अ‍ॅस्टर लागवड कशी करावी? | पुढारी

अ‍ॅस्टर लागवड कशी करावी?

अ‍ॅस्टर लागवड करताना सगळे क्षेत्र एकाच वेळी न लावता तीन अगर चार टप्प्यांत लावावे, म्हणजे फुले अधिक काळ बाजारात पाठविता येतील. मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि सेंद्रिय खतयुक्त जमीन या फूलपिकास आवश्यक असते. वरकस, हलक्या जमिनी, तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची लागवड करू नये.

जातींची निवड :

1. फुले गणेश व्हाईट : ही जात लांब दांड्याची फुले मिळण्यासाठी उपयुक्त असून, फुले शुभ्र पांढर्‍या रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो.

2. फुले गणेश पिंक : फुलावर लवकर येणारी जात असून, निमपसरी, आकर्षक गुलाबी रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो.

3. फुले गणेश व्हायलेट : ही जात निमपसरी, फुलावर लवकर येणारी आणि गडद जांभळ्या रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो.

4. गणेश पर्पल : फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. फुलांचे चांगले उत्पादन मिळते.

अ‍ॅस्टर लागवडीपूर्वी जमिनीची दोन वेळा खोल नांगरट करावी. धसकटे आणि हरळीच्या काशा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. हेक्टरी 12 टन शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. लागवडीपूर्वी हेक्टरी 50 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. लागवडीसाठी 60 सेमी अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. लागवड 60ु30 सेमी किंवा 45ु30 सेमी किंवा 45ु45 सेमी अंतरावर करतात.

सरी-वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळे शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपांची लागवड सायंकाळी करावी. लागवडीनंतर पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. लागवडीनंतर चार ते पाच आठवड्यांनी हेक्टरी 50 किलो नत्राचा हप्ता द्यावा. अ‍ॅस्टर पिकाच्या मुळ्या जास्त खोलवर जात नसल्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वाफसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे जरूरीचे आहे.

– जयदीप नार्वेकर

Back to top button