मनोरंजन : नव्या पिढीचं नवं रामायण | पुढारी

मनोरंजन : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. नव्या पिढीला हे रीलिजआधीच प्रचंड ट्रोल झालेलं रामायण कितपत आपलंसं वाटेल, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भारतीय सिनेसृष्टीतल्या महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या श्रीशैलम राजामौलीचा ‘बाहुबली’ प्रदर्शित झाला, त्याला येत्या महिन्यात सात वर्षे पूर्ण होतील. ‘बाहुबली’ने लोकल तेलगू सिनेसृष्टीला ग्लोबल ओळख मिळवून दिलीच, त्याचबरोबर भारतीय सिनेमाचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. बिग बजेट सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ‘बाहुबली’च्या आधीचा आणि नंतरचा सिनेमा या द़ृष्टिकोनातून भारतीय सिनेजगताकडे बघायला हवं. सिनेमातल्या स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्सची क्रेझ आणि त्याबद्दलचं गांभीर्य ‘बाहुबली’ने खर्‍या अर्थाने वाढवलं. मोठं बजेट असेल तर आपली कथा अधिक भव्यदिव्यतेने मांडता येऊ शकते आणि त्यातून पैसाही कमावता येऊ शकतो हा आत्मविश्वास ‘बाहुबली’ने आणखीनच द़ृढ केला. त्यानंतर ‘बाहुबली’शी स्पर्धा करू पाहणार्‍या सिनेमांची जंत्रीच लागली. ‘आदिपुरुष’ हा नवा सिनेमाही त्यांच्यापैकीच एक!

‘बाहुबली’ने बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व जमवताना यशाचे आणि व्यावसायिक फिल्म मेकिंगचे नवे मापदंड प्रस्थापित केले. त्याआधी ‘कोई मिल गया’ आणि रजनीकांतच्या ‘रोबोट’सारखे एखाददुसरे सन्माननीय अपवाद वगळता अगदीच कार्टूनसद़ृश व्हीएफएक्स भारतीय सिनेमांमधून दाखवले जात होते. त्याच व्हीएफएक्सच्या मदतीने आपण काय कमाल करू शकतो, हे राजामौलीने या सिनेमातून दाखवून दिलं.

दुसरी गोष्ट म्हणजे, भव्यदिव्यतेचा हव्यास. व्हीएफएक्सचा योग्य वापर करून खर्‍याखुर्‍या, खर्चिक सेटऐवजी स्वस्तात संगणकीकृत सेट उभारणं सोपं असल्याचं चित्र ‘बाहुबली’ने रंगवलं. त्या जोरावर आपली गोष्ट आणखी भव्यदिव्यतेने मांडता येऊ शकते, असं अनेकांना वाटलं आणि त्यांनी तसा प्रयत्नही केला; पण मोठमोठ्या निर्मितीसंस्था, अवाढव्य बजेट आणि आगळीवेगळी कथानकं असूनही ‘बाहुबली’ची भव्यता गाठणं त्यांना जमलं नाही.

भारतीय पुराणकथा, ऐतिहासिक कथांना पडद्यावर साकारणं हे तसं जिकिरीचं काम. स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना असलेली प्राचीन नगरं, त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, अफाट सेना, लढाईची रणधुमाळी असा तो वैभवशाली काळ पडद्यावर उभा करण्याचं शिवधनुष्य ‘बाहुबली’च्या व्हीएफएक्स टीमने लीलया पेललं. त्यामुळे व्हीएफएक्सच्या जोरावर पौराणिक, ऐतिहासिक महानाट्यांना रुपेरी पडद्यावर आणण्याची एक चढाओढच सिनेजगतात सुरू झाली.

‘बाहुबली’चीच आणखी एक देणगी म्हणजे प्रभास हा तेलगू अभिनेता. ‘बाहुबली’त मध्यवर्ती भूमिका साकारणार्‍या प्रभासला या सिनेमातून मिळालेली प्रसिद्धी ‘न भूतो, न भविष्यती’ अशाच प्रकारची होती. ‘साहो’, ‘राधेश्याम’मधून त्याची वाढलेली क्रेझ तिकीटबारीवर खपवण्याचा अपयशी प्रयत्नही केला गेला. आता दिग्दर्शक ओम राऊतनेही प्रभासला ‘आदिपुरुष’मध्ये श्रीरामाची भूमिका देऊन ‘बाहुबली’ची क्रेझ खर्‍या अर्थाने अधोरेखित केलीय.

गांधी जयंतीचं निमित्त साधत ‘आदिपुरुष’चा टीजर रीलिज केला गेला. या टीजरमुळे ओम राऊत, प्रभास आणि ‘आदिपुरुष’शी संबंधित इतरांना ट्रोल केलं गेलं. त्याचं कारणही तसंच होतं. टीजरमध्ये दिसणारा अयोग्य व्हीएफएक्सचा भडिमार हे खरं तर यामागचं प्रमुख कारण होतं. आजवरच्या रामायणाचं मूळ स्वरूपच बदलून टाकणारे हे व्हीएफएक्स बघून साहजिकच प्रेक्षकांचा रसभंग झाला होता.

सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर ओमने आपली भूमिका जाहीर केली. त्याच्या मते, हा सिनेमा नव्या पिढीला रामायण कळावं, यासाठी बनवला गेलाय. त्याचबरोबर ते जागतिक पातळीवरही हिट व्हावं, असा यामागचा उद्देश असल्याचं ओमने सांगितलं होतं. मार्व्हल, डीसीच्या सुपरहिरोंना आपला आदर्श मानणारी, त्यांच्या कथा चवीने बघणारी नवी पिढी हे रामायणही स्वीकारेल, असा त्याचा अंदाज असावा.

1993 च्या ‘रामायणा : द लिजंड ऑफ प्रिन्स रामा’ या जपानी अ‍ॅनिमेशनपटाचा प्रभाव आपल्यावर असल्याचं ओमने ‘व्हरायटी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यातूनच त्याने ‘आदिपुरुष’ बनवण्याची प्रेरणा घेतल्याचं तो सांगतो. रामाऐवजी राघव, रावणाऐवजी लंकेश, सीतेऐवजी जानकी आणि हनुमानाऐवजी बजरंग अशा पद्धतीने प्रमुख पात्रांचं बारसं करत आपण नव्या पिढीला रामायण सांगत असल्याचा दावा ओमने केलाय.

आता साठीच्या उंबर्‍यावर बसलेल्या पिढीने ‘गीतरामायण’सारख्या अजरामर कलाकृतींमधून रामायण अनुभवलंय. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’चा असलेला पगडा तिशी-चाळिशीतल्या पिढीवर अजूनही टिकून आहे. तेच ‘रामायण’ लॉकडाऊनच्या काळात पुन्हा बघणारी विशी-पंचविशीतली पिढी ‘रामायणा : द लिजंड ऑफ प्रिन्स रामा’मधल्या राम-सीतेच्या देखण्या जोडीवर जीव ओवाळून टाकताना दिसते. त्यामुळे हे सर्व जण ओम राऊत आणि ‘आदिपुरुष’च्या मूळ हेतूबद्दल साशंक असणं साहजिकच आहे.

‘लोकमान्य’, ‘तान्हाजी’सारख्या ऐतिहासिक घडामोडींवर आधारित सिनेमांमधून नावलौकिक मिळवलेल्या ओम राऊतने ‘आदिपुरुष’ची घोषणा केल्यामुळे साहजिकच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यात कुठल्याही ऐतिहासिक, पौराणिक मालिकेच्या नायकाला शोभेसं व्यक्तिमत्त्व लाभलेला प्रभास या सिनेमात मुख्य भूमिका साकारतोय, यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती; पण त्यांचा रसभंग व्हायला फार वेळ लागला नाही.

सप्टेंबर 2022 मध्ये प्रभासने त्याचा लूक इन्स्टाग्रामवर जाहीर केला आणि इथंच वादाची पहिली ठिणगी पडली. आजवर दाढी-मिशी नसलेल्या राममूर्तीसमोर नतमस्तक होणार्‍यांनी प्रभासच्या पिळदार मिशी ठेवलेल्या ‘राघव’ला बघून तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढे महिन्याभरातच टीजर रीलिज झाला आणि त्यात आधुनिकीकरणाच्या नावाखाली भरमसाट व्हीएफएक्स वापरून रामायणाची केलेली मोडतोड पाहून वादाला तोंड फुटलं.

‘प्रभास + व्हीएफएक्स + पौराणिक महानाट्य’ ही बॉक्स ऑफिसवर हमखास यश देऊ शकणारी ‘बाहुबली’ त्रिसूत्री ओम राऊत प्रभावीपणे राबवू शकला नसल्याचं त्या टीजरमधून स्पष्ट दिसत होतं. जगभर गाजलेल्या अनेक कलाकृतींची नक्कल केल्याचे आरोप या टीजरवर केले गेले. निव्वळ व्हीएफएक्ससाठी 250 कोटींचा चुराडा होऊनही प्रेक्षकांनी टीजर नाकारला. नुकत्याच रीलिज झालेल्या ट्रेलरचीही तीच गत झाली.

स्वस्त व्हिडीओ गेमचा अनुभव देणार्‍या दर्जाहीन व्हीएफएक्ससोबतच पारंपरिक रामकथेची विपरीत मांडणीही प्रेक्षकांना खटकली. चामडं परिधान करणारा हनुमान, रावणाचं अनाठायी इस्लामीकरण, पौरुषत्वाच्या तथाकथित आधुनिक व्याख्येला अनुसरून दाढी, मिशी ठेवणारे राम-लक्ष्मण हे सगळंच खटकणारं होतं. रामायणाच्या वेगवेगळ्या उपलब्ध आवृत्त्यांचा व्यवस्थित अभ्यास दिग्दर्शकाने केलेला नाही, हेच या प्रोमोंमधून दिसत होतं.

यशापयशाचे दूरगामी परिणाम

इतक्या वादग्रस्त प्रवासात हेलकावे खात ‘आदिपुरुष’ची नाव आता थिएटरच्या किनार्‍यावर पोहोचलीय. ‘आदिपुरुष’ पहिल्याच दिवशी 80 कोटींहून अधिक कमाई करेल, असा अंदाज आघाडीचे सिनेव्यवसाय विश्लेषक कोमल नाहटा यांनी नोंदवलाय. या सिनेमाला येत्या काळात मिळणारा प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः, आगामी निवडणुकांच्या द़ृष्टीने सिनेमाची आणि त्यातल्या रामकथेची स्वीकृती विशेष महत्त्वाची मानली जातेय.

सिनेमात रावणाच्या खलनायकी भूमिकेचं जोरदार इस्लामीकरण करण्यात आलंय. या सिनेमातला रावण हा ऐय्याश, सत्तांध इस्लामी आक्रमकांच्या खर्‍याखोट्या वर्णनांनुसार रंगवला गेलाय. अभिनेता सैफ अली खान साकारत असलेला हा लंकेश आता हिंदूंच्या आराध्य दैवतांपैकी एक असलेल्या राघवशी दोन हात करताना दिसणार आहे.

‘लोकमान्य’, ‘तान्हाजी’मध्ये ऐतिहासिक तथ्यांची सोयीस्कर तोडमोड करणार्‍या ओमने यावेळी थेट पुराणालाच हात घातलाय. या सिनेमात तो मांडत असलेलं कथानक हे सध्याच्या फॅन फिक्शनच्या धर्तीवर रचलेल्या ऐतिहासिक, पौराणिक कादंबर्‍यांशी मिळतंजुळतं आहे. ‘आदिपुरुष’चं यश हे अशा कादंबर्‍यांच्या निर्मिती आणि विक्रीला तर चालना देईलच, त्याचबरोबरीने त्यांचं नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करण्याच्या शक्यतांनाही जन्म देईल.

प्रथमेश हळंदे 

Back to top button