

धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासमवेत फॉर्म्युला वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करीत आहेत… सलामीवीर आणि यष्टीरक्षण ही खासियत… तसा तो महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा, परंतु 'आयपीएल'च्या अत्युच्च व्यासपीठावर धोनीनं स्थान अडवल्यामुळे त्याला आपली अदाकारी दाखवताच आलेली नाही… वय वर्षे 26 म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असे; पण टिकेल याची शाश्वती काय? कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ. असा हा अवलिया म्हणजे तामिळनाडूचा नारायण जगदीशन…
21 नोव्हेंबर, 2022 या दिवशी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अनपेक्षित, अभूतपूर्व, अविस्मरणीय अशा क्रिकेट अध्यायाची नोंद झाली. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात अनेक विश्वविक्रम पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडले, तर नवे उदयास आले. याचं श्रेय ते अर्थात जगदीशनलाच जातं. अ श्रेणी क्रिकेटमधील 277 (141 चेंडूंत) ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या (रोहित शर्माचा भारताकडून सर्वाधिक 264 धावांचा विक्रम मोडीत), 114 चेंडूंत वेगानं द्विशतकाच्या विक्रमाची बरोबरी, हजारे करंडक स्पर्धेत सर्वाधिक 15 षटकारांचा विक्रम, अ श्रेणी क्रिकेटमध्ये सलग पाच शतक साकारणारा पहिला फलंदाज आणि साई सुदर्शनच्या साथीनं 416 धावांची विक्रमी भागीदारी. इतकेच नव्हे, तर सहा सामन्यांत 156च्या सरासरीनं 624 धावा फटकावून स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणार्या फलंदाजांच्या पंक्तीत अग्रणी… ही जगदीशनची कर्तबगारी. त्यामुळे तामिळनाडूनंही अ श्रेणी क्रिकेटमधील 516 ही सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि विजय साकारला, तोही तब्बल 435 धावांनी.
आकड्यांची ही मोडतोड करणारा जगदीशनचा हा पराक्रम नक्कीच लक्षवेधी ठरतो. कारण काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघ अपयशी ठरला. अनेक वरिष्ठ खेळाडूंवर या अपयशाचं खापर फोडण्यात आलं. त्यामुळे नव्याची लाट तशी ताजीच आहे आणि जागाही रिक्त आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-20साठीच्या नवउमेदीच्या संघाची निर्मिती होऊ शकते, हीसुद्धा तशी सकारात्मक बाब. म्हणजेच जगदीशनच्या वाटचालीला पुरेशी संधी आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
जगदीशनचे वडील सी. जे. नारायण हे मुंबईत कार्यरत असताना टाटा इलेक्ट्रिक कंपनीकडून क्रिकेट खेळायचे. त्यामुळेच वयाच्या नवव्या वर्षीपासूनच जगदीशननं क्रिकेट प्रशिक्षणाला प्रारंभ केला. अर्थात नारायण हेच त्याचे पहिले प्रशिक्षक. जगदीशनला वेगवान गोलंदाज व्हायचं होतं. पण वडिलांच्या सल्ल्यानं त्यानं यष्टीरक्षकाची भूमिका स्वीकारली. यष्टीपाठी प्रत्येक चेंडूचं निरीक्षण करण्याच्या सवयीमुळे त्याच्या फलंदाजीतही 360 अंशांत खेळण्याची परिपक्वता आली. पुढे ए. जी. गुरूसामी यांचे त्याला मार्गदर्शन लाभलं.
2016-17 च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात जगदीशननं रणजी पदार्पण केलं. या सामन्यात तमिळनाडूची सुरुवात खराब झाली. परंतु सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत जगदीशननं दोन षटकार आणि आठ चौकारांसह 123 धावांची झुंजार खेळ साकारली. त्यामुळे तामिळनाडूला 7 बाद 555 अशी आश्वासक धावसंख्या उभारता आली. हा सामना जरी अनिर्णीत राहिला, तरी जगदीशननं सामनावीर पुरस्कार पटकावून क्रिकेटजगताला दखल घ्यायला लावली.
2018च्या 'आयपीएल' लिलावात चेन्नई सुपर किंग्जनं जगदीशनला संघात स्थान दिलं. पण प्रत्यक्ष खेळता आलं, ते 10 ऑक्टोबर 2020 या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध. जगदीशन आजही चेन्नईच्याच संघात आहे. पण यष्टीरक्षक-फलंदाज ही भूमिका धोनीकडेच असल्यानं अन्य पर्यायांचा विचार होणं, तसं कठीणच. पण कोंबडं कितीही झाकलं, तरी आरवायचं थोडंच राहतं. तशीच गुणवत्ता ही कोंडून ठेवता येत नाही. 2020-21 हा क्रिकेट हंगाम जगदीशनसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा (आठ सामन्यांत एकूण 364 धावा) त्याच्या नावावर होत्या. याचप्रमाणे हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूकडून सर्वाधिक 217 धावा त्यानं काढल्या. यात पंजाबविरुद्धच्या शतकाचाही समावेश आहे. या यशोदायी कामगिरीचं सातत्य यंदाही टिकवलं आहे.
मुंबईचे सर्फराज खान, पृथ्वी शॉ गेली काही वर्षे सातत्यानं धावा काढत आहेत. पण त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. कौंटी क्रिकेटमध्ये सातत्यानं शतकं झळकावणारा चेतेश्वर पुजारा असो, की अजिंक्य रहाणे या कसोटी विशेषज्ञ फलंदाजांना स्थान टिकवण्यासाठी तीव- स्पर्धेला सामोरं जावं लागतं. पद्माकर शिवलकर, राजिंदर गोयल, अमोल मुझुमदार, मिथुन मन्हास आणि एस. शरथ यांनी देशांतर्गत क्रिकेट गाजवूनही भारतीय संघातलं स्थान त्यांच्या नशिबात नव्हतं. गुणवान खेळाडूंची देशात मुळीच वाणवा नव्हती. पण त्या स्थानासाठी असलेले खेळाडू देशाकडून चांगली कामगिरी करीत होते. म्हणूनच त्यांना संधी मिळाल नाही.
काही खेळाडू एखाद्या धूमकेतूप्रमाणे चमकले. पण नंतर कालौघात त्यांची कारकीर्द कधी संपली, हेही कळलं नाही. 2011च्या 'आयपीएल' हंगामात मुंबईचा पॉल व्हल्थाटी या स्थानिक क्रिकेटमध्ये पर्दापणही न केलेल्या फलंदाजानं लक्षवेधी कामगिरी बजावली. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून हा सलामीवीर चौफेर फटकेबाजी करायचा. पण डोळ्याच्या दुखापतीनंतर त्याची कारकीर्द अपेक्षेनुसार उंचावलीच नाही. याहून मोठ्या आशा दाखवल्या, त्या उन्मुक्त चंदनं. 2012मध्ये उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली भारतानं 19 वर्षांखालील विश्वविजेतेपद जिंकलं. अभ्यास आणि क्रिकेट या दोन्ही आघाड्यांमध्ये हुशार असणार्या उन्मुक्तनं या युवा विश्वचषकाच्या यशस्वी प्रवासाबाबत 2013 मध्ये 'द स्काय इज द लिमिट' हे पुस्तकही लिहिलं.
पण त्याच्या कारकिर्दीचा आलेख मर्यादित राहिला. गेल्याच वर्षी म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी निवृत्ती पत्करली. उन्मुक्तच्या यशस्वी संघाचा उपकर्णधार होता, तो महाराष्ट्राचा विजय झोल. 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये 11 तास खेळपट्टीवर ठाण मांडून 53 चौकार आणि दोन षटकारांसह महाराष्ट्रकडून नाबाद 451 धावांची विक्रमी खेळी साकारणारा हा युवा तारा. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट काही वर्षे खेळला. युवा क्रिकेटमध्ये भारताचंही प्रतिनिधित्व त्यानं केलं. पण उज्ज्वल भवितव्य तो घडवू शकला नाही. 2016मध्ये शालेय क्रिकेटमध्ये 15 वर्षीय प्रणव धनावडेनं ऐतिहासिक कामगिरी केली, ती म्हणजे नाबाद 1009 धावा केल्या.
धनावडेच्या कामगिरीचं सचिन तेंडुलकर, धोनी यांनीही कौतुक केलं. राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी त्याच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा आर्थिक भार उचलला. पण सातत्याच्या अभावामुळे धनावडेची कारकीर्द उंचावू शकली नाही. "जगदीशनकडे उत्तम गुणवत्ता आहे. पण तितकीच स्पर्धासुद्धा आहे. मग त्याच्या हातात फक्त चांगलं कामगिरी साकारणं, हेच उरतं. ते तो इमानेइतबारे करतो आहे. निवड समिती त्याची नोंद घेईल, अशी आशा आहे. सातत्य हेच खूप महत्त्वाचं असतं. ते त्याच्या फलंदाजीत आहे," असं माजी फलंदाज आणि प्रशिक्षक प्रवीण अमरे जगदीशनविषयी सांगतात.
प्रशांत केणी