क्रिकेट : क्रिकेटचा सुपरस्टार! | पुढारी

क्रिकेट : क्रिकेटचा सुपरस्टार!

तो आला, त्याने पाहिले अन् तो जिंकला… असे त्याच्याबाबतीत अनेकदा घडले. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकण्यास कमी करत नाही. रेल्वेत टीसी असताना विनातिकीट प्रवासी पकडणार्‍या या अवलियाने क्रिकेट जगतात पाऊल टाकले आणि आपण जिथे जातो, तेथे सोने करतो, हेच जणू दाखवून दिले.

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर फेकला गेला होता. यादरम्यान, गुजरातच्या निवडणुकांचा फड सुरू झाला आणि रवींद्र जडेजा आपली पत्नी रिवाबाच्या प्रचारासाठी बाहेर पडला. अर्थातच, जडेजाने प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर यावर अनेक मतमतांतरे नोंदवली गेली. वास्तविक, या दिग्गज खेळाडूच्या गैरहजेरीत आशिया चषक व टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक ठरल्याने चाहते यावर नाराज होते. त्यानंतर 4-5 महिन्यांचा कालावधी लोटला आणि रवींद्र जडेजा तंदुरुस्त होऊन 22 यार्डांच्या खेळपट्टीवर नव्या जोमाने परतला. बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेत भारताने विजयश्री संपादन केली. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर खेळ बहरत गेला. पुढे आयपीएल सुरू झाले आणि या हंगामातील शेवटच्या दोन चेंडूंवर एक षटकार व एक चौकार फटकावत जडेजा हीरो ठरला.

जडेजाने चौकार मारला, तो क्षण त्याची पत्नी रिवाबाच्या कॅमेर्‍यात कैद झाला होता. रिवाबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ती मैदानात आली, तिने जडेजाकडे एका प्रेमळ नजरेने पाहिले आणि एका क्षणार्धात त्याच्या बाहुपाशात विसावली. त्या दिवशी जडेजा गुजरात निवडणुकीत रिवाबाचा विजय पाहत होता आणि येथे रिवाबा ही आयपीएलच्या रणांगणावर जडेजाचा विजय पाहत होती!

योगायोग यापेक्षा वेगळा काय असू शकतो?

आता ज्या जडेजाने अगदी मोक्याच्या क्षणी, शेवटच्या क्षणी आयपीएल जिंकून दिली, त्याच्यासाठी रोल मॉडेल एकच, तो म्हणजे, रांचीचा 1981 मधील जन्म असलेला सुपरस्टार महेंद्रसिंग धोनी!

तसे पाहता, धोनी व चेन्नई ही खर्‍या अर्थाने एक लव्ह स्टोरीच! म्हणतात ना, ‘सूर्याने मावळावे, सूर्यफुलाने वळावे, या भक्तीतले प्रेम कसे कोणाला कळावे!’ तसेच धोनीचे व चेन्नईचे आहे.

क्रिकेटमधील निष्णात ब्रेन म्हणून ओळखल्या जाणार्‍या धोनीसाठी ही शेवटची आयपीएल ठरू शकते, असा होरा असल्याने या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने जेथे जेथे चेन्नईचे सामने झाले, तेथे तेथे अक्षरश: रस्त्यारस्त्यांवर पिवळा समुद्रच अवतरला. डोक्यावर बर्फ असेल, असे प्रचंड संयमी व्यक्तिमत्त्व आणि जिभेवर साखर असेल अशी वाणी, ही धोनीची जणू कवचकुंडले आणि क्रिकेटिंग ब्रेनबाबत तर काही प्रश्नच नाही.

पंचांच्या एखाद्या निर्णयाबद्दल साशंकता असेल किंवा त्यावर दाद मागायची असेल, तर डीआरएस घेता येतो. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम हा त्याचा सोपा अर्थ. पण, धोनी यातही इतका निष्णात होता की, या डीआरएसला डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमऐवजी धोनी रिव्ह्यू सिस्टीम असे संबोधले जायचे. धोनीने रिव्ह्यू घेतला म्हणजे फलंदाज बाद असणारच, हे ओघानेच यायचे.

याच हातोटीमुळे धोनीला स्टारडम प्राप्त झाले. त्याची ब्रँड व्हॅल्यू उत्तरोत्तर वाढत गेली आणि अशा सर्वोच्च शिखरावरून उतरणेदेखील तितके सोपे असत नाही. धोनीने रागरंग पाहून घोषणा केली, ‘शरीराने साथ दिली तर पुढील आयपीएल मी निश्चितपणाने खेळेन!’

मागील दोन महिन्यांवर एक नजर टाका. एक गोष्ट सहज लक्षात येईल की, जेथे जेथे धोनी गेला, तेथे तेथे त्याचे चाहते हमखास पोहोचले. आता धोनी यात धावा करतो, किती करत नाही, ही बाब तेथे अजिबात महत्त्वाची नव्हती. इथे महत्त्वाची होती ती त्याची हजेरी, त्याचे चेहर्‍यावरील स्मित हास्य आणि अर्थातच, त्याचा मिडास टच! 2008 पासून चालत आलेला त्याचा करिश्मा आजही कायम आहे, हेच यंदाची आयपीएल स्पर्धा शिकवून गेली.

आता धोनीचे चाहते सर्व वयोगटातील आहेत. आबालही आहेत आणि वयोवृद्धही. ना त्याला भाषेचा अडसर, ना धर्माची अडचण. धोनी खेळतो ती शैली अगदी अपारंपरिक; पण त्याने आपले जे प्रतिबिंब या सार्‍या वर्षांच्या प्रवासात उमटवले, त्याला तोड नाही. धोनी मैदानात साधा आणि मैदानाबाहेरही साधा. काही खेळाडू थोड्याशा यशानेही हुरळून जातात; पण सर्वोच्च यश प्राप्त केल्यानंतरदेखील धोनीचे पाय मातीवरच राहिले, ही सर्वात महत्त्वाची बाब. एखादी वाईन जसजशी जुनी होत जाते, तसतशी ती अधिकच मधूर होत जाते. धोनीचेही तसेच असावे कदाचित. तो जितका जुना होतोय, तितका तो मधूर होतोय, हवाहवासा वाटतोय! अगदी अलीकडचेच उदाहरण घेऊयात. चेन्नई सुपर किंग्ज संघ चेन्नईतील क्राऊन प्लाझा हॉटेलमध्ये उतरला होता. धोनीने रूम सर्व्हिसला फोन करून कटलरी मागवली होती; पण त्यांच्याकडून थोडासा उशीर झाला आणि भीडभाड न बाळगता दस्तुरखुद्द धोनी स्वत: खाली आला. त्याला सर्व्हिस सेक्शन कुठे आहे, याची कल्पना होती. त्याने आपल्याला जे हवे होते, ते घेतले आणि स्मित हास्याने धन्यवाद देत आपल्या रूमकडे निघाला. क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणारी एखादी व्यक्ती इतकी साधीसुधी असू शकते, याचा दाखला धोनीच्या साधेपणातून मिळतो.

15 वर्षांपूर्वी आयपीएल सुरू झाले, त्यावेळी धोनीच चेन्नईचा कर्णधार होता. या स्पर्धेतील उद्घाटनाच्या वर्षात राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिळवले, त्यावेळी त्या संघाचा कर्णधार शेन वॉर्नची मुक्त कंठाने प्रशंसा झाली व ते साहजिकही होते. वॉर्नकडे कसे नेतृत्व गुण आहेत, यावर बरीच चर्चा रंगली. ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला ही बाब कशी हेरता आली नाही, यावरही किस्से झडले; पण याच वॉर्नला तोडीस तोड उत्तर देऊ शकेल, असा आणखी एक कल्पक खेळाडू धोनीच्या रूपाने घडतो आहे, याची क्वचितच कोणाला कल्पना आली असेल.

पहिल्या वर्षी आयपीएल जिंकल्यानंतर वॉर्न आणखी खेळला; पण त्याला पहिल्या वर्षाच्या जादूची पुनरावृत्ती करता आली नाही. धोनी नामक कल्पक खेळाडूने मात्र क्रिकेटमध्ये नवनवी शिखरे गाठली. राजस्थानसाठी 2008 मध्ये जे वॉर्नने करून दाखवले, त्याची प्रचिती धोनीने त्यानंतर सातत्याने दिली. यंदा आयपीएलमध्ये पाचव्या जेतेपदाची पुनरावृत्ती करत धोनीने आपला करिश्मा पुन्हा एकदा प्रत्यक्षात साकारून दाखवला.

नेतृत्व साकारत असताना शांत राहायचे असते, याचा धोनीने अनेकदा दाखला दिला. दीपक चहरने शुभमन गिलचा झेल सोडला, त्यावेळी धोनी शांतपणे मागे आला आणि गोलंदाजाला गुड बॉलचा निर्देश केला. पोस्टमॉर्टम सामन्यादरम्यान नव्हे, तर सामन्यानंतर करायचे असतात, यावर त्याचा सातत्याने विश्वास राहिला.

चेन्नईने पहिले आयपीएल जिंकले, त्यावेळी धोनी 28 वर्षांचा होता. आश्चर्य म्हणजे, 35 व्या वर्षानंतर त्याने चेन्नईला तीन आयपीएलवर विजयश्री मिळवून दिली. उत्तम कर्णधार साध्या खेळाडूंच्या संघालादेखील विजयाच्या किनार्‍यापर्यंत घेऊन जाऊ शकतात, याचे नितांतसुंदर उदाहरण म्हणजे यंदाचे आयपीएल! साहजिकच, शेवटच्या 2 चेंडूंत 10 धावांची आतषबाजी करत आयपीएल जेतेपदावर मोहर उमटवून देणार्‍या रवींद्र जडेजाने सहकार्‍यांसमवेत आनंद साजरा करत असताना सर्वप्रथम अत्यानंदाने उचलून धरले ते धोनीलाच! कारण त्याला पक्के ठाऊक होते, या विजयाचा खरा हक्कदार धोनीच आहे. धोनी आहे म्हणून सीएसके आहे आणि सीएसके आहे म्हणूनच धोनी आहे, असे म्हणायचे ते यासाठीच!

विवेक कुलकर्णी

Back to top button