गुन्हेगारी : ‘मधुजाला’चा विळखा | पुढारी

गुन्हेगारी : ‘मधुजाला’चा विळखा

डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा ठपका ठेवत दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. हनी ट्रॅपचा वापर अलीकडील काळात वाढला असून जवळपास 200 हून अधिक प्रकरणे उघडकीस आली आहेत.

हनी ट्रॅप ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रॅक्टिस इन्व्हॉल्व्हिंग युज ऑफ रोमँटिक ऑर सेक्शुअल रिलेशनशिप फॉर इंटरपर्सनल, पॉलिटिकल ऑर मॉनेटरी पर्पझ किंवा हेरगिरीचा एक प्रकार आहे. यामध्ये शत्रू राष्ट्रातील महत्त्वाच्या व्यक्तीशी मानसिक, शारीरिक-लैंगिक संबंध प्रस्थापित केले जातात. अशी व्यक्ती एखादा शास्त्रज्ञ असू शकते, राजकीय नेता असू शकते, एखादा सैन्याधिकारी असू शकते किंवा अन्य कुणीही असू शकतो. हनी ट्रॅपचा मुख्य उद्देश गोपनीय माहिती मिळवणे हा असतो. या व्यक्तीशी भावनिक, शारीरिक आणि लैंगिक असे संबंधांचे तीन टप्पे अचूक पार पडले की त्याचे फोटो-व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग केले जाते. या ब्लॅकमेलिंगमध्ये एक तर पैशांची मागणी केली जाते किंवा गोपनीय माहितीची किंवा एखादी ‘खबर’ काय आहे ती सांगण्यासाठी दबाव आणला जातो. एकदा या ‘मधुजालात’ अडकल्यानंतर अशा प्रकारचा दबाव झुगारता येणे शक्य नसते. कारण आपल्या बदनामीचा, चारित्र्यहननाचा धोका समोर दिसत असतो. त्यामुळे गळाला लागलेला मासा अधिक गुंतत जातो.

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हे अशाच हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा ठपका ठेवत दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्यांना अटक केली आहे. त्यांचा तपास सुरू असून याविषयीच्या अनेक धक्कादायक बातम्या सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. त्यानुसार डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हकडून करण्यात आला होता. जारा दास गुप्ता असे ट्रॅप करणार्‍या पाकिस्तानी इंटेलिजन्सने आपले नाव सांगितले होते. कुरुलकरांनी शारीरिक संबंध ठेवले होते की नव्हते हे समोर आलेले नाहीये; पण ते एका वर्षामध्ये सहा वेळा देशाबाहेर जाऊन आले असल्याने सद्य:स्थितीत कोणत्याही शक्यता नाकारता येणार नाहीत.

हनी ट्रॅपची सुरुवात पहिल्या महायुद्धापासून झाली. ब्रिटिशांनी जर्मन लोकांकडून माहिती काढून घेण्यासाठी माताहारी या महिला एजंटचा उपयोग केला होता. दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेने असाच वापर केला होता. तिचे टोपण नाव सिंडी असे होते. इस्रायलच्या अणुकार्यक्रमाविषयीची माहिती जगाला देणार्‍या मोर्डेखाई वनुनू या अधिकार्‍याला पकडण्यासाठी इस्रायलने सिंडीचा अचूकपणे वापर केला होता. शीतयुद्धाच्या काळानंतर हनी ट्रॅपसाठी केजीबीकडून अमेरिकेसाठी मझनो गर्ल्सचा वापर केला जाऊ लागला. सध्या चीनच्या गुप्तचर संस्थेकडून अशा प्रकारच्या हनी ट्रॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कुरुलकरांच्या प्रकरणामध्ये याही मुद्द्याचा विचार केला जाणे आवश्यक आहे. कदाचित चीनने आयएसआयकडून सापळा रचून कुरुलकरांसारख्या वरिष्ठ शास्त्रज्ञाकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. कारण भारताकडील अत्याधुनिक शस्त्रसामग्रीविषयी, संरक्षण क्षेत्रातील गोपनीय तंत्रज्ञानाविषयी पाकिस्तानपेक्षा चीनला अधिक रुची आहे.

महिलांचा वापर करून राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडील काळात वाढला असून त्यामध्ये डीआरडीओपासून सैन्यापर्यंत अनेक जण अडकल्याचे समोर आले आहे. जवळपास 200 हून अधिक अशी प्रकरणे मागील काळात घडलेले आहेत. हा एक सायबर हेरगिरीचा प्रकार आहे. संरक्षण खात्यातील एखादा अधिकारी, जवान किंवा उच्चपदस्थ अधिकारी अशा मधुजालात अडकतो तेव्हा तो कशी, कोणती आणि किती माहिती देईल हे सांगता येत नाही. 1980 च्या दशकातील नौदल अधिकारी ते 2022 मधील नागपूरच्या ब्रह्मोस प्रकल्पातील एका शास्त्रज्ञासह अंदाजे 200 हून अधिक संरक्षण खात्यातील सैनिकी व नागरी अधिकार्‍यांना गोपनीय माहिती लीक केल्याच्या प्रकरणावरून अटक झाली आहे. यातील अंदाजे 80 टक्के लोकांवर योग्य ती कारवाई झाली आहे.

संरक्षण विभागाने आणि लष्कराने वाढत्या हनी ट्रॅपला लगाम घालण्यासाठी एक काऊंटर स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. काही पत्रके आणि बुकलेटही विकसित केली आहेत. तसेच हनी ट्रॅप ओळखता यावेत यासाठी काही अल्गोरिदम मॉडेल्सही बनवण्यात आले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एखादी व्यक्ती काही संशयास्पद वर्तणूक करताना दिसल्यास हे अल्गोरिदम मॉडेल वापरून त्या महिलेच्या किंवा व्यक्तच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांचे नेमके काय सुरू आहे याचा शोध घेतला जातो. हा एक सायबरयुद्धाचा प्रकार आहे. जगभरातील सर्वच देश असे प्रकार करत असतात.

हनी ट्रॅपमधून लीक केली जाणारी गोपनीय माहिती फोन, सिक्रेट लँग्वेज, एजंटद्वारे, कोड स्वरूपात दिलेली असू शकते. यासाठी सोशल मीडियाचा वापर अचूकपणे केला जातो. कुरुलकरांच्या सोशल मीडिया खात्यांमधील अशाच काही नोटस् एटीएसच्या हाती लागल्या आहेत. तसेच पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अन्य काही देशांशी झालेले त्यांचे कॉल्सही ट्रेस झालेले आहेत. त्या सर्वांतून नेमके काय समोर येते हे पाहावे लागेल.

एखादी व्यक्ती सातत्याने पॉर्न साईटस्ना भेट देत असेल किंवा पॉर्न व्हिडिओ पाहात असेल तर ती व्यक्ती कोण आहे, कुठे काम करत आहे याचा शोध नव्या अल्गोरिदम मॉडेलद्वारे घेता येतो. एकदा हा शोध लागला की त्याला जाळ्यात ओढण्यासाठी महिलेचा वापर केला जातो. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करून, समक्ष भेटून पद्धतशीरपणे त्या व्यक्तीशी ‘संबंध’ प्रस्थापित करते आणि आपले ईप्सित साध्य करते.

हनी ट्रॅपबाबत शंका आली तरी ते प्रत्यक्षात उघड करून कायद्याच्या चौकटीतून त्याला पूर्ण पुराव्यांवर आधारित केस बनवणे हे कठीण काम असते. यासाठी संशय आल्यानंतर त्या व्यक्तीवर सातत्याने निगराणी ठेवली जाते. तो कोणाशी बोलतो आहे, काय बोलतो आहे यावर लक्ष ठेवले जाते. यासाठी कॉल्स तपासले जातात. त्या सर्वांतून एक चित्र उभे करून ही केस तयार केली जाते.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही वेळा याबाबत गफलत होण्याचीही शक्यता असते. डीआरडीओमध्ये के. व्ही. उन्नीकृष्णन नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांच्यावर हनी ट्रॅपचा आरोप करण्यात आले होता आणि 10 वर्षे तुरुंगात धाडण्यात आले होते. परंतु नंतर डीआरडीओमधील त्याच्या सहकार्‍यांकडून हे कुभांड रचल्याचे समोर आले होते. प्रदीप कुरुलकरांबाबत एटीएसने असा दावा केला आहे की, त्यांनी गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली आहे. हा प्रकार 13 डिसेंबर 2022 ते 24 फेब्रुवारी 2023 यादरम्यान घडल्याचे म्हटले आहे. याबाबतची माहिती डीआरडीओला मिळाल्यानंतर त्यांनी एका वरिष्ठ अधिकार्‍याची नियुक्ती केली आणि कुरुलकर वापरत असलेले 2 मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क जप्त करण्यात आली. डीआरडीओच्या संचालक पदावर असताना ते पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हसोबत सतत संपर्कात होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. कुरुलकर वापरत असलेल्या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून हे प्रकरण डीआरडीओच्या अंतर्गत स्टँडिंग कमिटीकडे सोपवण्यात आले.

साठ वर्षांचे कुुरुलकर नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार होते. त्यांची एकूण कारकीर्द पाहिल्यास 38 वर्षांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांसोबत काम केलेले आहे. ‘डीआरडीओ’च्या प्रमुख क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपक आणि ग्राऊंड सिस्टीम्सच्या निर्मितीत त्यांची अत्यंत मोलाची भूमिका होती. ‘मिशन शक्ती’ या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपकाची निर्मिती त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. ‘आऊटस्टँडिंग सायंटिस्ट’ या श्रेणीमधील शास्त्रज्ञ ते आहेत. अशी व्यक्त हनी ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. हे व्हायला नको होते. कुरुलकरांवरील आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत किंवा त्यांनीही अद्याप कबुली दिलेली नाहीये. पण एटीएसकडे भक्कम आणि सबळ पुरावे असल्याचे सांगितले जात आहे.

आयपीसीच्या कलम 120 बी नुसार गुन्हेगारी कट रचणे, कलम 328 नुसार अमली पदार्थांचे सेवन करून माहिती देणे, कलम 448 नुसार आपल्याशी संबंध नसणार्‍या गोष्टींमध्ये लक्ष घालणे, कलम 395 नुसार माहितीची चोरी करणे आणि कलम 420 नुसार फसवणूक करणे या आरोपांखाली, जबर दंडासहित 15 ते 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. तसेच दंडात्मक कारवाई किंवा निलंबन केले जाऊ शकते. कुरुलकरांभोवती फास आवळतानाच त्यांच्या सहकार्‍यांवरही पाळत ठेवली जाईल. त्यांच्या नातेवाईकांवरही नजर ठेवली जाईल. या सर्वांमध्ये काही वेळा निष्पाप नागरीकही फसण्याची शक्यता असते. पण आजवर अशा प्रकरणातील 80 टक्के प्रकरणात आरोप सिद्ध झालेले आहेत. कुरुलकरांबाबत काय होते हे पाहावे लागेल.

जाता जाता इतक्या उच्च पदावर पोहोचलेली, समाजाकडून मान-सन्मान मिळालेली व्यक्ती अशा प्रकारे हनी ट्रॅपमध्ये कशी अडकते या सर्वांना पडणार्‍या प्रश्नाविषयीही बोलले पाहिजे, विचार झाला पाहिजे. मानसशास्त्रीयद़ृष्ट्या याकडे पाहताना असे लक्षात येते की, जेव्हा आयुष्यात तुम्हाला सगळे काही मिळते तेव्हा नवे काही तरी हवे असते. बरेचदा ती शारीरिक भूक असते, तशीच मानसिकही असते. या टप्प्यावर स्वतःची प्रशंसा करणार्‍या व्यक्ती अधिक आवडू लागतात. काही वेळा पैशाचा हव्यासही असतो. या तिन्हींची आसक्ती हनी ट्रॅपमध्ये अडकण्यास कारणीभूत ठरते. अर्थात कारणे काहीही असली तरी राष्ट्रीय सुरक्षेविषयीची माहिती शत्रूला देणे हा अक्षम्य गुन्हा आहे, हे नाकारता येणार नाही.

कर्नल अभय पटवर्धन
(निवृत्त) 

Back to top button