर पडणारे रोग आणि किडींपासून बचाव करण्याबरोबरच जलतणाव म्हणजेच पाण्याची उपलब्धता कमी असताना रोपे सुकण्याचा धोका टाळण्याचे कामही सिलिकॉन करतो. अशा प्रकारे मातीतील हा एक मूलभूत घटक अनेक प्रकारे पिकांचे रक्षण आणि संवर्धन करीत असतो.

– राजीव मुळ्ये

Back to top button