राजरंग : पवार विरुद्ध पवार | पुढारी

राजरंग : पवार विरुद्ध पवार

सुहास जगताप

बारामती हा पवार घराण्याचा 1967 पासूनचा अभेद्य राजकीय बालेकिल्ला होता. अजित पवारांच्या बंडामुळे आणि त्यांनी पक्षातच उभी फूट पाडल्याने हा किल्ला निवडणुकीच्या आधीच खरे तर उद्ध्वस्त झाला आहे. आता या उद्ध्वस्त किल्ल्याची मालकी कोणाकडे जाणार हे या आगामी लोकसभा निवडणुकीत ठरणार आहे. राजकीय डावपेचात काका-पुतण्यामध्ये कोण वरचढ ठरणार याचा कस बारामतीच्या रणसंग्रामात लागणार आहे.

देशातील धुरंधर राजकारणी, ‘तेल लावलेला पैलवान’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेले अजित पवार हे काका-पुतणे बारामतीच्या ‘होम पीच’वर प्रथमच एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत. हे असे घडेल याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हते ते ‘कालचक्रा’ने घडविले आहे.

शरद पवार यांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात ही ‘हाय होल्टेज’ लढत रंगणार आहे. या लढतीचे पडसाद निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच उमटू लागलेले आहेत.

1967 साली आमदारकीची पहिली निवडणूक जिंकून शरद पवारांनी बारामतीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून बारामती ते दिल्ली व्हाया मुंबई या राजकारणात शरद पवार यांचे कुटुंब गेली 56/57 वर्षे नेहमीच एकसंध राहिले आहे. या एकसंध कुटुंबाने महाराष्ट्रात अनेकांना ‘कात्रजचा घाट’ दाखविलेला आहे. आता या घरातच उभी फूट पडून रंगलेला सामना आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला पाहावा लागणार आहे.

पवारांच्या घरातील बहुतेक सर्व सदस्य शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिलेले दिसतात. अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरले आहेत; तर अजित पवार यांच्या बाजूला त्यांची दोन मुले आणि पत्नी अशी पवार कुटुंबाची विभागणीच झाल्याचे चित्र आहे.

कुटुंबाबरोबर पवार घराण्याने बारामती मतदारसंघात उभे केलेले नेते, कार्यकर्ते, संस्था यांच्यातही उभी फूट झाली आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत राजकारणात आलेले जवळपास सर्वच स्थानिक नेते, कार्यकर्ते अजित पवार यांच्या बाजूला असल्याने सुरुवातीला अजित पवारांच्या बाजूने वाटणारे एकतर्फी राजकीय बलाबल शरद पवारांनी आपल्या अनुभवी आणि आस्ते कदम चालीने जवळजवळ समान पातळीवर आणून ठेवले आहे. शरद पवारांनी जुन्या जाणत्या आणि मतदारांवर प्रभाव असलेल्या परंतु अजित पवारांच्या झंझावातामध्ये अडगळीत पडलेल्या नेत्यांना आता समोर आणलेले आहे. त्यांना हाताशी धरून शरद पवारांनी कन्येला जिंकून आणण्याची तयारी सुरू केली आहे. अशावेळी संपूर्ण मतदारसंघात अनेक जुणे नेते शरद पवार यांच्या भोवती गोळा होऊ लागले आहेत. काहींची तर मुले अजित पवार यांच्या बरोबर आणि वडील शरद पवार यांच्याकडे अशी स्थिती आहे.

बारामतीत अजित पवार आयोजित सरकारी महारोजगार मेळाव्यात निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करून स्वत:चे नाव पत्रिकेत येण्यासाठी जुनी पत्रिका रद्द करून नवीन छापण्यास सरकारी यंत्रणेला भाग पाडले आणि नंतर स्व:त मेळाव्याच्या व्यासपीठावर हजेरी लावून या मेळाव्यातील राजकीय हवाच काढून घेऊन आपल्या राजकीय ‘मास्टर स्ट्रोक’ची चुणूक अजित पवार यांना दाखवून दिली आहे. अशा राजकीय डावपेचात काका-पुतण्यामध्ये कोण वरचढ ठरणार याचा कस बारामतीच्या या रणसंग्रामात लागणार आहे. वयाच्या 38 व्या वर्षी अनेक डावपेच लढवून 1978 साली शरद पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद पटकावले, तेव्हापासून अनेक डाव त्यांनी महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांवर टाकले. तेच डावपेचाचे प्रयोग आता त्यांना आपल्या पुतण्यावर करावे लागणार आहेत.

बारामती हा पवार घराण्याचा 1967 पासूनचा अभेद्य राजकीय बालेकिल्ला होता. अजित पवारांच्या बंडामुळे आणि त्यांनी पक्षातच उभी फूट पाडल्याने हा किल्ला निवडणुकीच्या आधीच खरे तर उद्ध्वस्त झाला आहे. आता या उद्ध्वस्त किल्ल्याची मालकी कोणाकडे जाणार हे या आगामी लोकसभा निवडणुकीत ठरणार आहे. पवार घराण्याचे आगामी काळात राजकीय नेतृत्व कोणाकडे जाणार याद़ृष्टीने ही निवडणूक निर्णय ठरेल. या निर्णायक लढतीसाठी दोघेही काका-पुतणे प्रचंड मोठ्या ताकदीने लढण्यास तयार झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

या रणांगणाचा निर्णय काहीही लागला तरी बारामतीच्या या लढतीने महाराष्ट्राच्या राजकारणात बलाढ्य असलेल्या पवार घराण्याच्या राजकारणातील वर्चस्वाला धक्का पोहोचणार आहे हे मात्र निश्चित आहे. अजित पवार यांच्या पत्नी आणि शरद पवारांच्या कन्या मैदानात असल्याने या दोघांच्या द़ृष्टीने ही मोठी प्रतिष्ठेची लढत झालेली आहे. बारामतीवर वर्चस्व ठेवण्यात जे पवार यशस्वी होतील, त्यांचेच आगामी काळात राज्याच्या राजकारणात वर्चस्व राहील आणि ते पवार कोण असतील हे या निवडणुकीत जनता ठरवेल. त्याच बरोबर पवार घराण्याशी जोडलेली अनेक मिथकेही संपतील.

बारामतीच्या या लढतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजून एकतर्फीच आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीकेचे बाण सोडले आहेत. परंतु शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून अद्याप त्यांना तसे जोरकस प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. परंतु हे चित्र निवडणुकीचे रणांगण घुमू लागल्यावर तसेच राहील याची खात्री देता येत नाही. आपल्या विरोधकावर निवडणूक काळात शरद पवार किती कठोर टीका करतात हे सर्वश्रुत आहे. गुरुवारीच त्यांनी मावळ विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार यांच्या गटाच्या आमदाराला ‘दादागिरी कराल तर मला शरद पवार म्हणतात’, अशा शब्दांत ठणकावले आहे.

या लढतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘पवार कधीही एकत्र येतील आणि आपण तोंडघशी पडू’, अशी कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्यामध्ये असलेली भावना. त्यामुळे अजित पवार यांना ‘आता आमचं पूर्ण फाटलंय. कधीच एकत्र येणार नाही’, असा खुलासा करावा लागला आहे.

महायुतीची मोठी ताकद अजित पवारांच्या बरोबर या वेळेला आहे. भाजपने तर अजित पवार बरोबर आले नसते तरी यावेळी बारामती जिंकण्यासाठी बूथ पातळीपर्यंत बारकाईने तयारी केली होती, याची जाणीव शरद पवार यांना आहे. या ताकदीला सुरुंग लावण्याचे डावपेच शरद पवारांकडून खेळले जात आहेत. या महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीचे काय होणार याची चिंता लागलेले अनेक प्रबळ नेते लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आहेत. त्यांच्याशी संधान बांधून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीतील मदतीचे आश्वासन देऊन त्यातील काहींना शरद पवार आपल्या बाजूने वळवू शकतात.

तसे झाल्यास तो अजित पवारांना मोठा धक्का असेल. परंतु अजित पवारही काही कच्चे खेळाडू नाहीत. त्यांनीही महायुतीतील सर्व घटक आपल्या पत्नीच्या प्रचारात उतरतील, काही दगाफटका होणार नाही, यासाठी आखणी सुरू केली आहे. काही मंडळींना मुंबईतून तर काहींना थेट दिल्लीतून निरोप देण्याची व्यवस्था झाली असल्याचे अजित पवार यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. अजित पवार यांनीही गेल्या वीस-पंचवीस वर्षांत निर्माण केलेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या फौजेला बळ देऊन लढाईसाठी तयार केलेले दिसते. अजित पवार स्वतः प्रत्येक महत्त्वाच्या कार्यकर्त्याशी बोलत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. थोडक्यात, प्रचाराच्या रणधुमाळीत काका-पुतण्यातील डावपेच रंगणार हे निश्चित आहे.

2004च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे बारामतीतून 4 लाख 22 हजार 975 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या 3 लाख 36 हजार 861 मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर मात्र या लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व वाढू लागले आणि पवारांचे मताधिक्य कमालीचे घटू लागले. 2014 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे या अवघ्या 69 हजार 719 मतांनी विजयी झाल्या.

2019 च्या निवडणुकीत हे मताधिक्य थोडे वाढून 1 लाख 55 हजार 774 झाले. परंतु तीन लाख, चार लाख अशा फरकाने विजयी होणारे पवार घराण्यातील उमेदवार आता लाखाच्या आसपास येऊ लागलेले आहेत. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतून हे लक्षात येत आहे की, या मतदारसंघात पवारांच्या विरोधात पाच ते साडेपाच लाख मते तयार झालेली आहेत. पवार घराणे एकसंध असतानाचे हे आकडे आहेत. आता 2024 ची निवडणूक पवार घराण्यातच होत असल्याने आणि अजित पवारांना भाजप आणि शिवसेना यांचा पाठिंबा असल्याने काय चित्र निर्माण होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बारामती मतदारसंघ हा राजकारणात कसलेल्या दोन्ही पवारांच्यासाठी एक मोठा चक्रव्यूह असेल. आता हा चक्रव्यूह काका-पुतण्यांपैकी कोण भेदू शकतो हे या आगामी निवडणुकीच्या रणांगणात ठरणार आहे.

Back to top button