वनस्पतीमधील उपयुक्‍त विषारी घटक | पुढारी

वनस्पतीमधील उपयुक्‍त विषारी घटक

निसर्गातील अनेक वनस्पतींमध्ये विषारी द्रव्यांचे प्रमाण असल्यामुळे त्यांच्यातील रोगनाशक गुणधर्माचा उपयोग करून पिकावरील रोग नियंत्रण करणे सोपे झाले आहे. बर्‍याच वनस्पतींचा आणि वनस्पतीजन्य पदार्थांचा उपयोग बुरशीनाशके/रोगनाशके पिकांवरील फवारण्यामुळे त्यांचे अंश पिकामध्ये राहत नाहीत. त्यामुळे अशा पिकांचा मानवी आरोग्यावर कोणताच अनिष्ट परिणाम होत नाही. बुरशीनाशक गुणधर्म असलेल्या बर्‍याचशा वनस्पती सर्व प्रकारच्या हवामानामध्ये वाढणार्‍या असल्यामुळे आपल्याकडे सहज उपलब्ध होतात. बुरशीनाशक/रोगनाशक गुणधर्म असलेल्या वनस्पतींची नावे, त्यांचा रोगनाशकाकरिता उपयुक्‍त भाग, त्यापासून नियंत्रित होणारे रोग, त्यांच्या वापर पद्धती यासंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

मिरची

मिरचीमध्ये कॅपसॉसिन हे तिखट द्रव असते. या द्रव्याचा उपयोग बुरशीनाशक म्हणून होतो. काकडी आणि तंबाखूवरील विषाणूजन्य रोग नियंत्रणाकरिता मिरचीचा उपयोग करतात. पिकाला विषाणू रोगाची बाधा होण्यापूर्वी मिरचीच्या पानांचा रस फवारल्यास विषाणू रोगांचे पूर्ण नियंत्रण होते.

लसूण

लसणामध्ये अलासिसीन गंधकाचे रसायन असून, त्याचा बुरशीनाशक म्हणून उपयोग होतो. भातावरील करपा, पानावरील ठिपके, भुरी आणि वालावरील तांबेरा रोगांवर लसणाचा उपयोग होतो. लसणाच्या पाकळ्या वाटून केरोसिनमध्ये भिजत ठेवून पिकावर फवारणी करावी.

तंबाखू

तंबाखूमधील निकोटीन द्रव वाल आणि गव्हावरील तांबेरा, बटाट्यावरील कासाहुई हा पाने मुरडणारा विषाणू रोग इत्यादी रोगांकरिता परिणामकारक बुरशीनाशक म्हणून उपयोगी आहे. विषाणूजन्य रोगांसाठी तंबाखूची भुकटी मातीत मिसळावी.

धोतरा

धोतर्‍याची पाने किंवा मुळ्यांचा अर्क काढून पाण्यातून फवारल्यास पानावरील अल्टरनेरिया ठिपके, बटाट्यावरील करपा, भाताच्या पानावरील तपकिरी ठिपके इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

एरंडी

जमिनीत बुरशीपासून पिकांना होणार्‍या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी पिकाच्या पेरणीपूर्वी एरंडीची पेंड जमिनीत मिसळावी.

तुळस

तुळशीची पाने वाटून रस पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकावरील बुरशी आणि विषाणूजन्य रोगांचा बंदोबस्त होतो.

निलगिरी

निलगिरीची पाने एक भाग आणि दोन भाग पाणी वाटून रस काढून त्याचा 10 टक्के भाग पाण्यात मिसळून भाजीपाल्याच्या रोपवाटिकेतील रोपांवरील मर रोगावर फवारणी केल्यास नियंत्रण होते.

– प्रसाद पाटील

Back to top button