समस्या चोपण जमिनींची | पुढारी

समस्या चोपण जमिनींची

क्षारयुक्त चोपण जमिनी ही समस्या सध्या सर्वदूर दिसत आहे. अशा जमिनींचे गुणधर्म आणि त्यात करता येण्यासारख्या सुधारणा याबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. जमिनी क्षारयुक्त बनवल्यानंतर त्याची पुढची पायरी म्हणजे चोपण किंवा चिबड जमिनी (अल्काईन सॉईल) होय. जमिनीतील मातीच्या कणांना 15 टक्के जास्त सोडियम चिकटला असेल तर त्या चोपण बनतात. मातीचे सूक्ष्म कण क्रियाशील असून, ते रासायनिक विघटनाच्या क्रियेत भाग घेतात.

या विनिमयाच्या क्रियेत भाग घेणार्‍या अल्काना युक्त अल्के (एक्स्चेंबल बेसेस) असे म्हणतात. पाण्यात क्षार असतात. हे पाणी पाटातून जाते त्यावेळी त्यातील सोडियमचे क्षार मातीच्या क्रियाशील सूक्ष्म कणांना चिकटतात आणि अशा रीतीने माती सोडीयमयुक्त बनते. मातीच्या कणाभोवती विनिमयात्मक सोडियमचे प्रमाण एकंदर विम्ल घटकांच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास आणि मुक्त सोडियम कार्बोनेट यांचे प्रमाण वाढल्यास चोपण जमिनी तयार होतात.

अशा जमिनीत कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट यांचे प्रमाण वाढून जमिनीची जलधारणाशक्ती कमी होते. जमिनीचा पोत बिघडतोे. जमिनीच्या निचर्‍याची क्षमता कमी होते आणि जमीन कडक झाल्याने तिची मशागत करणे अवघड जाते. जमिनीत असणारे लोह, मॅगनिज, जस्त, स्फुरद हे उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे झाडे खुरटी राहून अशा जमिनीत चांगल्या प्रकारे वाढू शकत नाहीत.

चोपण जमिनींची दोन मार्गाने सुधारणा करता येते.
* जमिनीत निचर्‍याची व्यवस्था करणे.

* जमिनीत मुक्त सोडियमचे प्रमाण कमी करणे.

* अशा जमिनी खालील उपाय करून सुधारणा करणे शक्य होतेे.

* जमीन खोलवर नांगरावी आणि हेक्टरी 50 गाड्या शेणखत किंवा 5.7 टन प्रेसड् केक किंवा 5 ते 10 टन जिप्सम जमिनीत 10 ते 15 सेंटीमीटर खोलीपर्यंत टाकावे.

* योग्य अंतरावर बांध घालावेत. उतारास आडव्या सर्‍या पाडाव्यात. पाचवी किंवा सहावी सरी इतर सर्‍यापेक्षा खोल ठेवावी आणि तिचे तोंड चराकडे उघडे ठेवावे.

* जमिनीस 1 ते 2 वेळा पाणी देऊन ती एक महिना तशीच ठेवावी.

* 1-1.5 मीटर खोलीचे चर 30-60 मीटर अंतरावर खोदावेत त्यामुळे पाण्यात विरघळणारा सोडियम निघून जाईल. नैसर्गिक चर आणि नाले यामधील गाळ काढून त्या खोल कराव्यात.

* शेतातील काडीकचरा, भुसा जमिनीत टाकावा.

* साखरकंद, बोरू, जांभूळ, खजूर, लसूणघास किंवा हिरवळीची पिके धैंचा, शेवरी, बरसमी इत्यादी क्षारास प्रतिकार करणारी पिके घ्यावीत.

* आंबा, निलेश्वर, द्राक्ष, डॉगरीज, लिंबूवर्गीय-क्लिओपाना, मंडारीन, रंगपूर लाइम इत्यादी क्षारास प्रतिकार करणार्‍या रूट स्टॉकच्या जाती वापराव्यात.

* पिकांना योग्य अंतराने पाणी द्यावे. क्षारयुक्त पाणी असल्यास पाण्याची एक पाळी आणि गोड्या पाण्याची एक पाळी याप्रमाणे पाणी द्यावे.

* उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यासारखी पिके घ्यावीत.

* अमोनियम स्फटिक किंवा अमोनियम सल्फेट नायट्रेट यासारखी आम्लयुक्त खते जमिनीत टाकावीत आणि त्याची मात्रा 25 टक्क्यांनी वाढवावी.

* पिके उभी असताना अधूनमधून आंतरमशागत करावी.

* जमिनीत सोडियम टाकून सोडियमयुक्त जमीन चुनायुक्त करून घ्यावी. सोडियम सल्फेटसारखे बाहेर पडणारे क्षार पाण्यात सहज विरघळतात आणि निचर्‍याची व्यवस्था असल्यास सहज बाहेर काढता येतात.

– सतीश जाधव

Back to top button