आर्थिक : आभासी चलनाचे भयावह वास्तव | पुढारी

आर्थिक : आभासी चलनाचे भयावह वास्तव

‘ज्याबाबत आपणास कळत नाही तेथे गुंतवणूक करू नये,’ हा वॉरेन बफे यांचा सल्ला गुंतवणुकीचा ‘सुवर्ण नियम’ आहे. दरमहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 3,000 चा परतावा, फॉरेक्स, डिजिटल कॉईन अशा अनेक स्वरूपात आजही गुंतवणूकदारांना फसवले जात आहे. अशी फसवणूक करणारे विविध स्वरूपात सर्वत्र भेटणार असल्याने सावधानता, जागरूकता हाच संरक्षणाचा मार्ग ठरतो.

11 नोव्हेंबर 2011 हा दिवस क्रिप्टो जगताला धक्का देणारा ठरला. फ्युचर ट्रेड एक्स्चेंज म्हणजे FTX चे सॅम बॅकमन फ्राईड यांनी आपल्या क्रिप्टो विनिमय केेंद्राचे दिवाळे घोषित केले. नेमके क्रिप्टोचे विनिमय केंद्र कसे चालते व त्याचे दिवाळे निघाल्यावर पुढे काय, हे समजून घेणे वित्त क्षेत्रातील अभ्यासकच नव्हे, तर सर्वसाधारण गुंतवणूकदारांनाही एक महत्त्वाचा धडा देणारे ठरते. कूटचलन किंवा आभासी चलन हे बिटकॉईनच्या प्रचंड परताव्याने सर्वांना आश्चर्यचकित करणारे ठरले. चलन क्षेत्रातील क्रांती म्हणून ब्लॉक चेन तंत्रज्ञान व खुले नोंद पद्धत (open Registee) यामुळे ते केवळ तंत्रप्रगतच नव्हे, तर प्रस्थापित चलनाला पर्यायी ठरेल, असे लोकांना वाटते. अर्थातच, एकदा अशी प्रचंड परतावा देणारी संधी दिसली की, त्यामागे झुंडी धावू लागतात व त्यातून परतावा अल्पावधित प्रचंड होऊ लागतो. हे चक्र अर्थातच ‘काही तरी’ निमि त्ताने उलट फिरते व गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होते. केवळ बिटकॉईनची गुंतवणूक जानेवारी 2019 मध्ये एका बिटकॉईनला 2,42,333 होती, त्याचा दर दोन वर्षांत 2021 मध्ये 47 लाख झाला; म्हणजे दोन वर्षांत परतावा 18 पट मिळाला; पण यानंतर वित्त जगतात झालेली पडझड मूल्य घसरण पाहावी लागली. ही घसरण 3 पटीने होती. बिटकॉईनसोबत असंख्य आभासी चलने उदयास आली व त्यातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडले.

आभासी चलनाची गूढता, गुंतागुंत न समजता अनेकांनी आंधळी गुंतवणूक केली. आभासी चलनाचा दुसरा टप्पा हा अशा चलनाच्या व्यापार उलाढालीतून परतावा मिळवण्याचा होता. त्यासाठी शेअर्स बाजाराप्रमाणे विनिमय केंद्र आवश्यक होते. ही गरज पूर्ण करण्यासाठी जागतिकस्तरावर बायनान्स, कॉईनबेस प्रो, हुबोई अशी विनिमय केंद्रे आभासी चलन व्यापारास स्थापन झाली. याच क्षेत्रात FTX ने 2019 मध्ये प्रवेश केला. प्रतिदिन 300 बिलियन डॉलरची उलाढाल असणार्‍या बाजारात एक नवा स्पर्धक आपली कार्यक्षमता सिद्ध करू लागला व ते दुसर्‍या क्रमांकाचे महत्त्वाचे आभासी चलन विनिमय केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले.

FTX :

अनमोंडा संशोधन संस्था आणि सॅम बॅकमन फ्राईड मिळून 2018 मध्ये आभासी चलनाचे विनिमय केेंद्र सुरू केले. यामध्ये फेसबुकचे संगणकतज्ज्ञ निशांत सिंग, गॅरी बॅक अशा ख्यातनाम तज्ज्ञांसोबत नावीन्यपूर्ण सेवा देणारी संस्था म्हणून सुरुवात केली. केवळ आभासी चलनांचा व्यवहार नव्हे; तर त्याचे वायदेबाजारदेखील सुरू केले. विश्वास, पारदर्शीपणा, तंत्रप्रगतता यांचा संगम असल्याने याच्याकडे ग्राहकवर्ग वाढत गेला. व्यवहार खाते तीन प्रकारे टी 1, टी 2, टी 3 असे उघडता येत असे. केवळ ई-मेल, नाव न देता एव्हड्या माहितीआधारे प्राथमिक खाते उघडणे शक्य होते. यावर 200 डॉलरचे व्यवहार करता येत असत. मोठे व अमर्याद व्यवहार करण्यास टी 2, टी 3 खाती होती. प्रबळ पासवर्ड, द्विस्तरीय (2 FA) खाते परिचालन व 10 पट व्यवहार सूट ही वैशिष्ट्ये सर्व व्यवहारांना सुलभ व सुरक्षित करीत असे. आभासी चलनाचा वायदे बाजार करणारी FTX स्वत:ची झढढ नावाचे चलननिर्मिती करे. यामध्ये बायनान्सचा वाटा लक्षणीय होता व तेच त्याच्या दिवाळखोरीकडे जाण्याचे कारक ठरले.

दिवाळखोरी :

एका दिवसात 16 बिलियन डॉलरचे नुकसान हा जागतिक विक्रम बॅकमन फ्राईडच्या नावाने नोंदवला गेला व FTX ही 11 नोव्हेंबर 2022 रोजी दिवाळखोर झाली. एखादे छोटे छिद्र संपूर्ण जहाज बुडवू शकते तसेच 2 नोव्हेंबर रोजी काँडेक्सच्या लेखाने घडले. RTX आणि FTX व्यक्त करण्यात आली व त्याचा आधार घेत बायनान्सने आपली FTX मधील सर्व गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे सर्व FTX आणि FTT च्या गुंतवणूकदारांची टोळधाड FTX चे मूल्य वेगाने खाली आणण्यास सुरुवात केली. एका दिवसात 6 बिलियन डॉलर देणे शक्य नसल्याने ‘रोखतेची समस्या’ जाहीर करावी लागली. बाजारात एवढी मोठी रक्कम पत हरवल्यानंतर मिळणे शक्य नसल्याने दिवाळखोरी जाहीर करणे भाग पडले. यात प्रकरण 11 ची दिवाळखोरी असल्याने मालमत्ता गोठवली नाही. ही एक आशादायी बाब आहे. एक अत्यंत तंत्र प्रगत संस्था काही मोजकेच लोक नियंत्रित करीत असल्यास त्यातून घोटाळेच निर्माण होतात हे पुन्हा सिद्ध झाले. FTX ची दिवाळखोरी तांत्रिक अडचणीतून झाली नाही, हे महत्त्वाचे!

भारतीय संदर्भ बिंदू : आभासी चलनाचे भयावह वास्तव भारतीय नवगुंतवणूकदारांना महत्त्वाचे ठरते. तसेच अल्पकाळात वेगवान मोठा परतावा आश्वासित करणार्‍या योजनांचा शोध घेणर्‍या स्मार्ट गुंतवणूकदारांना ही धोक्याची घंटा आहे. आभासी चलनाचे एकून मूल्य 3 लाख कोटी डॉलर ते 1 लाख कोटी डॉलर असे घसरले असल्याने यामध्ये गुंतवणूक करण्यास चांगली संधी आहे, असे म्हटले जात आहे. तथापि, ‘ज्याबाबत आपणास कळत नाही तेथे गुंतवणूक करू नये,’ हा वॉरेन बफे यांचा सल्ला गुंतवणुकीचा ‘सुवर्ण नियम’ आहे. दरमहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 3,000 चा परतावा, फॉरेक्स, डिजिटल कॉईन अशा अनेक स्वरूपात आजही गुंतवणूकदारांना फसवले जात आहे. अशी फसवणूक करणारे विविध स्वरूपात सर्वत्र भेटणार असल्याने सावधानता, जागरूकता हाच संरक्षणाचा मार्ग ठरतो. गुंतवणुकीचे सुरक्षित, लाभदायी, जोखीम कमी असणारे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा विचार न करता ‘झटपट’ श्रीमंत हा दीर्घकालीन गरिबीचा महामार्ग आहे, हे विसरता कामा नये!

प्रा. डॉ. विजय ककडे

Back to top button