प्रासंगिक : विचारसमृद्ध महाराष्ट्र | पुढारी

प्रासंगिक : विचारसमृद्ध महाराष्ट्र

प्रा. प्रकाश पवार

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वेगळेपण त्याच्या वैचारिक वाटचालीमध्ये आहे. राज्यातील वैचारिक जडणघडण त्या त्या काळातील समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारी ठरली आहे. महाराष्ट्राला वैचारिक लेखनाची दीर्घ परंपरा आहे. परंतु, तुलनात्मकद़ृष्ट्या समकालीन काळात नवीन वैचारिक चर्चा विश्व मंदावलेले दिसते. येत्या बुधवारी (1 मे) महाराष्ट्र दिन. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील वैचारिक परंपरेचा आढावा घेणारा विशेष लेख…

महाराष्ट्र मंथनातून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यामुळे महाराष्ट्र दिनाला विविध कंगोरे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा कंगोरा म्हणजे महाराष्ट्र दिन वैचारिक मंथन दिन ठरतो. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वेगळेपण त्याच्या वैचारिक वाटचालीमध्ये आहे. महाराष्ट्रातील वैचारिक जडणघडण त्या त्या काळातील समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारी ठरली आहे. इतिहासामध्ये यासंदर्भातील वेगवेगळे टप्पे दिसतात. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत ही प्रक्रिया मंदावली आहे. याचा अर्थ या क्षेत्रातील महाराष्ट्राचे योगदान पूर्णपणे थांबलेले आहे, असा नाही.

आरंभीचा आधुनिक महाराष्ट्र

19 व्या शतकातील महाराष्ट्राची चर्चा म्हणजे आरंभीच्या आधुनिक महाराष्ट्राची चर्चा होय. 1818 नंतर आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीला सुरुवात झाली. आरंभीच्या आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण जवळपास आठ दशकांमध्ये झाली (1818-1900). या कालखंडामध्ये महाराष्ट्राची वैचारिक भूमी सुजलाम्- सुफलाम् होती. या काळात वैचारिक क्षेत्रात विविध प्रवाह उदयास आले. त्या प्रवाहांचा आजदेखील प्रभाव आहे. त्यापैकी महत्त्वाचे वैचारिक लेखन करणारे प्रवाह दोन होते.

महात्मा फुले यांनी वैचारिक साहित्याची एक परंपरा निर्माण केली. महात्मा फुलेंच्या वैचारिक साहित्यामध्ये समाजाच्या जडणघडणीचे सुधारित प्रारूप होते. त्यांनीच खर्‍या अर्थाने प्रथम मराठी भाषिक प्रदेशाला झोपेतून जागे केले. त्यांनीच या प्रदेशाला रुतलेल्या गाळातून बाहेर काढण्यासाठी लेखन केले. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सत्यशोधक विचार महाराष्ट्रात विकसित झाला.

19 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजकेंद्रित वैचारिक लेखनाचा विचार प्रवाह उदयास आला. शिवरायांनी क्रांती केली हा पहिला वैचारिक प्रवाह लोकहितवादींनी विकसित केला. महात्मा फुले यांनी शिवराय आणि तळागाळातील समूह यांची नाळ जोडली. त्यांनी शिवरायांसंदर्भात महाराष्ट्राचे नवीन वैचारिक चर्चा विश्व हा दुसरा प्रवाह विकसित केला. राजारामशास्त्री भागवत, न्यायमूर्ती रानडे यांनी शिवरायांसंदर्भात महाराष्ट्र धर्म हा तिसरा विचार विकसित केला. यापेक्षा वेगळी महाराष्ट्र धर्म संकल्पना वि. का. राजवाडे यांनी विकसित केली. विशेषतः, चि. वि. वैद्य यांनी शिवरायांच्या स्वराज्याला लोकांचा मुख्य आधार होता, हा विचार मांडला. प्राचीन काळातील स्वराज्य विचार आणि शिवरायांचा स्वराज्य विचार यांचे त्यांनी एकत्रित सांधेजोड करणारा चौथा विचार प्रवाह विकसित केला. न्यायमूर्ती रानडे यांनी संत साहित्य आणि शिवरायांचे स्वराज्य यांचे एकत्रित विश्लेषण केले. त्यांनी ग्राड डफच्या विचारांचा प्रतिवाद केला. राजवाडे यांनी शिवचरित्राची विपुल साधने गोळा केली.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील वैचारिक महाराष्ट्र

एकोणिसाव्या शतकाप्रमाणे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात वैचारिक लेखन विपुल झाले. महात्मा फुले आणि शिवरायांसंदर्भातील वैचारिक चर्चा विश्व पुढे विकसित झाले.

लोकमान्य टिळक यांनी शिवरायांची व राष्ट्रवाद विचारांची सांधेजोड केली. विसाव्या शतकात आपटे यांनी शिवचरित्राचे वैचारिक कंगोरे विकसित केले. विशेषतः, लोकमान्य टिळक यांनी ‘गीता रहस्य’ ही वैचारिक साहित्यकृती लिहिली. लोकांना कृतिप्रवण करणे हा त्या साहित्यकृतीचा मुख्य उद्देश होता. या विचारांना नवीन धुमारा फुटला. फुले-शिंदे (महर्षी शिंदे) विचार प्रवाह विकसित झाला. फुले-शाहू विचार असा पहिला नवीन प्रवाह विकसित झाला. फुले-गायकवाड विचार असा दुसरा प्रवाह विकसित झाला. ब्राह्मणेतर विचार प्रवाह असे त्याचे रूप होते. फुले-आंबेडकर विचार हा तिसरा प्रवाह विकसित झाला. हा प्रवाह तळागाळामध्ये जाऊन पोहोचला. यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिक लेखनावर महात्मा फुले, महर्षी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खूप खोलवर प्रभाव पडला होता. विशेषतः, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात मोठे वैचारिक योगदान दिले.

महाराष्ट्रामध्ये गांधी विचार या क्षेत्रात विपुल वैचारिक लेखन झाले आहे. गांधीजींवरील चरित्र अवंतीबाई गोखले यांनी लिहिले. गांधीजींचा विचार सैद्धांतिक पातळीवर मांडणारी एक मोठी वैचारिक परंपरा महाराष्ट्रात उदयास आली. गांधीवाद आणि इतर विचारप्रणाली यांच्यामध्ये सांधेजोड करणारे वैचारिक साहित्य लिहिले गेले. विनोबा भावे यांनी गांधीजींचा विचार नवीन संदर्भात मांडला. त्यांनी महाराष्ट्र धर्म संकल्पना मांडली. शंकर दत्तात्रेय जावडेकर यांनी गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद यांच्यामध्ये सांधेजोड करणारे वैचारिक साहित्य लिहिले. दादा धर्माधिकारी यांनी गांधी विचारांची मांडणी केली. महात्मा गांधी यांचे विचार यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या वैचारिक साहित्यामध्ये मांडले.

महाराष्ट्रात हिंदुत्व हा विचार मध्यवर्ती ठेवून वैचारिक लेखन करण्याची परंपरा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू झाली. भालाकार भोपटकर यांनी सुरुवातीला लेखन केले. विशेषतः, हिंदुत्व या चौकटीत लेखन करणारे दोन प्रवाह उदयास आले. वि. दा. सावरकर, बाबाराव सावरकर यांनी हिंदुत्ववादी विचारांची वैचारिक साहित्याची पहिली चौकट आखून दिली. तसेच हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांनीदेखील हिंदुत्व या चौकटीमध्ये ‘आरएसएस’ या संस्थात्मक पातळीवर लेखन विकसित करण्याची दुसरी चौकट टाकून दिली. केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्रावर लेखन केले. तसेच त्यांनी ज्ञानकोशाची निर्मिती केली. स्थळ इतिहास लेखन केले. चित्राव यांनी चरित्रकोश लेखन केले.

स्वातंत्र्योत्तर काळातील वैचारिक जडणघडण

स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण नवीन संदर्भात सुरू झाली. यासंदर्भातील निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत…
वीर उत्तमराव मोहिते आणि पंजाबराव देशमुख यांच्या विचारांवर फुलेंच्या वैचारिक साहित्याचा प्रभाव होता. यामुळे चव्हाण, देशमुख आणि मोहिते यांनी विकसित केलेला वैचारिक प्रवाह हा नवीन प्रवाह ठरतो. सत्तरीच्या दशकानंतर महात्मा फुले विचार शरद पाटील यांनी विकसित केला. त्यांनी ‘माफुआ’ (मार्क्स, फुले, आंबेडकर वाद) असे विश्लेषण केले. हा एका अर्थाने नवीन प्रवाह फुले विचारांच्या विकासाचा मानता येईल.

यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी फुले विचार, आंबेडकर विचार, गांधी विचार आणि नेहरू विचार यांना महाराष्ट्रात विकसित केले. त्यांनी लोकसाहित्याचा विकास करण्यासाठी मदत केली. सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याचे संकलन आणि संपादन केले.

विशेषतः, वैचारिक जडणघडणेला यशवंतराव चव्हाण यांनी संस्थात्मक आकार दिला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व विश्वकोश मंडळ यांची स्थापना करण्यात आली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोशाचे सामूहिक पातळीवर वैचारिक लेखन करणारी एक टीम घडवली. त्यांनी प्रचंड मोठे वैचारिक कार्य केले. भालचंद्र नेमाडे यांनी ‘कोसला’ कादंबरी लिहिली. ही वैचारिक कादंबरी आहे. देशीवाद या विचारसरणीची या कादंबरीने मांडणी केली. यशवंत दिनकर फडके यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर वैचारिक लेखन केले. त्यांनी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास मराठी भाषेत लिहिला. नामदेव ढसाळ यांनी ‘गोलपिठा’ आणि ‘आंधळे शतक’ अशा साहित्यकृतीमधून वैचारिक योगदान दिले. राजा ढाले यांनी वैचारिक साहित्यामध्ये मूलभूत भर घातली.

विशेषतः, साठोत्तरी वैचारिक साहित्यात महत्त्वाचा ठरणारा ‘स्त्रीवादी साहित्य’ हा प्रवाह विकसित झाला (मीनाक्षी मून, उर्मिला पवार, तारा भवाळकर, विद्युत भागवत, शर्मिला रेगे इत्यादी). स्त्री अभ्यास केंद्र या संस्थात्मक पातळीवर या क्षेत्रात मोठे प्रयत्न झाले. गोपाळ गुरू यांनी दलित स्त्रीवाद या विचारांवर लेखन केले.

समकालीन काळातील वैचारिक योगदान

एकोणिसावे शतक आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या काळात महाराष्ट्रात वैचारिक लेखन झाले. हा वारसा पुढे विकसित करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात संस्थात्मक पातळीवर प्रयत्न झाले. गेल्या 30-35 वर्षांमध्ये मूलभूत स्वरूपातील नव्याने लेखन महाराष्ट्रात मर्यादित प्रमाणात झाले आहे. गेल ऑम्व्हेट आणि भारत पाटणकर यांनी समकालीन काळात बुद्ध विचार, संत तुकाराम विचार, फुले विचार, आंबेडकर विचार या क्षेत्रामध्ये वैचारिक लेखन केले. बाबा आढाव यांनी ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक चळवळीवरील साहित्य प्रकाशित केले. रमेश चव्हाण यांनी रा. ना. चव्हाण यांचे लेखन प्रकाशित केले. राजन गवस यांनी केळुसकर गुरुजींचे सर्व साहित्य पुनर्प्रकाशित केले. आंबेडकरवादाचा वैचारिक विकास शरद पाटील, रावसाहेब कसबे, गोपाळ गुरू इत्यादींनी केला. रावसाहेब कसबे यांनी आंबेडकरवाद व मार्क्सवाद यांचा समन्वय घातला. गोपाळ गुरू यांनी आंबेडकर विचारांची चिकित्सा केली. त्यांनी आंबेडकर विचारांचे नवीन कंगोरे स्पष्ट केले.

स्वातंत्र्य चळवळीमध्ये साम्राज्यवाद विरोध या क्षेत्रात विपुल वैचारिक लेखन झाले. यानंतर जागतिकीकरणाची चिकित्सा करणारे लेखन 90 नंतर झाले. विचारवेध साहित्य संमेलनामध्ये आर्थिक साम्राज्यवादाला विरोध या क्षेत्रातील लेखन वैचारिक क्षेत्रात झाले. विचारवेध साहित्य संमेलनांमधून वैचारिक मांडणी झाली (एन. डी. पाटील, किशोर बेडकीहाळ इत्यादी).

‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ ही वैचारिक कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली. नेमाडे यांनी हिंदू संकल्पनेचे नवीन चर्चाविश्व विकसित केले. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) केंद्रित हिंदू विचार यापेक्षा वेगळ्या हिंदू संकल्पनेची महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात मांडणी नेमाडे यांनी केली. महात्मा गांधी व सानेगुरुजी यांची हिंदू संकल्पना त्यांनी नव्या संदर्भात मांडली.

सदानंद मोरे यांनी वैचारिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण लेखन केले. त्यांनी तुकाराम दर्शन, लोकमान्य ते महात्मा इत्यादी महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यांनी एक सकलजनवादी वैचारिक साहित्याचा प्रवाह विकसित केला. आ. ह. साळुंखे यांनी 50 पेक्षा जास्त वैचारिक पुस्तके लिहिली आहेत. उदाहरणार्थ, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’, ‘विद्रोही तुकाराम ’ इत्यादी. या साहित्य कृतींनी वैचारिक चर्चा घडवून आणली.

समकालीन काळात नवीन अभ्यास केंद्रांची स्थापना झाली. या केंद्रांनी नवीन संदर्भात वैचारिक साहित्यात भर घातली. फुले विचार, शाहू विचार, महर्षी शिंदे विचार, महाराजा गायकवाड विचार यांचा त्यांनी विकास केला. बाबा भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे समग्र साहित्य मराठीमध्ये प्रकाशित केले. अशोक चौसाळकर यांनी भारतीय राष्ट्रवाद या विषयावर वैचारिक पुस्तक लिहिले. याबरोबरच सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्याचे संकलन करून त्याचे खंड प्रकाशित करण्यास दिले आहेत. थोडक्यात, महाराष्ट्राला वैचारिक लेखनाची परंपरा दीर्घ आहे. परंतु, तुलनात्मकद़ृष्ट्या समकालीन काळात नवीन वैचारिक चर्चा विश्व मंदावलेले दिसते.

Back to top button