व्यक्तिमत्त्व : फॅशन उद्योगाचा आयकॉन! | पुढारी

व्यक्तिमत्त्व : फॅशन उद्योगाचा आयकॉन!

  • अक्षय शारदा शरद

‘फोर्ब्स’ने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केलीय. यात टेस्ला आणि ट्विटरचे मालक अ‍ॅलन मस्क यांना धोबीपछाड देत फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर आलेत. वडिलांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. पुढे एका टॅक्सी ड्रायव्हरकडून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी फॅशन उद्योगात प्रवेश केला. अरनॉल्ट यांना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचा गॉडफादर म्हटलं जातं.

वेगवेगळ्या लक्झरी वस्तूंचं आपल्याला भारी आकर्षण असतं. घड्याळ, हँडबॅगपासून ते अगदी चष्मा, परफ्यूमपर्यंत लक्झरी ब—ँडच्या वस्तू आपल्या स्टेटस सिम्बॉल बनल्यात. ‘लुई विटॉन मोएट हेनेसी’ अर्थात ‘एलव्हीएमएच’ ही जगातली लक्झरी ब—ँडमधली सगळ्यात मोठी कंपनी. याच कंपनीचे सीईओ आणि उद्योगपती असलेल्या बर्नार्ड अरनॉल्ट यांनी जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला नंबर पटकावलाय. त्यांनी टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे बॉस असलेल्या अ‍ॅलन मस्क यांनाही मागं टाकलंय.

मुळात गुंतवणूकदार आणि व्यावसायिक असलेल्या बर्नार्ड अरनॉल्ट यांचा जन्म 1949 ला फ्रान्सच्या रुबे शहरात झाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षणही रुबे इथंच झालं. आई-वडील दोघेही उद्योग-व्यवसायात होते. मास्टर्सपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या अरनॉल्ट यांच्या वडिलांची ‘फेरेट सॅविनेल’ नावाची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती. कुटुंब व्यवसायात असल्यामुळे पुढे काय करायचं, याबद्दलची स्पष्टता होती. त्यामुळेच 1971 ला अरनॉल्टनी फ्रान्समधल्या इंजिनिअरिंगसाठी अग्रगण्य संस्था असलेल्या इकोले पॉलिटेक्निकमधून डिग्री घेतली. पुढं वडिलांच्याच ‘फेरेट सॅविनेल’ या कन्स्ट्रक्शन कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करायला सुरुवात केली. हीच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची पहिली सुरुवात होती.

दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या वडिलांना रिअल इस्टेटचं महत्त्व पटवून दिलं. त्यात गुंतवणूक करण्यासाठी एक प्लॅनही तयार केला. त्यासाठी जॉर्ज व्ही ग्रुपची स्थापना केली. 1978 मध्ये ‘फेरेट सॅविनेल’ कंपनीच्या चेअरमनपदाची जबाबदारी बर्नार्ड यांच्याकडे आली. त्याआधी त्यांनी कंपनीत वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम केलं होतं. त्यामुळेच कंपनीची धुरा हाती आल्यावर त्यांनी उद्योग-व्यवसायाला एक वेगळा आकार दिला.

याच काळात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बर्नार्ड यांनी गुंतवणूक चालू ठेवली. त्यावेळी ‘बुसॅक सेंट फ्ररेस’ हा कापड उद्योगातला मोठा ब—ँड होता. 1984 च्या दरम्यान हा ब—ँड दिवाळखोरीत आला. फ्रान्सचे प्रसिद्ध लक्झरी डिझायनर ख्रिश्चन डायर यांचा हा ब—ँड होता. बर्नार्ड यांनी संधी हेरत ही कापड उद्योगकंपनी विकत घेतली. त्यातल्या 9 हजार कर्मचार्‍यांना बाहेर काढलं. पुढे याच ब—ँडच्या मदतीने त्यांनी लक्झरी वस्तूंच्या क्षेत्रात प्रवेश केला.

एकदा बर्नार्ड न्यूयॉर्कमध्ये होते. शहर फिरत असताना त्यांची गाठ एका टॅक्सी ड्रायव्हरशी पडली. त्यांच्यात हलकंफुलकं बोलणं सुरू झालं. त्यावेळी बर्नार्ड यांनी त्या ड्रायव्हरला सहजच एक प्रश्न विचारला. ‘तुला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष माहिती आहेत का?’ त्यानं उत्तर दिलं, ‘नाही; पण मी ख्रिश्चन डायर यांना ओळखतो.’ या छोट्या प्रसंगातून डायर आणि त्यांचा ब—ँड जगात किती प्रसिद्ध होता, याची कल्पना येते. ‘फोर्ब्स मॅगझीन’च्या एका लेखात या प्रसंगाचा उल्लेख केलाय. या एका प्रसंगानं अरनॉल्ट यांना एका जागतिक ब—ँडचं महत्त्व सांगितलं. एखादा ब—ँड सर्वसामान्य लोकांवर कशी छाप पाडू शकतो, याची प्रचिती त्या टॅक्सी ड्रायव्हरसोबतच्या बोलण्यातून अरनॉल्ट यांना झाली होती. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि पुढं एक खूप मोठा ब—ँड उभा राहिला.

‘डायर’ हा ब—ँड विकत घेतल्यावर त्यांचं लक्ष ‘डायर’च्याच परफ्यूमकडे गेलं. त्यावेळी लक्झरी वस्तूंच्या क्षेत्रातल्या कंपन्या ‘लुई विटॉन’ आणि ‘मोएट हेनेसी’ यांची चलती होती. त्यांनी ‘डायर’चा परफ्यूम ब—ँड विकत घेतला होता. यातल्या ‘विटॉन’ कंपनीत अरनॉल्ट यांची भागीदारी होती. पुढं या दोन्ही कंपन्या नावाने एकत्र आल्या. अरनॉल्ट यांनी 1989 ला ‘एलव्हीएमएच’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या कंपनीचे सर्वाधिक शेअर विकत घेतले.

‘एलव्हीएमएच’चं रूपांतर एका मोठ्या ग्रुपमध्ये झालं. अरनॉल्ट यांची या कंपनीत 50 टक्के इतकी भागीदारी आहे. त्यांनी यात मोठ्या कंपन्यांनाही सामावून घेतलंय. ‘एलव्हीएमएच’ हा उद्योग समूह आज ब—ँडेड परफ्यूम, शॅम्पेन, वाईन, चामड्याच्या वस्तू, घड्याळं, दागिने विकतो. आजची जगातली सगळ्यात मोठी लक्झरी वस्तूंची कंपनी म्हणूनही ‘एलव्हीएमएच’कडे पाहिलं जातंय. या कंपनीची जगभरातल्या 68 देशांमध्ये 5,500 स्टोअर्स असल्याचं त्यांच्या वेबसाईटवर वाचायला मिळतं.

‘एलव्हीएमएच’सोबत आज जगातल्या 60 पेक्षा अधिक सहायक कंपन्या म्हणून काम करताहेत. या कंपन्यांचे जवळपास 75 लक्झरी ब—ँड आहेत. यात दागिन्यांमधला ‘सिफोरा’, ‘टिफनी अँड कंपनी’,‘बलगरी’, सौंदर्य प्रसाधनांमधली ‘डायर’, घड्याळ बनवणारी ‘टॅग हेयर’, हँडबॅगमधली ‘फेंडी’, चष्म्यासाठी असलेला ‘मार्क जेकब’ अशा जगप्रसिद्ध ब—ँडचा समावेश आहे.

कलेच्या श्रीमंतीचं दर्शन : फॅशन उद्योगाचे गॉडफादर समजले जाणारे अरनॉल्ट कलेचे चाहते म्हणूनही जगभरात ओळखले जातात. त्यांच्या कलासंग्रहात प्रसिद्ध चित्रकार पिकासो, अमेरिकन चित्रकार अँडी वॉरहोल, फे्रंच चित्रकार यवेस क्लेन, तत्त्वज्ञ हेन—ी मूर यांच्या कलाकृती आणि आधुनिक, समकालीन चित्रांचा समावेश आहे.

फ्रान्समधल्या कलेला, कलाकारांना प्रोत्साहन देण्यात अरनॉल्ट यांचा मोठा वाटा आहे. एलवीएमएचच्या माध्यमातून फ—ान्समधल्या वेगवेगळ्या कला शाळांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. फॅशन डिझायनरना कला जोपासण्यासाठी अनुदान दिलं. कला निर्मिती आणि समकालीन कलेला समर्पित एका प्रकल्पासाठी म्हणून त्यांनी पॅरिसमधे एक इमारत उभी केलीय. त्यातून त्यांच्या मनात कलेबद्दल असलेल्या आपुलकीचं दर्शन घडतं. 1999मधे अरनॉल्ट पहिल्यांदा फॅशन क्षेत्रातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यानंतर 2019ला त्यांची संपत्ती 100 बिलियन डॉलरवर पोचली. त्यावेळी अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे दोघंच या स्पर्धेत होते. जुलै 2019ला अरनॉल्ट जगातली दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. डिसेंबर 2019ला त्यांनी श्रीमंतीमधे जेफ बेझोस यांनाही मागे टाकलं होतं.

जानेवारी 2021ला अमेरिकेतली दागिने बनवणारी मटिफनी अँड कंपनीफ विकत घेतली. महत्वाचं म्हणजे 15.8 अब्ज डॉलरला खरेदी केलेली ही कंपनी एलवीएमएचचा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा करार समजला जातोय. अरनॉल्ट यांची चार मुलं एलवीएमएचचा कारभार पाहतायत. त्यांच्या कुटुंबाकडेही एलवीएमएचचं मोठं भागभांडवल आहे. असं सगळं असलं तरी 73 वर्षांचे अरनॉल्ट कंपनीकडे जातीने लक्ष देतात. कर्मचार्‍यांशी स्वतः संवादही साधतात.कोरोना साथीचा फटका अरनॉल्ट यांनाही बसला होता. त्यामुळे मधल्या काळात त्यांची काही प्रमाणात पीछेहाट झाली होती. पण मे 2021ला ते पुन्हा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झळकले. आता पुन्हा टेस्ला आणि टि्वटरचे सर्वेसर्वा एलन मस्कना मागे टाकत 188.6 बिलियन डॉलर इतक्या संपत्तीनं अरनॉल्ट जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत.

Back to top button