क्रीडा : लंबी रेस का घोडा | पुढारी

क्रीडा : लंबी रेस का घोडा

कधी काळी मुंबईतील आझाद मैदानाबाहेर पाणीपुरीही विकावी लागलेल्या यशस्वी जैस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे सिद्ध केले आहे. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ 21 व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय संघाचा खेळाडू होईल यात शंकाच नाही.

जिद्दीला अफाट मेहनतीची जोड दिली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, याचा अस्सल पुरावा म्हणजे युवा क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल. तो मूळचा उत्तर प्रदेशचा. सुरिया हे त्याच्या गावाचे नाव. तेथील एका छोट्या दुकानदाराचा तो मुलगा. क्रिकेटच्या वेडापायी त्याने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी स्वप्ननगरी मुंबई गाठली. तिथे अफाट संघर्ष केला. अनेक अडथळे पार केले. आज तो यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला आहे. त्यावेळी मुंबईत यशस्वीला राहायला घरही नव्हते. मग त्याने मुंबईतील आझाद मैदानालाच आपले घर बनवले. खरे तर मोकळे आकाश हेच त्याच्या घराचे छत होते. असे असले तरी क्रिकेटची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

कारण त्याने पाहिलेले स्वप्न नेहमीच्या चाकोरीतले नव्हते. त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागणार होते. त्याला त्याची कधीच ना नव्हती. दरम्यानच्या काळात हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावर मुस्लिम युनायटेडच्या तंबूत झोपू लागला. त्या काळात त्याने पोटापाण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरीही विकली. दिवसभर क्रिकेट खेळायचे आणि त्यानंतर पाणीपुरी विकायची, हा त्याचा दिनक्रम होता. बर्‍याचदा मैदानात सामना पाहणारी माणसे त्याला ओळखायची आणि हे काय करतोस, असेही विचारायची. त्यावेळी पोटासाठी करावे लागते साहेब… असे तो न लाजता सांगायचा.

क्रिकेट खेळायला मिळावे हा त्याचा एकमेव ध्यास होता. त्यासाठी त्याने कुठलेच काम कमी दर्जाचेमानले नाही. पाणीपुरी विकतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तथापि पाणीपुरीपेक्षाही त्याला क्रिकेटचे मैदान गाजवण्याच्या ईर्ष्येने पछाडले होते. संधी मिळेल तेव्हा मनमुराद क्रिकेट खेळताना त्याच्यातील क्रिकेटपटू जागा होऊ लागला.

गोलंदाजाच्या हातातील चेंडूच्या चिंधड्या उडवायच्या हाच त्याचा खाक्या. त्यामुळे आक्रमक फलंदाजीसाठी तो हळूहळू ओळखला जाऊ लागला. 2015 साली त्याने गाईल्स ढाल स्पर्धेत शालेय पातळीवर 319 धावांची तुफानी खेळी केल्यानंतर तो सर्वात पहिल्यांदा प्रकाशात आला. ही केवळ सुरुवात होती. त्याच्या या अविरत संघर्षात त्याला प्रशिक्षक ज्वाला सिंह यांची मिळालेली साथ मोलाची आहे. त्यांनी या कच्च्या हिर्‍यावर पैलू पाडले आणि मग हा कोहिनूर मैदान गाजवू लागला. पाठोपाठ ज्वाला सिंह यांनी त्याला हक्काचा आसराही मिळवून दिला. सिंह यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनाच्या बळावर त्याने मुंबईतील आंतरशालेय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. रिझवी हायस्कूलचे नाव वलयांकित करतानाच त्याने टीम इंडियाच्या अंडर 19 संघातही स्थान पटकावले. त्यामुळे त्याच्यासाठी मुंबईच्या रणजी संघाचे दरवाजे सताड उघडे होणे ओघाने आलेच.

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध उपांत्य लढतीत यशस्वीने ठोकलेले घणाघाती शतक रसिकांच्या मनावर कोरले गेलेे. त्या संपूर्ण स्पर्धेत त्याने आपल्या दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करून जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले. आता स्वप्नपूर्तीचा प्रत्येक टप्पा तो सर करत चालला होता. आयपीएल तर त्याच्यासाठी पर्वणीच ठरली. राजस्थान संघाने आपल्या ताफ्यात घेतले. त्यासाठी तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजली. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संयम याच्या जोरावर त्याचा वारू चौफेर उधळत चालला आहे. येथे हेही सांगितले पाहिजे की, पायजामा क्रिकेट म्हणून आयपीएलबद्दल कितीही नाक मुरडले तरी गरीब घरातील अनेक गुणवंतांना या स्पर्धेने सर्वार्थाने समृद्ध केले आहे. शिवाय याच स्पर्धेने भारतालासुद्धा किती तरी नामवंत खेळाडू दिले आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली शतकी खेळी अविस्मरणीय ठरली. अवघ्या 62 चेंडूंत त्याने 124 धावांचा पाऊस पाडला. 16 खणखणीत चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांनी सजलेल्या या खेळीने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

तो सांगतो की, आव्हानांची काटेरी वाट पार करून या टप्प्यावर आल्यानंतर माझे डोळे केव्हा पाणावले हे मलाच कळले नाही. वयाच्या अकराव्या वर्षी मी आझाद मैदानाजवळ राहात होतो. तिथून प्रकाशाची एक तिरीप यायची तेव्हा वाटायचे की, एक दिवस आपल्यालासुद्धा स्टेडियमच्या आत जायची संधी कधीतरी मिळेल. प्रेक्षकांच्या आरोळ्यांचा आवाज मला रोमांचित करत असे. आता मी आणखी गंभीरपणे भविष्याचा विचार करत आहे. स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्याला माझा नेहमीच अग्रक्रम असतो.

प्रत्येक सामन्यातील दिनक्रमात मी शक्य तितकी शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. शतक ठोकताच अंगाखांद्यांवर मिरवणारे एखाद्याच अपयशानंतर आपल्या पारावरही जागा देत नाहीत हे मी मनावर पक्के कोरून ठेवले आहे.

यशस्वीमध्ये सतत शिकत राहण्याची वृत्ती ठासून भरली आहे. आयपीएलमध्ये तो खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघासाठीच नव्हे, तर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लंबी रेस का घोडा आहे, अशा शब्दांत राजस्थान संघाचे क्रिकेट संचालक आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. पाठोपाठ भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने तर यशस्वी हा नजीकच्या काळात भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू असेल, असे भाकीत केले आहे. मैदानात तो उतरतोच एखाद्या बादशहासारखा. आलेला चेंडू फटकवायचा या हेतूने नव्हे, तर विचार करून तो फटके हाणतो. आतापर्यंत केलेली सर्व मेहनत त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्यक्षात उतरवली आहे, असे उथप्पाचे मत आहे.

या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचे सिद्ध केले आहे. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे. मुख्य म्हणजे कोणाचीही नक्कल करायच्या फंदात यशस्वी कधीच पडला नाही. हेच त्याच्या यशाचे रहस्य असावे. महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आजदेखील जागतिक क्रिकेटमध्ये विस्मयकारक मानला जातो. यशस्वीने तसा फटका मारण्याचा मोह टाळला आहे. तरीसुद्धा आजच्या घडीला तो सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. गोलंदाजाच्या हातून सुटलेल्या चेंडूवर तो घारीसारखी नजर ठेवून असतो. त्यामुळे अन्य फलंदाजांच्या तुलनेत त्याला चेंडूचा अंदाज काकणभर आधीच येतो.

सध्या तो अवघ्या 21 वर्षांचा असला तरी त्याच्या फलंदाजीत कुठेतरी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिवियन रिचर्डस् यांचा बेडरपणा दिसून येतो. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूला थेट सीमारेषा दाखवणे हे आपल्या फलंदाजीचे तंत्र त्याने वर्षानुवर्षे घोटवले आहे. अगदी कमी वयात तो झपाट्याने परिपक्व होत चाललाय. यातील कौतुकाची आणि आवर्जून दखल घ्यावी अशी बाब म्हणजे यशाच्या पायर्‍या वेगाने सर करत चालला असला तरी त्याने आपले पाय घट्टपणे जमिनीवरच ठेवले आहेत. यशाने हुरळून जायचे नाही आणि टीकेमुळे व्यथित व्हायचे नाही. महत्त्वाच्या गोष्टी त्याने स्वतःच्या मेंदूवर कोरून ठेवल्या आहेत. त्याच्या अफलातून फलंदाजीच्या सामर्थ्याची भुरळ रोहित शर्मासारख्या धडाकेबाज खेळाडूलाही पडली यातच सर्व काही आले. आज यशस्वी एक-एक शिखर सर करत चालला आहे. त्याचा आवाका लक्षात घेतला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय संघाचा सदस्य होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

यशस्वीने 2020 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, पदार्पणात त्याला फारशी चमक दाखविता आली नाही. तीन सामन्यांत 34 धावा ही कामगिरी लक्षवेधी नव्हती. मात्र, नंतरच्या प्रत्येक हंगामात त्याची फलंदाजी बहरत गेली. आयपीएलमध्ये 32 सामन्यांत 145 च्या स्ट्राईक रेटने त्याने 975 धावा कुटल्या आहेत. यात सहा अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. 40 षटकार आणि 118 चौकार हे त्याचे दे दणादण फटके होत. रणजीमध्ये यशस्वी मुंबई संघाकडून खेळला आहे. खेरीज तो टीम इंडियाच्या ब संघाचा सदस्य आहे. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 15 सामन्यांतील 26 डावांत तब्बल 80 च्या सरासरीने 1845 धावा फटकावल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 32 डावांत त्याच्या नावापुढे 1511 धावा लागल्या आहेत. हे कमी म्हणून की काय, लेगब्रेक गोलंदाजी करून सात बळीही त्याने पटकावले आहेत. आजघडीला त्याच्या नावावर 14 शतके आणि 9 अर्धशतके लागली आहेत.

सुनील डोळे

Back to top button