समाजभान : प्रेम आणि नातेसंबंध | पुढारी

समाजभान : प्रेम आणि नातेसंबंध

डॉ. ऋतू सारस्वत

काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका युवतीने कथित आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन याचिका मान्य करताना, नव्या पिढीच्या स्थितीबाबत गंभीर भाष्य केले. न्यायालयाने म्हटले की, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना त्याच्या संभाव्य गंभीर परिणामांबाबत अनभिज्ञ असलेली तरुण पिढी ही इंटरनेटच्या दुनियेत आणि चित्रपटांत दाखविण्यात येणार्‍या नातेसंबंधांचा अंगीकार करत आहे. स्वातंत्र्य उपभोगण्याच्या इच्छेपोटी किंवा लालसेपोटी बहुतांश तरुण-तरुणी आपले आयुष्य पणाला लावत आहेत. संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी आवश्यक असणार्‍या प्रामाणिक जोडीदाराचा शोध घेण्यात अनेक तरुण-तरुणी अपयशी ठरताहेत. साहजिकच, अशा ठिसूळ संबंधांवर प्रस्थापित झालेल्या नात्यांमध्ये हिंसा, हत्या आणि नात्यातील ताणतणावांमुळे आत्महत्येचा मार्ग निवडल्याच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे.

उच्च न्यायालयाची टिपणी हा एकप्रकारे गंभीर इशाराच आहे. आजकालची तरुण पिढी डोळ्यांवर पट्टी बांधून एका अंधार्‍या गुहेमध्ये मार्गक्रमण करत असून, तेथे त्यांना ठेच लागण्याशिवाय हाती काही लागणार नाही. प्रश्न असा की, प्रेम आणि सहजीवन म्हणजेच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची निवड आनंदाने स्वीकारणारे तरुण-तरुणी काही काळ गेल्यानंतर त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न का करतात? या नात्यात एवढी कटुता का येते की, ते एकमेकांना न्यायालयात खेचण्यापर्यंत मजल मारतात? याचा अर्थ प्रेम ही विध्वंसक आणि घातक अभिव्यक्ती आहे का?

अलीकडच्या काळात श्रद्धा वालकर, निक्की यादव आणि मेधा तिखी यासारख्या किती तरी मुलींना आपला जीव गमवावा का लागला? याचे उत्तर म्हणजे, या तथाकथित प्रेमाकडे ही तरुणाई एक सामाजिक क्रांती म्हणून पाहताना दिसते. विशेष म्हणजे, नातेसंंबंधांमध्ये सर्व काही सुरळीत असताना ही तरुणाई त्याचा प्रचार करण्यासाठी धडपड करताना दिसतात. वस्तुतः, ते प्रेम नसून त्यामध्ये शारीरिक आकर्षणाचा वाटा अधिक असतो. किशोरावस्थेत अशी भावना विकसित होणे स्वाभाविक आहे.

2016 मध्ये प्रकाशित ‘सेक्शुअ‍ॅलिटी इन एडोलेन्सेस द डिजिटल जनरेशन’मध्ये म्हटले की, पौगंडावस्थेतील शारीरिक आकर्षण ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. परंतु, ही प्रक्रिया प्रेम आणि लालसेसारख्या भावनांत असलेला फरक कमी करण्यास सक्षम नसते. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी अगोदरच इशारा दिला आहे. तारुण्यावस्थेत मानवी मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला नसतो. मेंदूचा शेवटचा भाग प्रोफंटल कॉन्टेक्समध्ये अनेक घटक कार्यरत असतात आणि ते पौगंडावस्थेत तयार होत असतात. 2016 मध्ये प्रकाशित संशोधनपत्र ‘द इम्पोंटसर्र् ऑफ सेक्शुअल अँड रोमँटिक डेव्हलपमेंट इन अंडरस्टँडिंग द डेव्हलपमेंट न्यूरोसायन्स ऑफ एडोलेन्सेन्स’मध्ये म्हटले की, मेंदूचा हा भाग एखाद्या तरुण-तरुणीची पौगंडावस्था संपेपर्यंत परिपक्व होतो. त्यामुळे या वयात धाडस दाखविण्याची आणि चुकीचा निर्णय घेेण्याची शक्यता अधिक राहते. प्रामुख्याने सुख आणि आनंद मिळण्याची ज्या ठिकाणी शक्यता असते तेथेच चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बळावते. दुर्दैवाने अलीकडील काळात प्रेमात पडणे ही फॅशन बनली असून, ती आधुनिक काळाचा ट्रेंड असल्याचे सांगितले जात आहे. स्वत:ला आधुनिक, पुढारलेले, स्वतंत्र विचारांचे असल्याचे सिद्ध करताना आणि स्पर्धेत टिकून राहताना मनासारखा जोडीदार निवडणे हा त्यातला सोयीचा मार्ग वाटतो. परिणामी, आधुनिकतेच्या नावाखाली विवेकशून्यतेला जन्म दिला जातो.

तथाकथित महिला हक्कांच्या समर्थकांच्या द़ृष्टिकोनातून आजकाल आणि पूर्वी जे काही पाश्चिमात्य संस्कृतीत दाखविले जाते, तेच सशक्ततेचे प्रतीक मानले जाते. सशक्तीकरणाची संभ्रमित संकल्पना मान्य करत अनेक युवती, तरुणी या सहजीवनाकडे वाटचाल करत आहेत. भारतीय रूढी, संस्कृती, परंपरेला पुराणमतवादी असल्याचे सांगणारी मानसिकता ही आधुनिकतेकडे पळत असली, तरी वास्तव जाणून घेण्यास ते तयार नाहीत. अर्थात, ही बाब समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, भारतीय संस्कृतीने कधीही प्रेमविवाहाला विरोध केलेला नाही. मात्र, प्रेमाच्या नावाखाली घालण्यात येणार्‍या गोंधळाच्या आणि संभ्रमित संकल्पनेच्या ती विरोधात राहिलेली आहे. ज्या प्रेमाला जीवनाचा आदर्श मानत कुटुंब आणि समाजाची नाराजी ओढवत सहजीवनाचा मार्ग निवडला जात आहे आणि त्यामागची तरुण पिढीची आसक्ती पाहता यामागे केवळ आकर्षण आहे, असेच म्हणावे लागेल.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये बहुतांश वेळा प्रेमाचे उदात्तीकरण केले जाते. एखादा तरुण किंवा तरुणी बंड करत प्रेम जाहीर करतात तेव्हा त्याला यशाच्या मखरात बसविण्यात येते. यातील डावी बाजू म्हणजे प्रेमाचा गाजावाजा करणारी ही पिढी कालांतराने सहजीवनाला वैवाहिक जीवनात परावर्तित करण्याची इच्छा बाळगून असते. मुक्त, स्वतंत्र संबंधांची बाजू मांडणार्‍या युवती या सहजीवनात राहणार्‍या जोडीदारावर दबाव टाकतात. त्यात यश मिळाले नाही तर हिंसाचाराची शक्यता राहते आणि त्याचे परिणाम भयंकर राहू शकतात. प्रेमाचे हे स्वरूप न्यायालयासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. म्हणून तरुण पिढीने काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

प्रेम ही एक परिपक्व भावना असून, त्यात त्याग, संयम, जबाबदारीचा समावेश असतो. या बळावरच प्रेमाचा अंकुर फुटतो. त्याचवेळी भौतिक किंवा शारीरिक आनंद हा क्षणभंगुर असतो. पुरुष असो किंवा स्त्री असो, या दोन्हीच्या भविष्यासाठी शारीरिक आकर्षणाचे मायाजाल अणि सहजीवनाचा मार्ग हे कोणत्याही परिस्थितीत सुखद शेवट करत नाहीत. अशा सहजीवनाचा शेवट हा बहुतांश प्रकरणात कटूच झाला आहे. सहजीवनातून बाहेर पडल्यानंतर स्त्रीचे जीवन हे अतिशय कठीण, कष्टप्रद आणि आव्हानात्मक राहते. त्यांच्यासाठी नव्याने कौटुंबिक जीवन सुरू करणे जवळपास अशक्य बनून जाते.

पुरुषाची स्थितीदेखील फार चांगली राहत नाही. सहजीवनातील सहचारिणीने त्याला न्यायालयात ओढले तरी तिला आपल्या हाती काहीच शिल्लक राहिलेले नाही, असे कळून चुकते. म्हणूनच जीवनातील वास्तव आणि चित्रपटांतील प्रसंग यात जमीन-आस्मानाचा फरक असतो, हे समजून घेतले पाहिजे. पालकांनीदेखील संयमाने आणि शांततेने पाल्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. पालकांनी धैर्य आणि स्नेह दाखविल्यास प्रेम आणि आकर्षणातील फरक सांगण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर काळानुसार प्रेमसंबंधातील सखोलपणा पडताळून पाहण्याची विवेकबुद्धी मुला-मुलींमध्ये विकसित होऊ शकेल. ही बाब तरुण पिढीच्या सुखकर भविष्यासाठी महत्त्वाची आहे.

Back to top button