हवामान : पावसाचे घातचक्र | पुढारी

हवामान : पावसाचे घातचक्र

परतीच्या पावसाचा तडाखा आता नेहमीच बसू लागला असून, यामुळे कृषीक्षेत्राचे अर्थकारण कोलमडून पडत आहे. यावर्षी अतिवृष्टीने 36 लाख हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाल्याची माहिती पुढे आली आहे. हा सरकारी आकडा असून, प्रत्यक्ष नुकसान यापेक्षाही अधिक असणार आहे. अभ्यासकांच्या मते, हवामान बदलामुळे भारतातील मान्सूनमध्ये अधिक गुंतागुंत निर्माण झाली असून, भविष्यातही अशीच किंवा याहून विदारक परिस्थिती दिसण्याची शक्यता आहे.

भारतीय परंपरेतील सर्वांत लोकप्रिय सण असणार्‍या दिवाळीची धामधूम नुकतीच आटोपली. सालाबादप्रमाणे यंदाही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला खरा; पण यंदा राज्यातील अनेक भागांमधील शेतकर्‍यांच्या डोळ्यांत या सणासुदीच्या काळात अश्रू तरळताना दिसले. याचे कारण परतीच्या पावसाने दिलेला जबरदस्त तडाखा. मुळात यंदा पावसाचे आगमन लांबल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या होत्या. पावसात खंड पडल्याने सिंचनाच्या पाण्यावर पिके रुजवली, जगवली, वाढवली. जुलै ते सप्टेंबर या काळात पाऊसमान चांगले झाले असले तरी त्याचे वितरण असमानच होते आणि तेव्हाही वरुणराजाचा लहरीपणा कायम होता. महत्प्रयासाने खरिपाचे पीक काढणीला आलेले असताना, कापलेले पीक साठवणूक करून विक्रीच्या तयारीत असताना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यापासून परतीच्या पावसाचे आकांडतांडव सुरू झाले आणि मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशा दाही दिशांना पावसाने अक्षरशः थैमान घातले. पुण्यासारख्या महानगरात काही तासांत पडलेल्या शे-दीडशे मिलिमीटर पावसामुळे चारचाकी वाहने वाहून जाताना दिसली. मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले.

परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान अपरिमित आहे. काढणीला आलेली पिके विकून दोन-चार पैसे मिळतील, अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र, शिवारात उगवलेले सोने पाण्यात वाहून गेल्याने, शेतात नुसता चिखल झाल्याने बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. दिवाळीदरम्यान शेतकर्‍यांच्या घरात धान्य आलेले असते. यातीलच काही शेतीमाल विकून कुटुंबासाठी नवे कपडे खरेदी करून, घरी गोडधोड पदार्थ करून शेतकरी आनंदात दिवाळी साजरी करीत असतात. यावर्षी मात्र अतिवृष्टी आणि दिवाळीपर्यंत लांबलेल्या पावसाने बहुतांश कुटुंबांत धनधान्य येऊच दिले नाही. जुलै ते सप्टेंबरपर्यंतच्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे खूप नुकसान केले. यातून वाचलेल्या पिकांचा घात ऑक्टोबरमधील पावसाने केला आहे.

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात 65 टक्क्यांहून अधिक जास्त परतीचा पाऊस पडला. महाराष्ट्रात पावसाळ्याचा अधिकृत कालावधी संपल्यानंतर सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजे 102 टक्के परतीचा पाऊस पडला. राज्याच्या बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तर तो सरासरीच्या दुपटीहूनही अधिक झाला आहे. राज्यात सर्वाधिक 230 मिलिमीटर पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झाला; पण सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 186 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

गेल्या काही वर्षांतील पावसाचा स्वभाव पाहिल्यास टोकाचे चढउतार, खंड, अतिवृष्टी, ढगफुटी, कमी काळात अतिपाऊस यांसारख्या घटनांची वारंवारिता अधिक दिसून येते. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्याकडे 2015 मध्ये रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करावा लागला होता; पण 2019 मध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात बुडता बुडता वाचली. पुण्यासारख्या जिल्ह्यात अनेक धरणांनी तळ गाठल्याने पाणीकपात करावी लागली होती; त्याच जिल्ह्यातील धरणे यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा भरलेली दिसली. ‘क्लायमेट ट्रेड्स’च्या एका अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर दरम्यान मान्सून शक्यतो झारखंड, बिहार तसेच पश्चिम बंगाल यामार्गे उत्तर प्रदेशकडून पुढे सरकतो. मात्र, यावर्षी मान्सूनचा प्रवास उत्तर प्रदेशच्या गंगा मैदानाऐवजी मध्य भारतातून झाला.

मान्सून मध्य भारतातून राजस्थानकडे वळला. त्यामुळे यंदा उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार तसेच पश्चिम बंगालमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले, तर मध्य प्रदेश, राजस्थान (काही भाग), गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या अहवालानुसार, मान्सूनमध्ये उलटा बदल झाल्याचा दिसून आला. काही अभ्यासकांच्या मते, अरबी समुद्रात निर्माण होणार्‍या कमी दाबाच्या पट्ट्यात बदल झाल्याने मान्सूनचे तंत्र बदलले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक दिवस कोरडे जातात, तर काही दिवस इतका पाऊस पडतो की, जनजीवनच विस्कळीत होते. तसेच पावसाळ्यात अधूनमधून पडणारा पाऊस पावसाळा संपल्यानंतर सलग पडतो आहे. मान्सूनचे असे विचित्र वितरण कृषी व्यवस्थेसाठी अत्यंत नुकसानदायक ठरत आहे.

पावसातीलच नव्हे तर एकंदरीतच ऋतूमानातील या बदलांची कारणे एव्हाना स्पष्ट झाली असून, वेगाने होणारी जागतिक तापमानवाढ याच्या मुळाशी आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मान्सूनवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावासावेळी पुन्हा मान्सून सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. यामुळे यंदासुद्धा ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. साधारणपणे भारतात सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा काळ असतो, यास ‘मान्सून विड्रॉअल’ असे म्हणतात. या दरम्यान पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो, तर उत्तर-पश्चिमी भागात पाऊस हळूहळू कमी होत जातो. उत्तर-पश्चिम भारतात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीच्या प्रवासाला लागतो. मात्र, यंदा ऑक्टोबरचा तिसरा आठवडा उलटूनही पाऊस सुरूच होता.

सध्याच्या अतिवृष्टीमुळे शहरे-गावे सर्व काही पाण्याखाली जात आहेत. प्रचंड पाऊस आणि पूरस्थितीसाठी हवामान बदलांबरोबरच मानवनिर्मित कारणेसुद्धा आहेत. जगभरात विविध विकास योजनांसाठी सरसकट वृक्षतोड केली जात आहे. आपल्याकडे नद्यांमध्ये अवैध वाळूउपसा केला जातो. नदीकाठची वृक्षसंपदा र्‍हासाकडे निघाली आहे. अतिक्रमणांमुळे नद्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. वाढत्या वाहनांमुळे वायूप्रदूषण टीपेला पोहोचले आहे. अशा प्रकारची अनेक कारणे पावसामुळे होणारे नुकसान वाढवतात.

मान्सून बदलावर ‘नेचर कम्युनिकेशन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, हवामान बदलामुळे भारताच्या एका हिश्श्यात दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण होणार आहे. याउलट देशाच्या मोठ्या भागात पुढील तीस वर्षांत मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. या संशोधनानुसार, उत्तर भारतात दुष्काळाचे संकट असेल, तर 2050 पर्यंत देशाच्या अनेक भागात पंधरा ते तीस टक्के अधिक पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत चिंता व्यक्त करताना अनेक तज्ज्ञांनी 2100 पर्यंत देशाच्या मोठ्या भागात 30 टक्के अधिक पावासाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘पाट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’च्या एका अहवालानुसार, हवामान बदलामुळे भारतातील मान्सूनमध्ये अधिक गुंतागुंत निर्माण केली आहे. या अहवालाच्या संशोधकांच्या मते, भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागतिक तापमानवाढीचा हा दुष्परिणाम आहे. हवामान तज्ज्ञांनुसार, मान्सूनचक्र एका विशिष्ट पद्धतीने सुरू असते. आता याच चक्रात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही समस्या केवळ भारताची नाही तर जागतिक आहे. यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चीन, जर्मनी आणि अमेरिकेसहित अनेक युरोपीय देशांमध्ये यावर्षी आलेल्या भयंकर महापुरांनी जगाला धोक्याचा इशारा दिला आहे की, हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, त्याचे परिणाम आता प्रत्यक्ष स्वरूपात दिसू लागले आहेत. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीच्या तापमानात प्रत्येक अंश सेल्सियस वाढीने मान्सूनच्या पावासात जवळपास पाच टक्के वाढ होत आहे. ढगफुटी आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामागेसुद्धा हवामान बदल हेच कारण आहे.

पर्यावरणात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाची हानी अशीच सुरू राहिली तर पावसाची समस्या पुढील कालावधीत आणखी तीव्र होणार आहे. पर्यावरणाबाबत वेळोवेळी गंभीर इशारा दिला जात असला तरी मानव यातून काहीही धडा घेत नाही; पण यामुळे मानवीसमूहाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

मान्सूनचा बदललेला ट्रेंड पाहिल्यास 2018 मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत 50 टक्के अतिरिक्त पाऊस पडला होता. 2019 मध्येही याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. 2019 मध्ये 9 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता; परंतु महिनाखेरीपर्यंत 45 टक्के अधिक पाऊस पडला. गतवर्षी 2021 मध्ये 6 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता; परंतु महिनाखेरीपर्यंत 33 टक्के अतिरिक्त पाऊस पडला. मान्सूनच्या बदललेल्या पॅटर्नमुळे शेतकर्‍यांचे वर्षानुवर्षांपासून चालत आलेले ‘क्रॉप कॅलेंडर’ किंवा पीक नियोजनाचे आराखडे कोलमडून पडताहेत.

यावर्षी अतिवृष्टीने 36 लाख हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाल्याची माहिती पुढे आली आहे. हा सरकारी आकडा असून, प्रत्यक्ष नुकसान यापेक्षाही अधिक असणार आहे. अशा संकटग्रस्त काळात शासनाने मदतीच्या योजना राबविल्याच पाहिजेत; परंतु तो कायमस्वरूपी उपाय नाही किंवा समस्येवरचे उत्तरही नाही. ती तात्पुरती मलमपट्टी असेल. खरा उपाय निसर्गानुकूल जीवनशैली अंगीकारणे आणि हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगाने पावले टाकून पर्यावरणपूरकतेला परमोच्च प्राधान्य देणे हाच आहे.

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

Back to top button