लोभस, राजस… स्टुअर्ट ब्रॉड! | पुढारी

लोभस, राजस... स्टुअर्ट ब्रॉड!

विवेक कुलकर्णी

सर डॉन ब्रॅडमन, माईक आर्थरटन व ग्रॅहम स्वॅन यांच्यातील एकाही दिग्गजाला कारकिर्दीची लौकिकानुरूप सांगता करता आली नाही. इंग्लिश क्रिकेट वर्तुळातील लोभस, राजबिंडे व्यक्तिमत्त्व स्टुअर्ट ब्रॉडचा मात्र त्याला अपवाद करावा लागेल. कारण, त्याने फलंदाजी करताना आपल्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला आणि गोलंदाजी करताना आपल्या शेवटच्या चेंडूवर विकेटही काढली!

साऊथ लंडनमध्ये सोमवारी सूर्यप्रकाशाची किरणे मैदानाच्या कानाकोपर्‍यात विसावली, त्यावेळी एका राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाच्या कारकिर्दीची शाही सांगता करणे, हाच त्यांचा त्या दिवशीचा सर्वोच्च प्राधान्यक्रम होता. तो दिवस स्टुअर्ट ब्रॉडसाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा दिवस होता. टिपिकल इंग्लिश वातावरणात चाहते टिपिकल इंग्लिश हॅट घालून नेहमीच्या थाटामाटात स्टेडियमवर पोहोचले आणि परिकथेतील राजकुमाराची स्क्रीप्ट लिहिली जावी, तसतसे ब्रॉडच्या शाही सांगतेची स्क्रीप्ट प्रत्यक्षात साकारत गेली.

एक दिवसापूर्वी ब्रॉड फलंदाजी करताना आपल्या शेवटच्या चेंडूवर प्रदीर्घकाळ संस्मरणात राहील, असा सणसणीत षटकार खेचण्यात यशस्वी ठरला होता. आश्चर्य म्हणजे समोर मिशेल स्टार्कसारखा कसलेला, मातब्बर होता अन् तरीही ब्रॉड त्याला लेग साईडकडे सीमापार लीलया पिटाळण्यात कमालीचा यशस्वी झाला होता. आता गोलंदाजीत चेंडू ब्रॉडच्या हाती आला, त्यावेळीही त्याच्याकडून अशाच करिष्म्याची अपेक्षा होती. धावफलक दर्शवत होता, ऑस्ट्रेलिया 9 बाद 334. कांगारूंना विजयासाठी आणखी 49 धावांची आवश्यकता होती; पण 49 धावा करणे ही त्यांची प्राथमिकता अजिबात नव्हती. येथे प्राथमिकता होती, शक्य असल्यास शेवटची विकेट पडू द्यायची नाही. जेणेकरून सामना अनिर्णीत राखता येईल; पण साऊथ लंडनमधील सकाळची सूर्यकिरणे ठरवूनच आली होती, ब्रॉडला आज शाही निरोप द्यायचा..!

झालेही तसेच. येथेही ब्रॉड लोभस ठरला, राजस ठरला… लेक्स कॅरे चकला. किंचित पुढे सरसावत चौथ्या स्टम्पवरील चेंडू टोलवायचा त्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि त्याने यष्टीमागे झेल देत एव्हाना तंबूचा रस्ता धरला… टिपिकल इंग्लिश प्रेक्षक राजबिंड्या ब्रॉडचे अभिनंदन करण्यासाठी, टाळ्या वाजवत स्टँडिंग व्हिएशनसाठी नकळत कधी उभे राहिले, त्यांचे त्यांनाही कळाले नाही. पुढील मिनिटभर लोभस, राजस ब्रॉडसाठी ओव्हलवरील कोपर्‍याकोपर्‍यांतून टाळ्यांचा तो गजर होतच राहिला…

लहानपणीच अस्थमा झाल्यानंतर आपली सारी हयात इनहेलर ओढत घालणार्‍या; पण कधीही त्याचा आपल्या खेळावर विपरीत परिणाम होऊ न देणार्‍या ब्रॉडलादेखील तो टाळ्यांचा गजर ऐकत असताना क्षणभर त्या अस्थम्याचा विसर पडला असेल!

इकडे ब्रॉडने आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर शेवटची विकेट घेतल्यानंतर त्याचे अभिनंदन करण्यासाठी सर्वप्रथम त्याच्याकडे पोहोचला, तो त्याचा नव्या चेंडूवरील सहकारी जलदगती गोलंदाज जिमी अँडरसन! ब्रॉडप्रमाणेच जिमी अँडरसनदेखील कारकिर्दीच्या उत्तरार्धात पोहोचलेला. जिमीने काहीच दिवसांपूर्वी 41 व्या वर्षात पदार्पण केलेय. आता जिमीचा आणखी बरेच खेळण्याचा इरादा आहे. ब्रॉडला मात्र कदाचित कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच निवृत्ती स्वीकारायची होती, ती त्याने खुल्या दिलाने, नेहमीच्या स्मित हास्याने स्वीकारली!

देवदुर्विलास काय असतो, ते पाहा! 75 वर्षांपूर्वी याच मैदानावर क्रिकेटचे शहेनशहा म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे सर डॉन ब्रॅडमन आपल्या शेवटच्या डावासाठी फलंदाजीला उतरले होते! कसोटीतील सरासरी 100 वर पोहोचण्यासाठी ब्रॅडमन यांना आपल्या शेवटच्या कसोटीतील शेवटच्या डावात फक्त 4 धावांची गरज होती.

सर ब्रॅडमन इतके महान की, अगदी ठरवले असते की, एक यष्टी घेऊन चेंडू चौकारासाठी ग्लान्स करायचा तर तसेही ते करू शकले असते; पण त्या दिवसाची सूर्यकिरणे त्यासाठी कदाचित राजी नव्हती!

सर ब्रॅडमन यांच्याकडून कळत-नकळत छोटीशी चूक झाली आणि क्रिकेटचा हा शहेनशहा इरिक हॉलिसच्या एका गुगलीवर शून्यावर त्रिफळाचित झाला! आश्चर्य म्हणजे, ब्रॅडमन यांचा तो डावातील केवळ दुसरा चेंडू होता. ब्रॅडमन यामुळे ज्या सरासरीवर आयुष्यभर अडकून पडले, ती होती 99.94!

जानेवारी 2004 मध्ये सिडनीत स्टीव्ह वॉ भारताविरुद्ध 80 धावांपर्यंत पोहोचला; पण येथेच त्याचीही गाडी अडखळली. 2001 मध्ये ओव्हलवरच माईक आर्थरटन उंचापुर्‍या ग्लेन मॅकग्राला कसोटीत 19 व्यांदा बाद झाला. तंबूकडे परतत असताना त्याची निराशा त्याला चेहर्‍यावरून लपवता येत नव्हती. या कसोटीच्या दुसर्‍याच दिवशी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अपयशी, निराशदायी निवृत्ती!

रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाचा छोट्या चणीचा महान फलंदाज. त्याने हयातभर भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या बॅटीचे पाणी पाजण्यात तसूभरही कसर सोडली नव्हती; पण वयाच्या अडतिशीकडे झुकत असतानाही कुठे थांबायचे, हे कळत असतानाही तो थांबला नाही आणि जे व्हायचे तेच झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या शेवटच्या कसोटी मालिकेत तो 0, 4, 16, 4, 8 अशा किरकोळ धावांचा मानकरी झाला. या शेवटच्या मालिकेतील अपयशाची खंत त्याला हयातभर सलत राहिली.

मायकल क्लार्क मात्र या निकषावर बराच सुदैवी ठरला. त्याने 2015 चा विश्वचषक जिंकल्यानंतर लगोलग निवृत्ती स्वीकारली आणि अ‍ॅशेस झाल्यानंतर कसोटीलादेखील अलविदा केला. अ‍ॅलिस्टर कूकनेही 2018 मध्ये भारताविरुद्ध ओव्हलवर 71 व 147 धावा फटकावत शाही थाटात कारकिर्दीचा समारोप केला. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने तर विंडीजविरुद्ध छोटेखानी मालिका खेळत स्वप्नवत सांगता कशी असावी, याचा मूर्तिमंत दाखलाच दिला आणि आता तोच कित्ता बर्‍याच प्रमाणात स्टुअर्ट ब्रॉडने गिरवलाय..!

राजस, लोभस स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त झाला, त्यावेळी आपल्या युवराजनेही त्याचे अभिनंदन केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. ब्रॉडही तितकाच सुस्वभावी. तो प्रत्युत्तरात म्हणाला, ‘थँक्स युवी! तू कदाचित त्या दिवशी माझ्या एकाच षटकात एकापाठोपाठ एक असे 6 षटकार खेचले नसतेस, तर मी आज इतका प्रगल्भ क्रिकेटपटू कधीच होऊ शकलो नसतो!’

खरे आहे ते… इंग्लिश क्रिकेट गाजवणार्‍या ख्रिस ब्रॉडचा हा लोभस, राजस सुपुत्र स्टुअर्ट ब्रॉड पुन्हा आंतरराष्ट्रीय पटलावर दिसणार नाही, याची हुरहुर दर्दी क्रिकेट रसिकांना जाणवतच राहणार आहे. ब्रेव्हो ब्रॉडला मनापासून शुभेच्छा!

Back to top button