अर्थतंत्र : फळांच्या मूल्यवृद्धीसाठी… | पुढारी

अर्थतंत्र : फळांच्या मूल्यवृद्धीसाठी...

भारतात शीतपेयांची मागणी आता केवळ उन्हाळ्यातच न राहता वर्षभर दिसू लागली आहे. या शीतपेयांमध्ये फळांच्या रसापासून तयार केलेली शीतपेये आणि कृत्रिम स्वाद आणि साखरेपासून तयार केलेल्या शीतपेयांचा समावेश होतो. रामदेवबाबांचे आवाहन आणि आरोग्याप्रती लोकांमधील जागृतीमुळे ग्राहक आता केवळ फळांच्या रसापासून तयार केलेल्या शीतपेयांचा आग्रह करू लागले आहेत. त्यामुळे फळांची पेये बनविण्याच्या उद्योगांना मोठा वाव निर्माण झाला आहे.

फळांच्या शीतपेयांचे महत्त्व

1) फळांच्या शीतपेयांमध्ये शर्करा, जीवनसत्त्वे, खजिनद्रव्ये, आम्ल आणि इतर घटकद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात.
2) योग्य अशी प्रक्रिया करून फळांची शीतपेये बनविल्यास हंगाव्यतिरिक्तही फळांचा आस्वाद घेता येतो.
3) फळांची पेयं शरीरात कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम करत नाहीत. त्यांचा कोणताही साईड इफेक्ट नसतो.
फळांच्या पेयांचे प्रकार :
फळांपासून अनेक प्रकारची पेय बनविली जातात. त्यात प्रामुख्याने फू्रट ज्यूस स्क्वॅश, फू्रट ज्यूस कॉर्डिअल, सरबत, बार्ली, वॉटर, प्युअर फू्रट ज्यूस, फू्रट ज्यूस कॉन्सट्रेट, फ्रूट ज्यूस बेव्हेरेजेस, फर्मेन्टेड फ्रूट बेव्हरेजेस आदींचा समावेश होतो.
फळांची पेय तयार करण्याच्या
पद्धतील विविध टप्पे :
सर्वच प्रकारच्या फळांचा रस सहजासहजी काढता येत नाही. तसेच एकाच फळांच्या वेगवेगळ्या जातींच्या फळांचा रस काढण्याची पद्धत सारखी नसते. म्हणजेच प्रत्येक फळांपासून त्यावर प्रक्रिया करून पेय तयार करण्याची प्रक्रिया वेगळी असली तरी त्या खालील टप्पे मात्र सारखे असतात.
1) फळ निवडणे आणि स्वच्छ करणे.
2) फळांपासून रस काढणे.
3) रसातील हवा काढून घेणे
4) सतत रस ढवळणे.
5) रस गाळून घेणे आणि स्वच्छ करणे.
6. त्यावर प्रक्रिया करून पेय तयार करणे.
7) अशा पेयाचे पॅकेजिंग करणे.

फळांची निवड महत्त्वाची

अयोग्य फळाची जात निवडल्या गेल्यास त्या पासून रस काढला तरी तो उत्तम प्रतीचा नसतो. तसेच काही रसरशीत फळांपासून रस सहजपणे काढता येत असलातरी त्या पासून उत्तम प्रकारचे पेय बनविता येईलच असे नव्हे. म्हणून फळांपासून पेय तयार करण्याच्या उद्योगात फळांची निवड फार महत्त्वाची असते. फळांची जात, त्याची परिपक्वता, प्रत आणि फळझाडांच्या लागलडीचे स्थान इत्यादी बाबींवर फळांच्या रसांचा स्वाद आणि टिकविण्याची क्षमता अवलंबून असते.

– सत्यजित दुर्वेकर

Back to top button