अत्तराची सुगंधी शेती | पुढारी

अत्तराची सुगंधी शेती

पाऊस कोसळला तरच खुरटे गवत उगवायचे, अन्यथा बारा महिने कोळसिंद्याने सरबरणार्‍या फोंड्या माळावर कठोर परिश्रमाने अत्तराची सुगंधी शेती फुलवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे अर्जुनी (ता. कागल) येथील प्रयोगशील शेतकरी प्रकाश आनंदा पाटील यांनी. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी केलेली कमी कालावधीत, कमी पाण्यात व श्रमात भरघोस उत्पन्न देणारी सुगंधी वनस्पती शेती शेतकर्‍यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी हे वेगळे पीक शेती नावीन्यपूर्ण ठरणार आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पाटील यांनी अनेक वर्षे ओसाड शेतीत अनेक प्रयोग केले. अखेर सोशल मीडियाचा आधार घेत अडीच एकर शेतीत जिरेनियम वनस्पती लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पत्नी सौ. शुभांगी यांची मदत लाभली. इंटरनेटचा आधार घेत पुणे व अहमदनगर येथून जिरेनियमची रोपे आयात केली. शास्त्रीय पद्धतीने वनस्पतींची जोपासना केली. फुटव्यातून वर्षाला चार हंगाम घेता येतात, एकरी वार्षिक 4 लाख रु. उत्पन्न सहज मिळवता येते. रोपे लागण खर्च ऊस शेतीच्या केवळ 20 टक्के आहे. लागणीनंतर मशागत साठी मनुष्यबळ कमी लागते.

पाटील यांनी आज दोन हंगाम घेतले आहेत. संबंधित तेल कंपनीशी करार केला आहे. पूर्ण वाढ झालेल्या पिकाची कंपनी खरेदी करून स्वखर्चाने वाहतूक करते. यामुळे भविष्यात ही शेती कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहे. ऊस शेतीला पर्याय उपलब्ध झाला आहे. या पिकाला जागतिक पातळीवर मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते.

जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी

जिरेनियम वनस्पतीसह लिमेन ग्रास, सिट्रेनाला या सुगंधी वनस्पतींच्या तेलाची जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हमीभाव असलेल्या पिकांची लागवड करून जास्तीत जास्त साठवणूक करून जागतिक पातळीवर उत्पन्न पोहोचवणे व अधिक पैसा मिळणार्‍या पिकांचे शेतकर्‍यांनी उत्पन्न घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

– रमेश कांबळे, माद्याळ

Back to top button