करडई पीक संरक्षण | पुढारी

करडई पीक संरक्षण

नवनाथ वारे : करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलापेक्षा बरेच कमी असल्याने हृदय रोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या बरेच द़ृष्टीने उपयुक्त आहे.

करडई तेलाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढत नाही. करडईच्या या गुणधर्मामुळे करडईच्या तेलाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी करडईच्या पिकाला प्राधान्य देऊ लागले आहेत. अशा या पिकाच्या पीक संरक्षणाबाबत काही शिफारशी केल्या आहेत.

1) मावा : ही करडईवरील महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव पिकांच्या संपूर्ण कालावधीत आढळून येतो. पिकाची पेरणी उशिरा केल्यास ही कीड फार मोठ्या प्रमाणावर पडते आणि त्यामुळे पीकाचे 20-25 टक्के नुकसान होते. हा मावा इतर पिकांवरील माव्यापेक्षा आकाराने मोठा असून काळसर रंगाचा असतो माव्याची पिल्ले पानातील कोवळ्या शेंड्यावरील तसेच खोडातील रस शोषून घेतात, त्यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही. याशिवाय मावा मधासारखा चिकट पदार्थ पानावर काळ्या रंगाची बुरशी चढते. माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास करडईचे संपूर्ण पीक काळसर दिसते. पिकांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होते.

नियंत्रण : माव्याचा उपद्रव पिकास नोव्हेंबरपासून सुरू होतो. म्हणून या किडीचा उपद्रव होऊ नये यासाठी करडईची पेरणी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात संपवावी. यानंतरही किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पहिली फवारणी 5 टक्के निंबोळी अर्काची आणि दुसरी फवारणी 30 टक्के प्रवाही डायमेथोएट 725 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी या प्रमाणात करावी. नवीन शिफारशीनुसार 25 टक्के थायोमेथाक्झाम (अ‍ॅक्ट्रा) 100 ग्रॅम किंवा 20 टक्के अ‍ॅसिटमिप्रीड (प्राईड) 100 मिली 500 लि. पाणी /हे फवारावे.

2) पाने आणि बोंडे खाणार्‍या अळ्या : करडईवर या किडीच्या अळ्याचा प्रादुर्भाव पीक साधारणत दीड महिन्याचे झाल्यापासून सुरू होतो. घाटे अळी सुरुवातीस लहान, हिरवट रंगाची असून पूर्ण वाढलेली अळी गर्द तपकिरी रंगाची असते. उंट अळी करड्या रंगाची काळपट अथवा राखट रंगाची असून तिच्या शरीरावर पांढरे अथवा तांबडे पट्टे असतात. अळी चालताना मध्यभागी उंचवाटा तयार करून चालते म्हणून तिला उंट अळी म्हणतात. या अळ्या फार खादाड असून त्या पाने कोवळी बोंडे कुरतडून खातात. पानांना छिद्र पाडतात आणि कोवळ्या बोडांतील दाणे खाऊन पिकाचे नुकसान करतात. त्यामुळे पिकाचा जोम कमी होऊन उत्पादनात घट होते.

नियंत्रण : या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस 100 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.

Back to top button