’जोशीमठ’चा इशारा | पुढारी

’जोशीमठ’चा इशारा

रंगनाथ कोकणे , (पर्यावरण अभ्यासक )

उत्तराखंडमधील जोशीमठ शहर खचत असल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. परिणामी जोशीमठाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अलीकडील काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. परंतु यामध्ये नेहमीच पर्यावरणाचे पारडे थिटे ठरते आणि विकास भाव खाऊन जातो. प्रत्येक वेळी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वेळ येईपर्यंत वाट पाहणे हा आपल्या व्यवस्थेचा स्वभाव बनला आहे.

प्रसिद्ध स्विस भूगर्भशास्त्रज्ञ अरनॉल्ड हीम आणि त्यांचे सहकारी आगस्टो गॅस्टर यांनी 1936 मध्ये हिमालयाच्या भूरचनेचा अभ्यास करण्यासाठी अभियान सुरू केले. त्यांनी अभ्यासाअंती 1938 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात चमोली गढवालच्या हेलंगपासून तपोवनपर्यंतचा भाग हा संवेदनशील असल्याचे सांगितले होते. या अहवालाचे महत्त्व भूगर्भशास्त्रज्ञांसाठी एखाद्या धर्मग्रंथापेक्षा कमी नाही. या अहवालाचा संदर्भ घेतच आतापर्यंत मध्य हिमालयाच्या भूगर्भ स्थितीवर अभ्यास करण्यात आला. पण आता सततच्या भूस्खलनामुळे किंवा जमीन खचण्याच्या घटनांमुळे जोशीमठ शहराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

जोशीमठ हे तपोवन आणि हेलंग यांदरम्यान वसलेले आहे. 1976 मध्ये मिश्रा समितीने जोशीमठच्या अस्तित्वावर अभ्यास करून तो भाग संवेदनशील असल्याचे जाहीर करत उपाययोजना सुचविल्या. यानंतरही जोशीमठ वाचविण्याचे प्रयत्न झाले नाहीत. उलट गेल्या काही वर्षांत या भागात सिमेंटचे जंगल वाढतच गेले. वाढत्या लोकसंख्येमुळे जोशीमठच्या परिसरात पाण्याचा उपसा अधिक झाला आहे. आज या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा दिसत आहेत. भारताच्या सर्वोच्च धार्मिक पीठांपैकी एक असलेल्या ज्योतिपीठच्या भितींला तडे गेले. भारत-चीन सीमेवरचे देशाचे शेवटचे शहर डोळ्यांदेखत खचताना दिसत आहे.

भूगर्भशास्त्रज्ञांनी यापूर्वीही जोशीमठ रिकामे करण्याचा इशारा दिला होता. जोशीमठ शहर आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असताना उत्तराखंडचे सरकार खडबडून जागे झाले. केंद्र सरकारनेही याबाबत उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सीमेवरचे गाव माणा यास देशातील पहिले गाव म्हणून जाहीर केले. या द़ृष्टीने जोशीमठ हे देशातील पहिले शहर मानले पाहिजे. हे काही सामान्य ठिकाण नाही. चार सर्वोच्च धार्मिक पीठांपैकी एक ज्योतिपीठ जोशीमठ येथे आहे. उत्तराखंडची प्राचीन राजधानी म्हणून जोशीमठकडे पाहिले जाते. येथे कत्युरी वंशाने सुरुवातीच्या काळात राज्यकारभार पाहिला. चार धामपैकी एक असणार्‍या बद्रीनाथ यात्रेची औपचारिकता जोशीमठ येथे पूर्ण होते. कारण शंकराचार्य यांची गादी याच शहरात आहे.

रंगबिरंगी फुलांचे खोरे आणि नंदादेवी बायोस्फीयर रिझर्व्ह बेस म्हणून या शहराकडे पाहिले जाते. हेमकुंडाच्या यात्रेवर जोशीमठातून देखरेख ठेवली जाते. नीती-माणा खिंड आणि बाडाहोती पठारावरून चिन्यांच्या कुरापतींवर या भागातून लक्ष ठेवण्यात येते. चीनकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होतात आणि सीमेवर अशांतता राहावी यासाठी आटापिटा करत राहतात, तेव्हा त्यावर लक्ष ठेवणारी आयटीबीपीची तुकडी आणि त्याचे माऊंटेन ट्रेनिंग सेंटर जोशीमठ येथे आहे. याच ठिकाणी गढवाल स्काऊटचे मुख्यालय आणि 9 माऊंटेन ब्रिगेडचे मुख्यालय आहे. यावरून या स्थानाची भौगोलिक आणि आध्यात्मिक तसेच सामरिक महती लक्षात येईल.

सध्या जोशीमठातील शेकडो घरे, रुग्णालय, सैनिक मुख्यालय, मंदिर, रस्ते यांच्यावर खचण्याची टांगती तलवार आहे. 20 ते 25 हजार लोकसंख्येचे शहर अनियंत्रित वाढ आणि अदूरदर्शीपणाच्या विकासाच्या भोवर्‍यात अडकलेले आहे. एकीकडे तपोवन विष्णूगाड प्रकल्पासाठी तयार केलेला एनटीपीसीच्या भुयारी मार्गाने जमिनीतला आतला भाग पोकळ झाला आहे; तर दुसरीकडे बायपास कामामुळे जोशीमठच्या मुळावर दिवसेंदिवस घाव घातले जात आहेत. चोहोबाजूंनी जोशीमठ अधांतरित होण्याच्या मार्गावर आहे.

भूगर्भशास्त्रांच्या मते, जोशीमठ हे प्रामुख्याने जुन्या भूस्खलनप्रवण भागावर वसलेले असून येथे पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नाही. जमिनीत मुरणार्‍या पाण्याबरोबरच माती वाहून जात असल्याने खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये धौलीगंगामध्ये आलेल्या महापुरामुळे अलकनंदाच्या किनार्‍यावरची जमीन खचली. त्यानंतर या समस्येने आणखीच उग्र रूप धारण केले.

जमीन खचणे अणि भूस्खलनाच्या कारणांचा अभ्यास करणार्‍या तसेच उपाय योजना आखण्याच्या दृष्टीने राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक आणि भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. पीयूष रौतेला यांच्या नेतृत्वाखाली जुलै 2022 मध्ये तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने देखील शहरातील सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा करणे, जोशीमठच्या पायथ्याशी असलेल्या अलकनंदामुळे भूगाग खचणार नाही, याची काळजी घेणे तसेच मोठे प्रकल्प थांबविण्याच्या शिफारशी केल्या. मात्र अहवालावर अद्याप बैठकांचे सत्र सुरू आहे. वास्तविक 1970 च्या अलकनंदाच्या पुरानंतर उत्तर प्रदेश सरकारने 1976 मध्ये गढवालचे तत्कालीन आयुक्त महेशचंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रज्ञांची समिती नेमली होती.

या समितीकडून जोशीमठच्या संवेदनशीलतेवर अभ्यास करण्यात आला. या समितीत सिंचन आणि बांधकाम विभागाचे इंजिनिअर, रुरकी इंजिनिअरिंग कॉलेज (आता आयआयटी) तसेच भूगर्भ विभागाच्या तज्ज्ञांबरोबर पर्यावरणवादी चंडीप्रसाद भट्ट यांना सामील केले होते. या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जोशीमठ हे स्वत:च एका भूस्खलनप्रवण भूभागावर आहे. त्यामुळे त्याच्या परिसरात मोठ्या प्रकल्पाची उभारणी हे अत्यंत जोखमीचे ठरू शकते.

या समितीने ओलसर भागाला धक्का न लावण्याची सूचना केली. यानुसार जोशीमठच्या वरच्या भागात भूस्खलन होणार नाही किंवा नदीला पूर येणार नाही. जोशीमठच्या वरच्या भागात असलेल्या औलीकडून पाच ओढे येतात. हे ओढे कालांतराने अक्राळविक्राळ रूप धारण करू शकतात आणि जोशीमठ येथे 2013 च्या केदारनाथसारखी परिस्थिती निर्माण करू शकतात.

जोशीमठसाठी मास्टर प्लॅन नसल्याने त्याचे संरक्षण करणार्‍या पर्वतरांगावर आणि जंगलावर सिमेंटचे जंगल उभे राहात आहेत. जंगलांची बेसुमार तोड केली जात आहे. हजारोंच्या संख्येने बांधण्यात येणार्‍या इमारतीचे ओझे तसेच 25 हजार नागरिकांच्या घरातून बाहेर पडणारे पाणी हे नाल्याचे रूप धारण करत आहेत. त्यामुळे जमिनीखाली एकप्रकारे दलदल निर्माण होत आहे. त्याचवेळी वरच्या भागात असलेले लष्कर आणि आयटीबीपीच्या छावण्यांचे सांडपाणीदेखील जमिनीखाली मुरत आहे.

धोक्याची सतत सूचना देऊनही आयटीबीपीने विशाल भवन उभारण्याबरोबरच सांडपाणी निचरा करण्याची व्यवस्था केली नाही. अनेक क्यूसेक अशुद्ध पाणी जोशीमठच्या पोटात जात आहे. हीच स्थिती ही लष्करी छावण्यांची देखील आहे. या सर्वांमुळे जोशीमठ आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे.

अलीकडील काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते; परंतु यामध्ये नेहमीच पर्यावरणाचे पारडे थिटे ठरते आणि विकास भाव खाऊन जातो. वाढती लोकसंख्या, तिची गरज आणि मानवाची एकंदरीतच वाढलेली भूक या सर्वांमुळे निसर्गाचे अपरिमित दोहन होत आहे. हे दोहन मान्य नसल्याचे निसर्ग वेळोवेळी रौद्र रूप घेऊन दाखवून देत असतो; पण त्यातून धडा घेण्याचे शहाणपणही आपण दाखवत नाही ही शोकांतिका आहे. प्रत्येक वेळी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वेळ येईपर्यंत वाट पाहणे हा आपल्या व्यवस्थेचा स्वभाव बनला आहे. जोशीमठाने ती वेळ येण्यापूर्वीची धोक्याची घंटा वाजवली आहे. तिचा निनाद फलदायी ठरतो का हे पाहायचे !

 

Back to top button