साहित्‍य : मराठीपणाला वेदना देणारे वास्तव | पुढारी

साहित्‍य : मराठीपणाला वेदना देणारे वास्तव

रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिक : गल्लीतील गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा अनेक क्षेत्रातील मंडळी करताना दिसतात. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठीपणाला वेदना देणारे, दुःख देणारे असे आजचे वास्तव आहे.

आपण मराठी लोक सध्याच्या काळात फार उत्सवी झालो आहोत. साहित्य संमेलनात साहित्यापेक्षा त्याच्या निमित्ताने जो उत्सव करायचा असतो, तो वाढत चालेला आहे आणि तो अतोनात वाढला आहे. जवळजवळ तो बटबटीत होत आलेला आहे. आणि हे सगळ्याच क्षेत्रांत आहे. मला रस असलेला एक परवाचा एक इव्हेंट म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा. मी ती बारकाईने आणि जवळून पाहिली, कारण मला खेळाच्या क्षेत्रामध्ये रस आहे. कुस्तीगीर वगैरे तिथे दुय्यमच होते. जे संयोजक असतील, कोण मंत्री असतील, परिषदेचे अध्यक्ष असतील ते त्या ठिकाणी प्रमुख होते असे एकूण माध्यमांचे वर्तन होते. साधनं ज्याच्या हातात आहेत, ते वेगळे लोक आहेत, त्यांना जे पाहिजे असते ते माध्यमे करतात. जी अत्यंत शक्तिमान अशी तरुण खेड्यातील मुलं त्यांनी किमान वर्षभर कष्ट केले आहेत. अतिशय अव्वल दर्जाची कुस्ती तिथे झाली. पण तिला महत्त्वच नव्हतं, त्या ठिकाणी. एकुणामध्ये जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात हे असे झालेले आहे; तर त्याच्यापासून दूर राहणं मी पसंत करतो.

लिहिणार्‍यांनी फार बोलू नये. फक्त लिहावं, झालाच काही उपयोग तर ठीक आहे. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात वावरणार्‍या लोकांच्या हातामध्ये निदान ज्यांना काही जी संवेदनाक्षम अशी माणसं आहेत, त्याच्यापैकीच लिहिणारे असतात. एखादा चांगला वक्ता असेल तर तो भाषण करून बोलून मोठ्या समूहाशी संवाद साधून तो आपलं मत व्यक्त करतो. लिहिणारा एका अर्थाने या प्रकारची विधानं शोधत असतो. मी आयुष्यभर एक प्रकारे जीवनाविषयी विधान शोधण्याचा प्रयत्न केला.

राजकारण हे स्वाभाविक आहे, त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. पण एक बटबटीतपणा आला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट ही नवीच गोष्ट आपल्याकडे आलेली आहे आणि ती फार प्रचंड वाढलेली आहे. याचं एक बटबटीत चित्र मला अनुभवायला आलं. हे मला प्रांजळपणाने वाटते. मला व्यक्तिशः कुणावर टीका करायची नाही. आपण सगळेच त्याला जबाबदार आहोत.

कोबाड गांधी यांचं पुस्तक मी वाचलेलं आहे. त्याच्यात कुठल्याही पद्धतीने नक्षलवादाचा प्रचार असे काही नाही. तो माणूस डाव्या चळवळीशी संबंधित होता, त्यांनी सामान्य माणसांत काम केलेले आहे. अत्यंत सधन घरात जन्मून, सगळ्या प्रकारचे रोग अंगात मुरवत तो जगलेला आहे. अत्यंत प्रांजळ असे हे आत्मकथन आहे. प्राप्त परिस्थितीत इतक्या गोष्टी होतात, त्याचा तो भाग आहे, असे मी मानतो. याच्यात मी शासनापेक्षाही आपण वाचक, आपण नागरिक यांच्यामध्ये त्या संबंधाने काही प्रतिक्रिया आहेत? तर त्या अत्यंत वरवरच्या आहेत. शेवटी आदर्श लोकाशाहीत नागरिक हा सर्वोच्च स्थानी असतो. तो ज्या वेळी काही मांडतो, व्यक्त करतो, त्याला महत्त्व कोणतीही शासकीय व्यवस्था कधी देईल, तर तिच्यात तेवढी ताकद असली पाहिजे.

तिची जी क्षमता आहे, तिचा आदर करण्याच्या स्थितीत शासनाला आणणं हे आपलं काम आहे. हे आपण करत नाही. आपणही फार वरवरची प्रतिक्रिया देतो. राजीनामे दिली ती चांगली प्रतिक्रिया आहे. पण तिचा काही परिणाम आपल्याला दिसतो का? तर दिसत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या संस्कृतीमध्येच लेखक, विचारवंत, तत्त्वज्ञानी यांच्याविषयी तितका आदरयुक्त धाक तो उरलेला नाही. फ्रेंच किंवा रशियन या भाषांमध्ये, भाषिक संस्कृतीमध्ये राजकर्त्यांमध्ये या प्रकारचा धाक असायचा. अनेकदा रशियात स्टॅलिन हा लेखकांनी काय लिहिले आहे, हे तो हस्तलिखित वाचून पाहायचा आणि मग छापायला परवागनी द्यायचा. असले काही आपल्याकडे नाही.

मी अभिजात भाषा समितीचा अध्यक्ष होतो. माझ्या समितीला जे काम दिले होते, ते दोन वर्षं काम करून योग्य तो प्रस्ताव बनवला. आपल्या ज्ञानी पूर्वजांनी मुळामध्ये यात भरपूर काम केले होते. त्यांना काही कुणाकडे अभिजात दर्जा मागायचा नव्हता. पण त्यांनी म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर असतील, राजारामशास्त्री भागवत असतील, व्ही. बी. कोलते असतील… या लोकांनी इतके काम करून ठेवले आहे की, ते उचलून एकत्र करणे आणि ते वापरून अहवाल तयार करणे एवढेच काम आम्ही केले. महाराष्ट्र सरकारने ते केंद्र सरकारला सादर केले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय साहित्य अकादमी आहे, तिच्याकडे मागणीचे मूल्यमापन करण्यासाठी पाठवले. त्यावर देशभरातील विद्वानांची समिती नेमण्यात आली. या समितीनेही मान्यता दिली.

आता ते केंद्र सरकारकडे गेले. केंद्र सरकारने औपचारिक निर्णय घेणे बाकी आहे, तिथे तो अडवला आहे. याच्यासाठी आता राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. केंद्रातील आणि राज्यातील प्रतिनिधींनी जोर लावणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा मिळाला आहे, त्यांच्याशी तुलना करता फारच सशक्त असा दावा असलेली मराठी भाषा आहे. प्राचीनता असू दे, मौलिकता असू दे किंवा उत्तम दर्जाच्या लेखनाची परंपरा असू दे, ते सगळं आपल्या भाषेत आहे. दुर्दैवाने शक्तिशाली पाठपुरावा आपल्याकडून होऊन केंद्र सरकारला या प्रकारे निर्णय घ्यायला भाग पाडावे अशी परिस्थिती अजूनही तयार झालेली दिसत नाही. दहा वर्षं होत आली तरी ते बाजूला पडलेले आहे. नागरिक म्हणून मी फक्त खंत व्यक्त करू शकतो.

माझी ताम्रपट राजकीय कादंबरी आहे. 1940 ते 80च्या दशकापर्यंतचा कालखंडत्यात घेतला आहे. ताम्रपटचा शेवट ही सुरुवात घेऊन आजपर्यंत जर कुणी लिहिले तर फार नवं काही नक्की निर्माण करता येईल. मला आवडेल ते करायला, मी कदाचित करेनही. पण माझ्यापेक्षा त्याच्यानंतर जन्मलेला जर एखादा लेखक असेल, ज्याने या प्रकारचं पाहिलेले अनुभवलेले असेल तर तो जास्ती ताकदीने हे करू शकेल असे मला वाटते. त्यांनी ते केले पाहिजे किंवा आपली सामाजिक गरज तशी असेल तर ते केले जाईल. पण मी प्रयत्न करेनच. मी वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो आहे. मला असे वाटते, कदाचित करेन. पण खात्रीने सांगता येत नाही. कादंबरीच्या बाबतीत कधीही खात्री देता येत नाही की ही होईल. कारण डोक्यात अनेक गोष्टी असतात, काही तरी निर्माण होते. ते एखाद्या हिमनगासारखं असते.

महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेते असतील, एस. एम. जोशींसारखे नेते असतील, ही महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत आहेत. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. गल्लीतील गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा अनेक क्षेत्रातील मंडळी करताना दिसतात. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठीपणाला वेदना देणारे, दुःख देणारे असे आजचे वास्तव आहे.
( शब्दांकन : दिलिप शिंदे, अनुपमा गुंडे )

Back to top button