‘कॅन्सर’भान : आपले आणि अमेरिकेचे | पुढारी

‘कॅन्सर’भान : आपले आणि अमेरिकेचे

अमेरिकन कॅन्सर सोसायटीने 1991 पासून कर्करोगाच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार अमेरिकेतील कर्करोग रुग्णांच्या मृत्यूमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे 3.8 दशलक्ष कॅन्सर रुग्णांचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात त्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी आली आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या सापळ्यात अडकलेल्या भारतीय प्रसारमाध्यमांच्या गदारोळात या बातमीकडे आपले दुर्लक्ष झाले. ही बातमी म्हणजे सन 1991 पासून पहिल्यांदाच अमेरिकेतील कर्करोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 33 टक्क्यांनी कमी झाले आहे. हे फक्त अलीकडील काही वर्षांमध्ये घडले नसून गेल्या तीन दशकात कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने 12 जानेवारीला आपला अहवाल जगप्रसिद्ध ‘कॅन्सर जर्नल फॉर क्लीनिसिअन’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध केला. या अहवालानुसार गेल्या तीन दशकात अमेरिकेत 38 लाख कॅन्सर रुग्णांचा जीव वाचवता आला आहे किंवा त्यांचा पाच वर्षांचा मृत्यू दर कमी करता आला आहे. खरे तर जगातील अनेक देशातील प्रसारमाध्यांनी याची दखल घेतली असून अनेक देशांच्या सरकारी यंत्रणाही याची दखल घेताना दिसून येत आहेत.

नक्की काय आहे अहवालामध्ये?

अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सन 1991 पासून अमेरिकन कर्करोगाच्या माहितीचा अभ्यास करून तो प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली आहे, तर याच अहवालानुसार अंदाजे 3.8 दशलक्ष (38 लाख) कॅन्सर रुग्णांचे जीव वाचवले आहेत. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालात या कमी झालेल्या कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूचे श्रेय हे लवकरात लवकर कॅन्सर ओळखणे, धूम्रपानाचे प्रमाण कमी करणे आणि कॅन्सर उपचारातील सुधारणा यांना देण्यात आले आहे. याचबरोबर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर ज्या विषाणूमुळे होतो, तो म्हणजे मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) आणि या विषाणूंवर संशोधकांनी शोधलेल्या लसीलासुद्धा तेवढेच श्रेय देण्यात आले आहे.

2012 ते 2019 या काळात गर्भाशयाच्या कॅन्सरच्या दरात 65 टक्के घट झाली होती. याचबरोबर मानवी पॅपिलोमाव्हायरसमुळे इतर कॅन्सरसुद्धा होतात, ज्यामध्ये डोके आणि मानेचा कॅन्सर असो किंवा गुदद्वाराचा कॅन्सर – त्यामुळे डॉक्टरांना आणि संशोधकांना आशावाद आहे की, या लसीचे महत्त्व फक्त स्त्रियांच्याच कॅन्सरला नाही; तर पुरुषांच्या सुद्धा कॅन्सरसाठी महत्त्व असेल. आश्चर्य म्हणजे 20 ते 24 वयोगटातील स्त्रिया ज्यांना या वयोमर्यादेत मानवी पॅपिलोमाव्हायरस लस सर्वप्रथम मिळाली होती याच स्त्रियांच्यामध्ये 2012 ते 2019 पर्यंत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये 65 टक्क्यांची घट झाली होती.

अहवालानुसार, कोणत्याही आक्रमक कॅन्सरचे निदान होण्याची आजीवन संभाव्यता पुरुषांसाठी 40.9 टक्के आणि महिलांसाठी 39.1 टक्के असण्याचा अंदाज आहे. अहवालात 2023 साठी देखील अंदाज वर्तवला आहे. यावर्षी अंदाजे अंदाजे 2 दशलक्ष (20 लाख) नवीन कॅन्सरची प्रकरणे दिसून येतील म्हणजेच दवसाला सुमारे 5,000 कॅन्सरचे रुग्ण. तसेच यावर्षी एकट्या अमेरिकेत 600,000 पेक्षा जास्त कॅन्सर रुग्णांचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्याचबरोबर अहवालात 2014 ते 2019 या कालावधीत दरवर्षी प्रोस्टेट (मूत्राशयाच्या) कॅन्सरच्या घटनांत 3 टक्के वाढ दिसून आली.

विशेषत: उशिरा रोगनिदान यामुळे सुमारे 99,000 नवीन प्रकरणे आढळून आली आणि चिंताजनक म्हणजे गेल्या जवळजवळ 2 दशकांतील ही पहिली वाढ आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर उपचार करणे अधिक कठीण आहे आणि बर्‍याचदा असाध्य आहे. याचबरोबर हा अहवाल अजून एका विषमतेवर भाष्य करतो तो म्हणजे अश्वेतवर्णीय पुरुषांमध्ये गोर्‍या पुरुषांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरच्या घटनांमध्ये 70 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि अमेरिकेतील इतर कोणत्याही वांशिक किंवा वांशिक गटाशी संबंधित असलेल्या प्रोस्टेट कर्करोगाच्या मृत्यूमध्ये दुप्पट ते चौपट वाढ आहे.

कॅन्सर जनजागृतीचे महत्त्व

अहवालात अजून एक महत्त्वपूर्ण नोंद केली गेली आहे ती म्हणजे अमेरिकन कॅन्सर मृत्यूदर विसाव्या शतकाच्या सर्वच दशकांमध्ये वाढला आहे. मुख्यत्वे धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर धूम्रपानाचे प्रमाण कमी झाल्याने आणि काही कर्करोगांचे लवकर निदान होऊन उपचारांमध्येही सुधारणा झाल्यामुळे 1991 मध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण त्याच्या शिखरावरून कमी झाले. याच दशकामध्ये कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूचा वेग हळूहळू कमी झाला आहे. नवीन अहवालात असे आढळून आले की, सर्व कर्करोगांसाठी एकत्रितपणे पाच वर्षांचा सापेक्ष जगण्याचा दर 1970 च्या दशकाच्या मध्यभागी निदानासाठी 49 टक्क्यांवरून 2012-18 मध्ये निदानासाठी 68 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

अहवालानुसार, ज्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये आता जगण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे ते म्हणजे थायरॉईड 98 टक्के, प्रोस्टेट 97 टक्के, टेस्टिस 95 टक्के आणि मेलेनोमा 94 टक्के. तर स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी सध्याचा जगण्याचा दर सर्वात कमी 12 टक्के आहे. हा दर वाढण्यामागे धूम्रपान आणि अल्कोहोल याबद्दलची जनजागृती कामी आली आहे. जनजागृतीने अमेरिकन लोकांचे धूम्रपान आणि दारूसेवन कमी करण्यात यश येताना दिसत आहे. याचबरोबर धूम्रपान हे फुफ्फुस, लिव्हर, नाक आणि तोंड यांच्या कॅन्सरला कारणीभूत आहे हे अमेरिकन नागरिकांना समजून येताना दिसून येत आहे.

भारताची परिस्थिती काय आहे?

भारतात युरोप-अमेरिकेसारखी कॅन्सरची केंद्रीय संस्था नियमितपणे आपले अहवाल जाहीर करत नसल्यामुळे आपणाला योग्य ती माहिती मिळू शकत नाही. पण नागपूरस्थित एका शासकीय संस्थेच्या अहवालानुसार भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा कॅन्सर रुग्णांचा देश झाला असून अमेरिका आणि चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो आहे. सन 2022 मध्ये भारतात 14 लाख रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये 2025 पर्यंत अजून वार्षिक एक लाखाची वाढ होऊन साधारणपणे 15 लाख रुग्ण आढळून येतील. 2022 मध्ये भारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रमाणात कॅन्सर झाल्याचे आढळून आले. यामध्ये सुमारे 7 लाख 50 हजार स्त्रियांचा समावेश होता तर कमी अधिक प्रमाणात 7 लाख पुरुषांना कॅन्सर आढळून आला.

सध्या भारतात दर 1 लाख लोकांमागे 100 लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. यामध्ये वाढ होत जाऊन सन 2040 पर्यंत वार्षिक 20 ते 25 लाख लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण दिसून येईल; तर काही निमशासकीय संस्थांच्या अंदाजानुसार 2022 मध्ये भारतातील कर्करोगाच्या घटनांची नोंद 19 ते 20 लाख असेल, तर वास्तविक घटना नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 1.5 ते 3 पट जास्त आहेत. म्हणजेच आजच्या दिवशी भारतमाध्ये अंदाजे 50 लाख कॅन्सरचे रुग्ण असू शकतात.

भारतामध्ये कॅन्सर रुग्णांच्या वाढीचा दर हा मुख्यतः जागरूकतेचा अभाव आणि कॅन्सर स्क्रीनिंग कार्यक्रमांच्या कमी उपस्थितीशी निगडित आहे. तसेच उशिरा टप्प्यामध्ये आढळून येण्यामुळे उच्च रोगाच्या ओझ्याचासुद्धा प्रश्न वाढला आहे. भारतात कॅन्सर दुसर्‍या किंवा तिसर्‍या टप्प्यात शोधण्याचे प्रमाण 29 टक्के इतके कमी आहे. फक्त 15 टक्के आणि 33 टक्के स्तनाच्या फुफ्फुसाचे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान अनुक्रमे 1 आणि 2 टप्प्यात होते, जे चीन, यूके आणि यूएसपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे.

विकसित आणि विकसनशील देशांमधील विरोधाभास

कॅन्सर रुग्णांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करायचा झाल्यास विकसित देशांनी यामध्ये खूपच आघाडी घेतली आहे. अमेरिकेत सुमारे सहा दशकांपासून कॅन्सर प्रतिबंध कार्यक्रम केला जात आहे. त्याचजोडीला अमेरिकेत कॅन्सरवर संशोधन करणार्‍या शेकडो संस्था असून जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये कॅन्सर संशोधन चालते. अमेरिकेत कॅन्सरच्या संशोधनासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जातो.

युरोपियन देशांनी यामध्ये आघाडी घेतली असून युरोपमधील सध्याचे कॅन्सरचे प्रमाण निम्म्याने कमी करण्यासाठी योजना कार्यन्वित केली असून यामध्ये संशोधक, डॉक्टर आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. युरोपमध्ये दरवर्षी कमीत कमी 10 ते 15 हजार कोटी निधी हा फक्त कॅन्सरच्या संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जातो. इतर विकसित देशांमध्ये जपान, चीन, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांनीसुद्धा कॅन्सरवर संशोधन आणि उपाययोजना यासाठी भरीव कार्यक्रम सुरू केले आहेत.

विकसनशील देश यामध्ये खूपच मागे असून त्यामध्ये आफ्रिकन आणि आशियन देशांची कामगिरी खूपच खराब आहे. भारतात सध्या केंद्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात कॅन्सर प्रतिबंध कार्यक्रम आखण्याची गरज दिसून येत आहे. त्याचजोडीला भारतामध्ये कॅन्सरवरील संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोव्हिडनंतर जगातील अनेक विकसित देशात कॅन्सरवरील लसींच्या संशोधनाला वेग आला असून त्यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसेच अमेरिका-युरोपमधून पुढील काही वर्षात कॅन्सर लसी रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. भारत कॅन्सर लसीच्या संशोधनात खूपच मागे आहे. पुढील काही वर्षांमध्ये यामध्ये काही बदल घडून येताना न दिसल्यास आपणास विकसित देशांनी संशोधित केलेल्या लसी विकत घेण्याची वेळ येईल.
(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

डॉ. नानासाहेब थोरात
ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन 

Back to top button