मनाेरंजन : नव्या सिनेमांचा जुनाच ट्रेंड | पुढारी

मनाेरंजन : नव्या सिनेमांचा जुनाच ट्रेंड

प्रथमेश हळंदे

2023 हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी अनेक कारणांमुळे खास ठरलं. 2022 मध्ये प्रादेशिक सिनेसृष्टीसोबत निकराची झुंज देणार्‍या बॉलीवूडला गेल्या वर्षात घवघवीत यश मिळालं, तर ‘पॅन इंडियन’ स्तरावर रीलिज झालेल्या प्रादेशिक सिनेमांच्या यशाची टक्केवारी मर्यादित राहिली. बोटांवर मोजता येणार्‍या स्त्रीकेंद्री सिनेमांचा अपवाद वगळता बहुतांश सिनेकथांचा बाज हा पुरुषप्रधान, त्यातही स्टार कल्चरला बढावा देणाराच होता.

‘स्टार कल्चर’ची क्रेझ 

2023 मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या स्टार्सचं वर्चस्व राहिलं. शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवले. सलमानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ आणि ‘टायगर थ्री’ने चांगली कमाई करत त्याची स्टारपॉवर शाबूत असल्याचं दाखवून दिलं असलं, तरीही सलमानकडून त्याच्या चाहत्यांना अधिक काहीतरी अपेक्षित आहे, हेही यावेळी प्रकर्षाने जाणवलं.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधल्या धर्मेंद्रचा बहुचर्चित किसिंग सीन असो, सनी देओलने एकहाती ‘गदर-टू’ला 500 कोटींचा टप्पा ओलांडून देणं असो किंवा बॉबी देओलची ‘अ‍ॅनिमल’मधली दमदार एन्ट्री असो, देओल कुटुंबासाठी मात्र 2023 खास ठरलं. याच ‘अ‍ॅनिमल’मध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने रणबीर कपूरला सुपरस्टार बिरुदावली दिली आणि रणबीरनेही या बिरुदावलीला साजेशीच कामगिरी या सिनेमात केलीय.

त्याचबरोबर, सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ आणि थलपती विजयचा ‘लिओ’ या दोन तमीळ सिनेमांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. दोघांच्याही स्टारडमचा अपेक्षित फायदाही बॉक्स ऑफिसवर दिसून आला. यावर्षीच्या चर्चेतलं प्रादेशिक सिनेसृष्टीतलं आणखी एक नाव म्हणजे तेलुगू अभिनेता रिबेल स्टार प्रभास. प्रभासच्या ‘आदिपुरुष’वर सडकून टीका झाली. मात्र, वर्षाअखेर रीलिज झालेल्या त्याच्या ‘सालार : द सीजफायर’ची कमाई दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.

2023चा हाच ट्रेंड 2024मध्येही टिकून राहील, असं येणार्‍या सिनेमांवरून स्पष्ट होतंय. हृतिक रोशनचा ‘फायटर’, सलमानचा ‘शेरखान’, शाहरुख खानचा ‘किंग’, कमल हासनचा ‘इंडियन-टू’, अक्षय कुमारचा ‘वेलकम थ्री’, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-टू’, सलमान आणि शाहरूखचा ‘टायगर व्हर्सेस पठाण’ अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ आणि प्रभासचा मल्टिस्टारर ‘कल्की 2898 एडी’ या बिग बजेट सिनेमांचा यात समावेश आहे.

राजकारणातलं स्टारडम

2024 हे निवडणुकांचं वर्ष असल्याने या राजकारणातल्या स्टारडमलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. हिंदुत्ववादी सिनेरसिकांच्या अनेक पोस्टर बॉईजपैकी एक असलेल्या रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यात रणदीपने मुख्य भूमिकेसोबतच दिग्दर्शनाचंही शिवधनुष्य उचललं आहे. अभिनेत्री कंगणा राणावत यावेळी ‘इमर्जन्सी’ या तिनेच दिग्दर्शित केलेल्या सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत झळकणार आहे. आणीबाणीसारख्याच इतरही अनेक राजकीय घडामोडी सिनेरूपात अवतरणार आहेत. 2002च्या गोध्रा हत्याकांडावर आधारित ‘अ‍ॅक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी : गोध्रा’, 1984च्या शीखविरोधी दंगलींवर आधारित ‘द दिल्ली फाईल्स’ ही यातली काही महत्त्वाची नावं. येत्या प्रजासत्ताकदिनी रीलिज होणार्‍या ‘ऑपरेशन एएमजी’च्या पोस्टरवर असणारा पंतप्रधान मोदींचा पाठमोरा फोटोही यावर्षीच्या सिनेमातल्या राजकीय स्टारडमचं महत्त्वच अधोरेखित करतोय.

2024 मध्ये अनेक राजकीय घडामोडींचं नाट्यमय सादरीकरण या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे. त्याचबरोबर या नाट्यमय घडामोडींचे सूत्रधार अर्थात राजकारण्यांचंही जीवन रुपेरी पडद्यावर यावर्षी अवतरणार आहे. यावर्षीच्या यादीत पहिली वर्णी लागलीय ती रवी जाधव दिग्दर्शित ‘मैं अटल हूँ’ या बायोपिकची. पंकज त्रिपाठीने यात भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारलीय.

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘धर्मवीर’ या आनंद दिघेंच्या बायोपिकचा सिक्वेलही याच वर्षी येतोय. ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ सांगणारा ‘धर्मवीर-2’ सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवासही उलगडून दाखवणार आहे.

प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांचा जीवनपट

राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातल्या प्रभावशाली व्यक्तींच्याही जीवनप्रवासाचा सिनेअनुभव यावर्षी प्रेक्षकांना घेता येईल. संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या ‘द गुड महाराजा’मध्ये दुसर्‍या महायुद्धात पोलिश निर्वासितांसाठी झटणारे नवानगरचे संस्थानिक दिग्विजयसिंह जडेजा यांचं चरित्र साकारलं जाणार आहे. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी परमवीर चक्र मिळवणार्‍या लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित ‘इक्कीस’ हा सिनेमाही याच वर्षी येतोय. बहुजनांचा उद्धार आणि स्त्रीशिक्षणासाठी आयुष्य वेचणार्‍या फुले दाम्पत्याची गोष्ट ‘सत्यशोधक’मध्ये सांगितली आहे. राजर्षी शाहू महाराजांचं समाजकार्य आणि जीवनचरित्र उलगडणारा ‘शाहू छत्रपती’ही यावर्षी प्रदर्शित होतोय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा कॅमेर्‍यात कैद करणारे, त्यांच्यावर पहिला लघुपट बनवणारे नामदेवराव व्हटकर ‘महापरिनिर्वाण’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या तिन्ही बायोपिकच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक वैचारिक मेजवानीच सादर होतेय.

भारतीय क्रिकेट टीमला आक्रमक बनवणारा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकमधे आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत दिसेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’च्या निमित्ताने भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची प्रेरणादायी जीवनगाथा रूपेरी पडद्यावर साकारली जाईल. अजय देवगण अभिनित ‘मैदान’मध्ये आधुनिक भारतीय फुटबॉलचे जनक सय्यद अब्दुल रहीम यांच्या कारकीर्दीचा वेध घेतला गेलाय. त्याचबरोबर, मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री रंजनावर आधारित ‘रंजना – अनफोल्ड’, भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीवर आधारित आणि अनुष्का शर्मा अभिनित ‘चकदाह एक्स्प्रेस’, ‘कारतूस साहिब’ या नावाने भारतीय सैन्याच्या गोरखा रेजिमेंटमधे लोकप्रिय असलेले मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्यावर आधारित आणि अक्षयकुमार अभिनित ‘गोरखा’ हे बायोपिकही याच वर्षी येतायत.

ऐतिहासिक सिनेमांचं चलनी नाणं

करण जोहरच्या आगामी ‘तख्त’ या महत्त्वाकांक्षी मल्टिस्टारर सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणारा विकी कौशल ‘छावा’ या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित बायोपिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये अक्षयकुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार असून, यात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, विशाल निकमसारखे सुप्रसिद्ध मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

2019च्या ‘हिरकणी’नंतर सोनाली कुलकर्णी ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’मध्ये प्रमुख भूमिका साकारतेय. ‘सैराट’फेम आकाश ठोसर ‘बाल शिवाजी’ या रवी जाधव दिग्दर्शित सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. ऐतिहासिक सिनेमांचं हे चलनी नाणं व्यावसायिक सिनेमांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी सिनेसृष्टीचा कौटुंबिक सिनेसोहळा

गेल्या वर्षभरातल्या लोकप्रिय मराठी सिनेमांच्या कमाईचा विचार करता, सहकुटुंब-सहपरिवार सिनेमाला येणारा प्रेक्षक हा मराठी सिनेमांसाठी हक्काचा प्रेक्षकवर्ग ठरल्याचं दिसून येतं. त्याबरोबरच, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘झिम्मा 2’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घेतलेली कोटीच्या कोटी उड्डाणे ही महिलावर्गाचं महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहेत. त्यामुळे 2024 मध्येही शिवइतिहासासोबतच ‘फॅमिली कंटेंट’ पुरवण्याकडे मराठी सिनेव्यवसायिकांचा कल असेल. ‘पंचक’ या अशाच पठडीतल्या मराठी सिनेमाची निर्मिती सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने केलीय. काही वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रानेही ‘व्हेंटिलेटर’ची निर्मिती करताना त्याच्या आशयाच्या केंद्रस्थानी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबव्यवस्था ठेवली होती.

गेल्या काही वर्षांत ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’, आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘मी वसंतराव’सारख्या नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या सिनेमांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या यादीत सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ आणि प्रसाद ओक अभिनित ‘तोच मी प्रभाकर पणशीकर’ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘पठ्ठे बापूराव’ या तीन सिनेमांचं नाव लवकरच जोडलं जाणार आहे. यासोबतच, ‘नाच गं घुमा’, ‘ओले आले’, ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘एक दोन तीन चार’, ‘नवरदेव (बीएस्सी. अ‍ॅग्री.)’, ‘जिलबी’, ‘सूर लागू दे’ आणि ‘वाळवी 2’सारख्या हलक्याफुलक्या, कौटुंबिक प्रेक्षकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आणि मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज नावांचा भरणा असलेल्या या मराठी सिनेमांना गेल्यावर्षीचा हा ट्रेंड पुन्हा तिकीटबारीवर अपेक्षित यश मिळवून देईल की नाही, हे बघणंही यावर्षी रंजक ठरणार आहे.

Back to top button