करिअर : यूपीएससी निकालांचे उणे-अधिक | पुढारी

करिअर : यूपीएससी निकालांचे उणे-अधिक

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवडले जाणारे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची पदे यांचा आजही मोठा प्रभाव समाजमनावर आहे. त्या प्रभावातून लाखो मुले आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणून लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा मार्ग निवडतात. त्यातही ‘व्हायचे तर फक्त आयएएसच’, असे मनात ठरवतात. देशात अत्यंत मोजक्या जागेसाठी देशभरातील लाखो मुले प्रयत्न करतात. यातील साधारणतः एक टक्का मुले यशस्वी होतात आणि 99 टक्के मुलांच्या वाट्याला अपयश येते. कोणी निराशेच्या छायेत स्वतःला झोकून देत संपवणे पसंत करतात. कोणी आपला हा मार्ग नाही असे म्हणत पुन्हा माघारी फिरतात. कोणी तरी आता आपले वय निघून गेले आहे म्हणून पुन्हा जे मिळेल ते काम करू लागतात. या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांची होणारी दमछाक आणि कोट्यवधी रुपयांच्या होणार्‍या आर्थिक उलाढालीत कोणीतरी श्रीमंत होते आणि कोणी तरी गरिबीतच स्वतःला शोधत राहते. या परीक्षांचे गारूड वर्तमानातील शिकलेल्या तरुणाईवर अधिक आहे, हेही दखलपात्र ठरत आहे. येत्या काही काळात हा आकडा आणखी उंचावणार यात शंका नाही.

आपल्या समाजमनावर सरकारी नोकरी आणि वरिष्ठ पदावरील असेल तर तिचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. त्यातच आयएएस पात्रताधारक अधिकारी म्हणजे सर्वोच्च अधिकारी मानले जातात. त्यामुळे मनाचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील लाखो मुले दरवर्षी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि केवळ शेकड्यात विद्यार्थी पात्र ठरतात. यावर्षीचा विचार करता यंदा यूपीएससी परीक्षांसाठी देशातून 11 लाख 35 हजार 697 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 5 लाख 73 हजार 735 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी 13 हजार 90 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले. लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी दोन हजार 539 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यातील अवघे 933 उमेदवार पात्र ठरले. त्यामध्ये 613 मुले व 320 मुली आहेत. त्यात या सर्व पात्र सूचीमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 85 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. यावर्षी राज्यातील उमेदवारांची संख्या घटली आहे.

2019 मध्ये देशातील 11 लाख 35 हजार 261 उमेदवार होते तर 2020 मध्ये 10 लाख 57 हजार 948 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. साधारणपणे आपण वरील आकडेवारीवर नजर टाकली तर दहा लाखांचा टप्पा आता उमेदवारांनी पार केला आहे. त्यापैकी साधारण प्रत्येकवेळी एक हजार उमेदवार पात्र ठरत आहेत. दरहजारी एक विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. यावरून परीक्षेच्या काठिण्य पातळीचा अंदाज बांधता येईल. परीक्षा कठीण असली तर सातत्याने येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रयत्न करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात 1950 साली तीन हजार 647 उमेदवार परीक्षेसाठी बसले होते तर त्यापैकी दोन हजार 497 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि 240 उमेदवार पात्र ठरले होते.

आता प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांचा आलेख किती उंचावला आहे हे सहजतेने लक्षात येईल. खरे तर इतके मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात; पण पहिल्या प्रयत्नानंतर पुन्हा माघारी फिरणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. जेवढ्या म्हणून संधी आहेत, तितक्यावेळी प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. भारतीय प्रशासन सेवेत एकूण 24 सेवांचा समावेश असला, तरी आयएएससाठीच आपण पात्र ठरावेत म्हणून पुन्हा प्रयत्न करणार्‍या उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. याचे कारण या पदांचा प्रभाव आणि त्या पदाला समाजमनात असणारी मोठी प्रतिष्ठा व अधिकार हे आहे. समाजाची सेवा करण्यासाठी ही अधिक उत्तम पदे आहेत. सत्ता, संपत्ती, अधिकार, संधी सर्व या पदावर रुजू झाल्यानंतर मिळते. त्यामुळे त्यांचे आकर्षण असणे साहजिक आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना अलीकडे या पदाचे आकर्षण वाढले असून तशी स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. पालकांमध्ये वाढलेली जागृती, अधिकाराचे आकर्षण यातून मुलांच्या मनावर परीक्षांचे महत्त्व बिंबवणे घडत आहे. आपल्या पाल्याला आय.ए.एस. करायचे असे ठरवून बारावीनंतरच पालक प्रयत्न करतात.

विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या आकांक्षांमुळे येथील परीक्षांसाठीची तयारी म्हणून शिकवणी वर्गांची उलाढालही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासाठी देशभरातील विशिष्ट शहरे आता प्रसिद्ध होऊ लागली आहेत. आयआयटीसाठी कोटा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी दिल्ली ही शहरे ओळखली जाऊ लागली आहेत. देशभरातून लाखो मुले केवळ स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शहरातील शिकवणीला प्रवेश घेताना दिसत आहेत. शिकवणीची फी, भोजन खर्च, राहण्यासाठीची सुविधा, पुस्तके यासाठी प्रति विद्यार्थी दरवर्षी किमान तीन लाख रुपये खर्च केला जातो. देशात सरासरी 11 लाख विद्यार्थी प्रविष्ठ होणारे विद्यार्थी आणि प्रति विद्यार्थी तीन लाख म्हटले तर होणार्‍या उलाढालीचा अंदाज सहजतेने येऊ शकेल. शिकवणी न लावणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे हेही लक्षात घ्यायला हवे.

आपण गत काही वर्षांचा अभ्यास केला तर देशातील विशिष्ट शहरांमधील उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. ही शहरे देखील फार नाहीत. या दिशेने प्रवास करणारे विद्यार्थी हे अशिक्षित, कमी आर्थिक स्तरातील कुटुंबातून येणार्‍यांचे प्रमाणही अत्यंत कमी आहेत. या वर्गातून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिसत असली तरी ती ठळक मात्र नाही. देशातील विशिष्ट राज्यांतून येणार्‍या अधिकार्‍यांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामानाने महाराष्ट्राची आकडेवारी फार मोठी नाही. दरवर्षी साठ ते शंभर विद्यार्थी उत्तीर्ण होता आहेत. साधारणतः सहा ते 9 टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्राच्या वाट्याला येत आहे. अर्थात यासाठी राज्य सरकार विविध सुविधा उपलब्ध करून देत असल्याने हे प्रमाण वाढत असून हा प्रयत्न दखलपात्र आहे हेही लक्षात घ्यायला हवे.

देशातील दिल्ली विद्यापीठातील सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरत आहेत. मग आपली विद्यापीठे त्या दिशेने फारसे प्रयत्न करत नाहीत का? अलीकडे काही विद्यापीठांनी संलग्न महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू केली आहेत. ग्रंथालये उपलब्ध आहेत. पण आपल्या परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्था स्वयंअध्ययनास प्रेरित करत नाहीत. त्यामुळे येथेही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाची अपेक्षा असते. सवय नसल्याने अनेकदा काय आणि कसा अभ्यास करायचा याची ओळख नसते. मुळात पात्र ठरण्यासाठी अंगी मूलभूत गुण हवे असतात.

त्यासाठी विविध प्रकारचे साहित्य वाचनाची सवय, उत्तम आकलन, चौकसपणा, अभ्यासाची उत्तम बैठक, कोणत्याही विषयावर ठामपणे मते, विचारांचे नेमकेपणे प्रतिपादन करणे, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, परिश्रम करण्याची वृत्ती, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, स्वयंअध्ययन हे गुण अंगी असल्याशिवाय कठीण मार्गाची वाट चालणे शक्य नाही. यासाठी विद्यार्थी स्वतः किती कष्ट घेणार यावरच हे यश अवलंबून असते. त्यामुळे केवळ स्वप्नं पेरून फार काही हाती लागत नाही. त्यासाठी अभ्यासाची वृत्ती विकसित करण्याचे आव्हान आहे.

विद्यार्थ्यांनी हा मार्ग निवडताना आपल्या क्षमतांचा विचार करायला हवा. पात्र ठरण्यासाठी जे गुण आवश्यक असतात, तेच गुण पात्र ठरल्यानंतर विद्यार्थ्याला स्वतःची जबाबदारी पार पडण्यासाठी अधिक मदत करणारे ठरत असतात. ही पदे म्हणजे समाज परिवर्तनाच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाची पदे आहेत. देशातील स्पर्धा परीक्षांच्या मागे लागणारे अनेक विद्यार्थी निराशेत सापडतात. देशात तरुणांच्या होणार्‍या एकूण आत्महत्यांपैकी एक तृतीयांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या निराशेतून आत्महत्या करतात. त्यामुळे आज यशस्वी विद्यार्थी दिसत असले तरी अपयशी ठरणार्‍या विद्यार्थ्यांचा विचारही महत्त्वाचा आहे.

संदीप वाकचौरे

Back to top button