रणधुमाळी | पुढारी

रणधुमाळी

श्रीमंत सरदार वजारतमाब, अमीर अल् उमराव, सेना खासकेल, नुम्रतजंग, हुकुमतपन्हा, हिम्मतबहादूर, जंगबहादूर महाराज साहेब यांचे चरणी बालके व पोष्य व दासानुदास सोमाजी बिन गोमाजी याचा त्रिवार मुजरा व शिरसाष्टांग दंडवत, विनंती उपरिच. इकडील सर्व क्षेम व खुशाल आहे. वर्तमान बरे आहे. गत दोन सालापासोन ग्रह वक्री जाहले व ऐन साडेसातीत महामारीची संक्रांत वोढविली, तो सेवकास सेवेची कांही संधी प्राप्‍त जाहली नाही. तेणेकरोन दिलास खेद बहुत आहे. तो सांप्रत काळ थोडका सानुकुल आहे. तस्मात धन्यांची सेवा करणेचा समय प्राप्‍त जाहला. ऐसियास हिंदुस्थानात रणधुमाळीचे पडघम वाजत आहेत. नौबत्तीवर टिपरी झडली आहे. ताशे व करणे व मरफे यांचा गदारोळ गगनावेरी आहे. तमाम रान गारुडी भारुन टाकितो, तेणेप्रोा माहोल आहे. हिंदुस्थानातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, दक्षणेस गोमंतक व ईशान्य हिंदुस्थानात मणिपूर आदी प्रांतात रणमैदानाचे वेध सुरू आहेत. मकर संक्रांतीचे अवसरास रणांगणांचा मुहुर्त मुकर्रर होईल, ऐसे अनुमान आहे. ऐसियास श्रीमंत साहेब यांसी रणोत्साह कैसा, त्याचा बयाजवार बितपशील मायना प्रस्तुत खबर थैलीतून धाडीत आहे. तो श्रीमंत सरकार यांणी गोड मानून घेणेचा.

ऐसियास तमाम हिंदुस्थानच्या नजरा येकसमयावच्छेदेकरोन उत्तर प्रदेश प्रांतावरी खिळल्या आहेत. हिंदुस्थानातील मशारनिल्हे प्रांत मातब्बर व बडा बाका. नवलाख लखऊची तेग जिकडे, तिकडे हिंदुस्थानचे तख्त! बरेलीचा बाजार बहरला, की तमाम प्रांतीच्या बाजारपेठात उल्हास. श्री काशी विश्‍वेश्‍वराच्या चरणी अलम हिंदुस्थान नतमस्तक होणार! येणेप्रोा मशारनिल्हे प्रांतीची खासियत व ख्याती. ऐसियास उत्तर प्रदेश प्रांती नावाजिक रणांगण होणार, हे तो काळ्या दगडावरील रेघ, ऐसा मामला. सदर प्रांतातून दिल्‍ली तख्ताचे आमसभेचे दरबारात तब्बल ऐंशी मनसबदार दाखल होतात. मशारनिल्हे प्रांतीचा दबदबा ऐसा की दिल्‍ली तख्तावर कोण्ह, याचा फैसला इथे होणे. दिल्‍ली तख्ती आजवरी सर्वाधिक वजिर-ए-आझम याच प्रांतीचे. सर्वाधिक समय याच प्रांतीचे वजिर-ए-आझम. ऐसियास माघ मासात होणारे रणमैदानाची तयारी जय्यतच आहे. दस्तुरखुद्द वजिर-ए-आझम श्रीमंत नरेंद्रजी मोदी यांणीच भाजप छावणीच्या रणांगणाचा मनसुबा पक्‍का केला असोन जातीनिशी हरयेक किल्‍ला व ठाणे व चौकीसुद्धा रसद व बारुद-गोळा व शस्त्रे-अस्त्रे यांणी सुसज्ज ठेविली आहे. हरयेक ठिकाणी शिबंदी मजबूत आहे. स्वार व पावखलक तेणेप्रोा हुजरातीचे स्वार व शिलेदार व बारगीर यांसी रोजमुरा आगाऊच पुर्ता पोहोच आहे. तोफा व बंदुका व सुतरनाला व जेजाला व रेहकले यांची तर्तूद भारीच आहे. घोडियास चंदीचारा तमाम आहे. येणेप्रोा भाजपचे छावणीत सवंगाई थोर आहे व रणोत्साह दांडगाच आहे. चढे घोडियानिशी जिंकूनच घेऊ, येणेप्रोा हरयेक शिपाई-प्यादाचा बोल आहे. प्रांतीचे पश्‍चिम भागात तेणेप्रोा बुंदेलखंडात कांही गडकिल्ल्यांचे तटबंदीचा बंदोबस्त पक्‍का केला आहे. तेणेकारण छावणीत चिंता किमपि नाही.

ऐसियास समाजवादी पार्टीचे कुलअखत्यार श्रीमंत अखिलेश यादव यांणीही पंचहत्यारे लेवून रणवेष धारण केला आहे. काका शिवपाल बहुत दिसांनी त्यांचे पाठराखण करणेस आले आहेत. बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती बहन यांणीही झुंजीची तयारी जबरदस्त केली आहे. आपले हत्तीवर स्वार होवोन मायावती बहन यांणी बिनी गाठली आहे. सपा छावणी व बसपा छावणी येकदिलाने लढतील, ऐसे दिसत नाही. काँग्रेस रियासतीचेही सपा छावणीशी गूळपीठ जमेल, ऐसा रंग दिसत नाही. काँग्रेसच्या प्रियंका गांधी-वढेरा यांणी रणांगणात उडी घेतली आहे व जातीनिशी घोडियावर स्वार होवोन चौटाप दौड आहे. इरेसरीने आताच दो हाती पट्टा फिरवीत आहेत. येणेप्रोा रियासत व इतर छावणी यांचा मायना आहे. कोण्हाची हातमिळवणी होणेचा संभव नाही. ऐसियास रणांगण चौरंगी व पंचरंगी व बहुरंगी होणारा ऐसा माहोल आहे.

इकडे शीख व जाट यांचे पंजाब प्रांतीचा बरा रंगतदार आहे. सांप्रत पंजाबवर काँग्रेस रियासतीची सत्ता. तत्रअपि सालगुदस्त रियासतीतील बेबंदशाहीने कळस गाठला. सरदार नवज्योतसिंग सिद्धू यांचे वावदुकी कारस्थानाने वजीरपदी असलेले सरदार व कपितान अमरिंदर सिंग हे पायउतार जाहले. श्रीमंत चरणजितसिंग चन्‍नी यांची वजीरपदी वर्णी लागली. तत्रअपि रियासतीत घालमेल बहुत जाहली. तेणेकारण रियासत येकमुखाने रणांगणात उतरणार काय, येविषयी संदेह मात्र आहे. ऐसियास या आधीचे रणांगण जिंकून देणारे सरदार अमरिंदर सिंग यांणी रियासतीस रामराम केला आहे व भाजप छावणीशी त्यांचे संधान आहे. पंजाब प्रांतात प्रथमच श्रीमंत अरविंद केजरीवाल टोपीवाले यांचे आम आदमी छावणीने बस्तान बसवले आहे व काँग्रेस रियासतीतील सुंदोपसुंदीचा आप छावणीस लाभ होईल, ऐसी बोलवा आहे. अकाली दल छावणीचे पूर्वीचे वैभव सांप्रत लयास गेले आहे. तात्पर्य, काँग्रेस रियासत व आप छावणी यांचेतच खरी देमार-घेमार होणार, ऐसा रंग दिसत आहे.

उत्तराखंड प्रांतात सांप्रत भाजपच तख्तनशीन आहे व पुनरपि तख्त हासिल करणेचा चंग भाजप छावणीने बांधला आहे. छावणीने साडेचार सालात वजीर पदात तीन बदल केले, तेणेकारण छावणीत काही बेदिली असलेचे कानोकानी आहे. तत्रअपि भाजप छावणी कंबर कसून दोन हात करणेचे इरेसरीने मैदानात आहे. काँग्रेस रियासतीने लढाईची तुतारी फुंकण्याआधीच तोफाचा भडीमार चालविला आहे व पुनरपि तख्त प्राप्‍त करणेचा मनसुबा बाळगून आहेत. ‘आप’ छावणीही चंचुप्रवेश करणेचे प्रेत्नात आहे. मात्र या प्रांती दिल्‍लीप्रोा डाळ शिजणे कठिण!

गोमंतक व मणिपूर प्रांती भाजपचेच तख्त आहे. दोन्ही प्रांतात छावणीचे लष्कर भरभक्‍कम आहे. रसद-दाणागोटा महामूर आहे. भाले व तलवारीस शिकलखान्यात अहोरात्र शिकल आहेच. दारू गोळ्यांची बाचके अगडीत, तेणेकारण दोन्ही प्रांतात छावणी व उत्साह दांडगाच आहे. घोडी आताच चौखूर आहेत. ऐसियास काँग्रेस रियासतीत गैरमेळ व कारभार विस्कळीत. तरीही रियासत बरी झुंज देणार ऐसे दिसत आहे. तेणेकारण हातोफळी होणार, यात संशय नाही.

सदर पाच प्रांतीचे युद्धाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच गुर्जरदेश व मध्य प्रदेश व कर्णाटक आदी तीन प्रांतांचे रणांगणाचे वेध सुरू होणार आहेत. या तिन्ही प्रांती भाजपचेच सरकार. ऐसियास उपरोक्‍त पाच प्रांतीचे रणांगणाचे जे निर्णय त्यांचा परिणाम या तीन प्रांताचे लढाईवर होणार, ऐसे आहे. उत्तर प्रदेश प्रांतात काँग्रेस रियासतीला कैसे येश मिळते व पंजाब प्रांतात रियासत तख्त राखते का, यातून रियासत सावरणार की आणखी पडझडीस तोंड द्यावे लागणार, याचा फैसला होणेचा आहे. भाजप छावणीस पंजाबात बरा शिरकाव प्राप्‍त जाहल्यास ती जमेची बाजू होणेची हे निश्‍चितच आहे. येणेप्रोा सांप्रत होऊ घातलेले रणांगण पुढे काय होणार याचा ठोकताळा दावील, ऐसे आहे. बहुत काय लिहावे? आमचे आगत्य असो द्यावे. कळावे, ही विनंती. लेखनसीमा!

           आपला आज्ञाधारक,

रणधुमाळी

Back to top button