सिंहायन आत्मचरित्र : सिंहावलोकन | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : सिंहावलोकन

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ‘सिंहायन ः एक अक्षरगाथा’ या सुमारे एक हजार पानांच्या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मधून प्रसिद्ध झाली आहेत. या आत्मचरित्रात गेल्या पन्नास वर्षांतील देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना आणि घडामोडींचा चिकित्सक इतिहास शब्दबद्ध झाला आहे. जागेअभावी सर्वच प्रकरणे प्रसिद्ध करता आली नाहीत. आत्मचरित्रातील ‘सिंहावलोकन’ हे समारोपाचे प्रकरण दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. लवकरच हे आत्मचरित्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून प्रसिद्ध होत आहे. आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीस ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक व डॉ. यु. म. पठाण यांची प्रस्तावना लाभली आहे. तर हिंदी आवृत्तीस ‘इंडिया टुडे’चे माजी मुख्य संपादक आलोक मेहता, इंग्रजी आवृत्तीस ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. – संपादक, बहार पुरवणी

‘The future belongs to those who belive in the beauty of their dreams.’
स्वप्नं फक्त पाहायची नसतात, तर त्यांना मूर्त स्वरूप देऊन त्यातलं सौंदर्य शोधायचं असतं, असं इलेनॉर रुझवेल्ट म्हणतात. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्या इलेनॉर या सुविद्य पत्नी. त्याही मुत्सद्दी, धूर्त आणि राजकारणी होत्या. त्यामुळे त्यांच्या या विधानाला एक वेगळाच गंध प्राप्त होतो. किंबहुना, ते विधान एक मंत्रच बनून जातं.

मी तर आयुष्यभर हाच मंत्र पाळला. मी जी जी स्वप्नं पाहिली, ती प्रत्यक्षात आणण्यात मी यशस्वी झालो. त्यामुळेच आयुष्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंतची वाटचाल करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखे खूप सुंदर आहे. मात्र, या सुंदरतेला तुमच्या कर्तृत्वाचे मोरपंख लाभले, तर ते आयुष्य अधिकच खुलून दिसतं. हे खुलणं म्हणजे सप्तरंगांची उधळण असते, हे खरं. परंतु, आपण कोणता रंग अधिक उधळतो, त्यावर आयुष्याचं सौंदर्य अवलंबून असतं. कारण, शेवटी हे रंगच आयुष्याची वाटचाल अधोरेखित करीत असतात. यशस्वी होण्याचे मापदंड ठरवीत असतात.

जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील संघर्ष कुणालाच चुकत नाही. खरं तर, संघर्ष हा जीवनाचा स्थायीभावच असतो. किंबहुना, संघर्ष म्हणजे जिवंतपणाचं लक्षणच म्हणावं लागेल. हा संघर्षच आपल्याला देदीप्यमान अशा यशाकडे घेऊन जात असतो. ‘दे हरी पलंगावरी’ या उक्तीप्रमाणे कुणालाच जीवन जगता येत नाही. फुकट आणि आयतं मिळण्याची अपेक्षा करणं म्हणजे आपणच आपल्या आयुष्याला वाळवी लावून, विनाशाच्या मार्गानं जाण्यासारखं आहे. म्हणूनच जो लढतो, तोच जेता होतो, हे साधं गृहितक कधीही नजरेआड होऊ द्यायचं नाही, या तत्त्वातच यशाचं रहस्य दडलेलं असतं, असं माझं ठाम मत आहे.

मी अनेकदा पाहत आलो आहे की, अनेकांना वडिलोपार्जित विरासत मिळते. म्हणजे त्यांच्या हातात आयतंच डबोलं पडतं; मग ते आयतोबा त्यावरच समाधानी राहतात. त्यांच्या बापजाद्यांनी मिळवलेलं यश हे काळानुरूप असतं. त्यांच्या व्यवसायाचे किंवा उद्योगधंद्याचे मापदंड पुढील काळात लागू पडतीलच, असं नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे आणि काळानुरूप होणारा बदल आपण स्वीकारलाच पाहिजे; अन्यथा आपण मोडून पडू, ही बाब मात्र कधीही नजरेआड होऊ देता कामा नये. होणार्‍या बदलाचा आदर करून, काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप आपल्यात सुधारणा करीत जाणे, आव्हानं स्वीकारत जाणे, हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

याप्रमाणे न वागणारे वडिलोपार्जित अफाट संपत्तीचे धनी होऊनही पुढे पार कंगाल होऊन जातात. म्हणूनच ज्यांना ही यशाची गुरुकिल्ली सापडते, ते वडिलोपार्जित विरासतीचं रूपांतर मोठ्या साम्राज्यात करण्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्यासाठी आकाश खुलं असतं. आपले बाहू पसरून ते त्यांच्या गरुडझेपेच्या प्रतीक्षेत उभे असतात. मी ‘सिंहायन’चा हा जो पट मांडला, तो म्हणजे माझ्या गरुडभरारीचं जणू सुंबरानच मांडलेलं आहे, असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. ‘सिंहायन’ म्हणजे पाठीमागे वळून पाहणं. काय बरोबर, काय चुकलं, याचा परामर्श घेणं अन् त्याच सुंबरानचा लेखाजोखा आपण आतापर्यंत पाहिलात, एक वाचक म्हणून त्याचे सहप्रवासी झालात.

सिंहायन आत्मचरित्र

अर्थात, माझं सुंबरान हे माझं एकट्याचं नसून, ते दै. ‘पुढारी’चंही जांभुळ आख्यान आहे, हे तितकंच खरं! ‘पुढारी’नं जनमानसावर गारुड घातलं, ही गोष्ट खरी असली, तरी ती एका रात्रीत घडलेलं नाही. एका रोपट्याचं रूपांतर एका विशाल महावृक्षात होत असताना, मला जवळजवळ एक युद्धच खेळावं लागलं होतं. समव्यावसायिकांशी तीव्र आणि टोकाची स्पर्धा करावी लागली. दंड थोपटून मैदानात उतरावं लागलं आणि हे जर मी केलं नसतं, तर इतर जिल्हा वृत्तपत्रांसारखाच ‘पुढारी’ही खुरटला असता. कालौघात नामशेष झाला असता; पण जे विशाल स्वप्नं पाहतात आणि स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी कंबर कसतात, त्यांचीच स्वप्नं साकार होतात. ती सत्यात उतरतात आणि मग एक स्वप्न साकार झालं की, ते नव्या स्वप्नाच्या मोहिमेवर निघतात. आतापर्यंत त्याच मोहिमेवर मी होतो व पुढेही राहीनच.

तसा विचार केला, तर सुरुवातीपासूनच माझी कारकीर्द तशी वादळी ठरली. परंतु, मी कधीही फक्त आजचा विचार केला नाही, तर नेहमीच भविष्यावर नजर ठेवून माझी घोडदौड चालू ठेवली. उद्याचा कानोसा घेऊन पुढे येणार्‍या परिस्थितीला कसं तोंड देता येईल, याचा विचार करून येऊ पाहणार्‍या अडचणींचा आधीच बंदोबस्त करून ठेवला. त्यामुळेच अनेक वादळं अंगावर येऊनही मी कधी डगमगलो नाही. अचल राहिलो. जिथे बंड करण्याची नितांत गरज आहे, तिथे मी बिनधास्तपणे बंडखोरी केली. अशावेळी अजिबात कचरलो नाही. शड्डू ठोकून थेट मैदानात उतरलो आणि संकटांना अस्मान दाखवलं. कोणत्याही वादळाला तोंड देताना धाडसानं वागावंच लागतं. मैदान सोडून चालत नाही. आपण जर डगमगलो, तर पराभव ठरलेलाच आणि पराभवाला शरण जाणं हे काही जेत्याचं लक्षण नाही. जेता व्हायचं असेल, तर पराभवाचा खात्मा केलाच पाहिजे. आपण ठोकलेल्या शड्डूनं पराभवाच्या मनात धडकी भरली पाहिजे.

सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ हेराक्टिटस म्हणतो, ‘या जगात कायमस्वरूपी अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदल.’ म्हणूनच मीही बदलाला सदैव सामोरा जात राहिलो. वृत्तपत्र व्यवसायातही बदल अपरिहार्य होते. 1969 साली मी ‘पुढारी’ची सूत्रं हातात घेतली, तेव्हा छपाईमध्ये नवीन तंत्रज्ञान आलं होतं. त्याचा अंगीकार केला, तरच ‘पुढारी’चा सर्वांगीण विकास होणार होता. त्या मशिनरी जर्मनमेड होत्या. त्यामुळे त्यांना तिथून आयात करणे, त्यांच्यासाठी जागा करणे, त्या इन्स्टॉल करणे आणि नीट चालाव्यात म्हणून तंत्रज्ञांची नेमणूक करणे, अशा अनंत अडचणी माझ्यासमोर ‘आ वासून’ उभ्या होत्या. शिवाय, त्यासाठी जवळपास तीस लाखांपेक्षा अधिक खर्च येणार होता.

तेव्हाची ती रक्कम म्हणजे आज काही कोटींच्या घरात जाऊ शकते आणि इतकं अवाढव्य कर्ज काढण्याची आबांची तयारी नव्हती. कर्ज फिटलं नाही, तर आपण गोत्यात येऊ, अशी भीती त्यांना भेडसावत होती. कर्जाच्या डोंगराखाली अशी असंख्य कुटुंबं गाडली जाताना त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे कर्ज काढण्याची त्यांची मानसिक तयारी अजिबात नव्हती. कर्ज काढण्यापेक्षा जसं आहे तसं चालू ठेवावं, या मताचे ते होते. त्यामुळेच त्यांनी मला प्रखर विरोध केला. मात्र, वृत्तपत्रसृष्टीत होणार्‍या बदलांवर मी बारकाईनं डोळा ठेवून होतो. मला बदलत्या परिस्थितीची जाण आली होती. ही मशिनरी आणली, तरच आपण या जीवघेण्या स्पर्धेत टिकू, काही तरी मन्वंतर घडवू शकू, याची मला खात्री वाटत होती. म्हणून मी माझ्या मतावर ठाम होतो. आबा आपल्या मुद्द्यावर ठाम होते आणि मीही पुढे उचललेलं पाऊल मागे घेण्यास तयार नव्हतो.

एकीकडे परंपरावाद आणि दुसरीकडे आधुनिकतेची आस, या दोहोंमधलं हे धर्मयुद्ध असल्यासारखीच तेव्हा परिस्थिती होती. वरकरणी ही संघर्षात्मक परिस्थिती वाटत असली, तरी खर्‍या अर्थाने ती दोन पिढ्यांमधील मतभिन्नता होती. ‘पुढारी’च्या सुरुवातीपासून आबा ‘पुढारी’चे सोल प्रोप्रायटर म्हणजेच संपूर्ण मालक होते व मी कायद्यानं सज्ञान झाल्यावर 1 मे 1964 मध्ये त्यांनी मला ‘पुढारी’चा पार्टनर करून घेतलं. परंतु, जेव्हा मी अत्याधुनिक मशिनरीच्या खरेदीसाठी हट्ट धरून बसलो, तेव्हा ‘मला कर्जात अडकवू नकोस. हा निर्णय तुझा आहे, त्याची जबाबदारीही तूच घे…’ असं म्हणत ते स्वतःच ‘पुढारी’च्या पार्टनरशिपमधून बाहेर पडले व मला त्यांनी 9 डिसेंबर 1974 रोजी ‘पुढारी’चा मालक केले. ते स्वतः फक्त संपादक म्हणून राहिले. मी ‘पुढारी’चा सोल प्रोप्रायटर झालो. ‘पुढारी’च्या जबाबदारीबरोबरच आपसूकच माझ्या खांद्यावर कर्जाचीही जबाबदारी आली! 17 जानेवारी 1997 रोजी योगेश पार्टनरशिपमध्ये आले, तर 5 एप्रिल 2004 रोजी ‘पुढारी’ प्रायव्हेट लिमिटेड झाला.

मशिनरी घेण्याबाबत तेव्हा, मला फक्त आबांचाच विरोध होता, असं नव्हतं. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आणि ‘विशाल सह्याद्री’चे संपादक खा. अनंतराव पाटील या दोघांनीही परोपरीनं माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या दबावाला मी बळी पडलो असतो आणि मी माझ्या मनाला मुरड घातली असती, तर आज मी कुठे असतो? महाराष्ट्रातील इतर जिल्हा वृत्तपत्रांची जी आज अवस्था झाली आहे, तीच ‘पुढारी’ची झाली असती. कोल्हापूरपुरतंच बोलायचं झाल्यास, कोल्हापुरात त्यावेळी ‘सत्यवादी’, ‘पुढारी’, ‘लोकसेवक’, ‘इंद्रधनुष्य’, ‘नवसंदेश’, ‘समाज’ अशी वृत्तपत्रे होती; पण काळानुरूप येणार्‍या आव्हानांना सामोरे न गेल्यामुळे ही वृत्तपत्रे पाठीमागे राहिली, हे दुर्दैव आहे.

त्यावेळी मुंबई, पुणे येथील भांडवलदारी वृत्तपत्रांनी जिल्हा वृत्तपत्रांच्या अस्तित्वालाच आव्हान देऊन प्रत्येक जिल्ह्यात आक्रमण सुरू केले होते. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ‘सत्यवादी’, ‘नवसंदेश’, ‘समाज’, ‘ऐक्य’, तर उत्तर महाराष्ट्रात ‘गावकरी’, ‘देशदूत’, पुण्यात अनंतराव पाटील यांचे ‘विशाल सह्याद्री’, तसेच ‘तरुण भारत’, मराठवाड्यात भालेराव यांचे ‘मराठवाडा’, तर विदर्भात शेवडे यांचे ‘नागपूरपत्रिका’ यासारखी वृत्तपत्रे या मोठ्या भांडवलदारी वृत्तपत्रांच्या आक्रमणापुढे खंबीरपणे उभी न राहिल्यामुळे काळाच्या ओघात काही बंद पडली, तर काही जिल्ह्यापुरतीच सीमित राहिली. मी त्यावेळी वडिलांच्या व त्यांच्या सर्व मित्र मंडळींविरोधात जाऊन जी बंडखोरी केली, तीच ‘पुढारी’ला तारण्यात यशस्वी ठरली. आज मी याची कल्पनाही करू शकत नाही. मी जर धडाडी दाखवली नसती, धडपड केली नसती; तर आज ‘पुढारी’ ज्या उत्तुंग स्थानावर आहे, तिथे कधीच पोहोचला नसता. अर्थातच, फक्त धडपड किंवा धडाडी असून चालत नाही, तर आपल्याला जे साध्य करायचं आहे, त्याचा अभ्यास करायला हवा. सर्वंकष आराखडे तयार करायला हवेत. भविष्यात उभ्या राहणार्‍या आव्हानांचे ठोकताळेही बांधायला हवेत. तरच यश तुमच्यासमोर हात जोडून उभं राहतं.

या सर्व गोष्टींचा विचार करूनच, पूर्ण अभ्यासाअंती मी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आणि केवळ त्यामुळेच मी अवघ्या दोन वर्षांतच कर्जाची परतफेड करून त्यातून रिकामा झालो. प्रत्यक्ष यशवंतराव चव्हाणांनाही माझ्या कर्तबगारीची दाद द्यावी लागली. तुमचा हेतू नेक असेल, द़ृष्टी विशाल असेल, लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची धमक असेल आणि अपार कष्ट उचलण्याची हिंमत असेल, तर अवघड परिस्थितीवर मात करूनही तुम्हाला हमखास यश मिळतंच. मात्र, त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, धाडस आणि बेडर मनोवृत्ती हवीच हवी. आपण जर येणार्‍या प्रत्येक आव्हानाला संधी समजून भिडलो, तरच आपल्या हातून काही तरी भव्यदिव्य घडू शकतं.

जो योग्यवेळी योग्य निर्णय घेत नाही, धारिष्ट्य दाखवीत नाही, त्याला काळ कधीच क्षमा करीत नाही. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ अशी मानसिकता कमालीची घातक असते. अशी मानसिकता आपली विचारशक्ती निष्प्रभ करून टाकते अन् काही करून दाखवण्याची उर्मीही मारून टाकते. माणसाला अक्षरशः अपंग बनवते. ज्याला गरुडझेप घ्यायची आहे, त्यानं ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ किंवा ‘दे हरी पलंगावरी’सारखी सुभाषितं ही आपली घातक शत्रू आहेत, हे लक्षात घेऊन त्यांना मनाच्या गाभार्‍यातून कायमचं हाकलून दिलं पाहिजे आणि पुन्हा ती आपल्या आसपासही फिरकणार नाहीत, याचा बंदोबस्त केला पाहिजे. तरच तुमच्या विचारांची झेप आकाशाला गवसणी घालेल आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा आभाळभर फुलत राहतील.
बराक ओबामा हे 2009 ते 2017 या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्या काळातील त्यांचं एक विधान प्रसिद्ध आहे.
‘In the face of impossible odds, people who love this country can change it.’
खरं तर, हीच वाट मी एकोणीसशे ऐंशीच्या दशकातच चोखाळली होती आणि माझा तो प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे.

पत्रकारितेतील माझी कारकीर्दही 50 वर्षांहूनही अधिक आहे. मी ‘पुढारी’चे नेत्रदीपक असे रौप्य, हीरक, सुवर्ण आणि अमृत महोत्सव पाहिलेले आहेत. त्यांचा केवळ साक्षीदार नव्हे, तर त्यांची धुराही माझ्याच खांद्यावरून मी वाहून नेली आहे. हे भाग्य देशातीलच नव्हे, तर जगातील किती संपादकांना अथवा वृत्तपत्रांच्या मालकांना लाभलं असेल? राजीव गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिग्गज पंतप्रधान मी या कार्यक्रमांना आणले. अर्थातच, हा चमत्कार माझ्यातील विजिगीषुवृत्ती आणि लढाऊ बाण्यामुळेच घडलेला आहे, हे कुणीही मान्य करेल. एकदा ठरवलं की, त्या निश्चयापासून ढळायचं नाही, अजिबात परावृत्त व्हायचं नाही, हे माझं ब्रीद. मग, यश माझ्यापासून दूर जाईलच कसं, हा ठाम विश्वास माझ्या ठायी जन्मजातच होता नि आहे.

त्यासाठी स्वकर्तृत्वावर विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण स्वतःच मानसिकद़ृष्ट्या डळमळीत राहतो, तेव्हा ती आपण मनातल्या मनात पत्करलेली हारच असते. अशावेळी यश आपल्यापासून चार हात दूर पळून जातं. म्हणूनच यशापयशाचा विचार न करता नेहमी सकारात्मक द़ृष्टिकोनातून कार्यरत राहिलं पाहिजे. ‘टाईम इज मनी’ हे तत्त्व लक्षात घेऊन क्षणाक्षणाची किंमत करायला शिकलं पाहिजे. मी आयुष्यभर हेच करीत आलो आहे.

मी वृत्तपत्र व्यवसायावर अमाप प्रेम केलं. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री बिछान्यावर पडेपर्यंत माझ्या डोक्यात वृत्तपत्राचा विचारच गुंजारव घालीत असतो. याउलट वृत्तपत्र व्यवसायातील माझ्या इतर समवयस्कांनी आणि त्यांच्या पुढील पिढ्यांनी कोळशाच्या खाणी घेतल्या. बांधकाम व्यवसायात उडी घेतली. कोणी पतसंस्था काढल्या. अन्य ठिकाणीही गुंतवणूक केली. करीत आहेत. परंतु, मी मात्र वृत्तपत्र व्यवसायाची कास कधीच सोडली नाही. एखादा चित्ता जसा आपल्या सावजावर नजर ठेवून असतो, तशीच मी वृत्तपत्र व्यवसायावरची नजर कधीही ढळू दिली नाही. या व्यवसायाला अक्षरशः वाहून घेतलं.

पूर्वी वृत्तपत्रांचा टाईप फौंड्री हा पाया होता आणि त्यामुळेच भविष्यात कधी टाईप फौंड्री नाहीशी होऊन, त्याची जागा संगणक घेतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु, टाईप फौंड्रीच काय; पण भविष्यात कॉम्प्युटर युगातही झपाट्यानं आणि सातत्यानं होणारे बदल मी पाहिले आहेत. अनुभवले आहेत. त्यानुसार व्यवसायात योग्य ते बदलही करीत आलो आहे. मी विज्ञानाचा विस्फोटही पाहिला आणि त्यात जुनी यंत्रणा नष्ट होतानाही पाहिली. आता तर मोबाईलवरून बातम्या पाठवण्यापर्यंत मजल गेली आहे. एकंदरीत काय, तर असंख्य घडामोडींचा आणि बदलांचा मी साक्षीदार आहे. मी वर म्हटल्याप्रमाणेच बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे आणि टिकून राहायचं असेल, तर तो बदल स्वीकारणे यातच शहाणपण आहे. याचा ऊहापोह मी ‘सारेच पत्रकार’ या माझ्या प्रकरणात घेतला आहे.

माझ्या कारकिर्दीत झालेला ‘पुढारी’चा विकास हा कुणालाही अचंबित करणाराच आहे. ‘पुढारी’ला न्याय देण्याचं काम मी इमाने-इतबारे केलं. वस्तुतः, वृत्तपत्र व्यवसाय हे दुधारी शस्त्र आहे. इथे पावलोपावली सावध राहावं लागतं. डोळ्यात तेल घालून वाटचाल करावी लागते. या माध्यमामध्ये जसे मित्र मिळतात, त्याहून शत्रूंची संख्याही अमाप वाढत असते. याकडे डोळेझाक करून चालत नाही. अनेकदा बघताबघता मित्रही कधी शत्रू होतो, याचा पत्ताच लागत नाही. समजा आपण एखाद्याबद्दलच्या शंभर जरी चांगल्या बातम्या छापल्या आणि प्रसंगोपात एखादी जरी टीकात्मक बातमी छापली, तरी चांगल्या शंभर बातम्यांचा अक्षरशः कचरा होतो. लगेचच ती व्यक्ती आपली विरोधक बनते. शत्रू बनते. प्रत्येकाला फक्त आपला गुणगौरवच हवा असतो. त्यांच्या कार्याचे आम्ही केवळ आणि केवळ कौतुकच करावं, अशी या लोकांची इच्छा असते. थोडक्यात, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालून, वर्तमानपत्रानं केवळ त्यांची भाटगिरी करावी, अशीच त्यांची अपेक्षा असते. समजा वर्तमानपत्रं जर त्यांचा केवळ गुणगौरवच करीत राहिली, तर त्यांच्या धोरणात्मक चुका किंवा त्यांनी केलेला भ्रष्टाचार याच्यावर प्रकाश कुणी टाकायचा?

वृत्तपत्रं ही निर्भीड आणि नि:पक्ष असावीत; नव्हे ती तशी असलीच पाहिजेत, असा आपला आग्रहच असेल, तर मग समाजविघातक प्रवृत्तींवर प्रहार न करून कसं बरं चालेल? वृत्तपत्रांनीच जर मान टाकली, तर समाजस्वास्थ्य कसं बरं अबाधित राहील आणि समाजहित तरी कसं साधलं जाईल? या अनुषंगाने आम्हा पिता-पुत्रामध्ये झालेला संवाद तसा खुमासदार व या क्षेत्रासाठी तरी तसा दुर्मीळच म्हणायला हवा. तिकडे वळण्याअगोदर एक महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे, आबांचा स्वभाव हा नेमस्त होता. त्यांनी कोणावर आक्रमक, जहाल टीका केली नाही. त्यामुळे त्यांना ‘अजातशत्रू’ असे विशेषण लागले. याउलट मी आक्रमक असल्यामुळेच ज्या चुकीच्या गोष्टी होत; त्यावर बातम्या, भाष्य, अग्रलेख प्रखरपणे लिहीत होतो, लिहीत आहे. साहजिकच, माझ्या सडेतोड पत्रकारितेमुळे माझ्याजवळचे लोकदेखील माझे शत्रू होण्यास वेळ लागत नसे. त्यामुळे मी कधीच ‘अजातशत्रू’ होऊ शकलो नाही; पण माझ्या सडेतोेड, निर्भीड पत्रकारितेमुळे मला अनंतशत्रू झाले आहेत, हेही तितकेच खरे आहे! आबांच्या नेमस्तपणाचा एक किस्सा कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रात गाजला होता. त्याचं असं झालं होतं, भाई माधवराव बागल यांनी बिंदू चौकातील एका सभेत आबांवर टीका केली होती. साहजिकच, त्यांना वाटले की, आबा यावर काही तरी सडेतोड लिहितील, आपल्याला लक्ष्य करतील; पण आबांनी त्याची दखलही घेतली नाही. पुढील चार-पाच दिवसांत आपल्याविरुद्ध ‘पुढारी’त अवाक्षरही छापून आले नाही, हे पाहून माधवरावच हतबल झाले व त्यांनी आमच्या घरी येऊन आबांची भेट घेतली. तसंच, नाहक टीका केल्याबद्दल आबांची माफीही मागितली. असे, हे आमचे आबा. हातात वर्तमानपत्र असूनही त्यांनी कधी सौजन्यशीलता सोडली नाही. सौजन्यशीलतेचाही धाक असू शकतो, हे त्यांनी बागल प्रकरणात दाखवून दिले. आबांवरच्या गौरव ग्रंथात अशी किती तरी उदाहरणं पाहायला मिळतील.

या ठिकाणी मी एक गोष्ट नम्रपणे नमूद करतो की, माझी पत्रकारिता आक्रमक, जहाल असली, तरी ती कधी विध्वंसक नव्हती. माझा स्वभाव हा आव्हान स्वीकारणारा, प्रवाहाविरुद्ध पोहणारा असा आहे. मी लहानपणापासून कुस्त्या खेळत होतो, पंचगंगेमध्ये पुराच्या पाण्यात उलटा पोहत जात होतो, तो अवखळपणा पुढेही कायम राहिला असावा. माझ्या आजवरच्या कार्यकाळात मी व्यक्तिगत संबंध व पत्रकारितेतील भूमिका, याची कधीच सरमिसळ होऊ दिली नाही. त्यामुळे माझ्या लेखणीच्या तडाख्यातून माझे तसेच आबांचे मित्रही सुटले नाहीत. हे करताना मी एक व्यवधान मात्र नेहमीच बाळगले. ते म्हणजे एखाद्याकडून चांगली गोष्ट घडली, तर त्याचे तितक्याच सहजतेनं व मनःपूर्वक कौतुकही केले व चूक निदर्शनास आणल्यानंतर बातमीदारीचा बडगाही उगारला! याबाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं उदाहरण खूपच बोलकं आहे. त्यांच्या चुकांवर, चुकीच्या धोरणांवर मी जितक्या तडफेनं बोट ठेवलं, त्याच तत्परतेनं त्यांच्या विधायक कामांचं कौतुकही केलं. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसावेळी ‘पुढारी’इतकी शरद पवारांवर चांगली पुरवणी इतर कोणत्याही वृत्तपत्राने काढली नाही, हे पवारही मान्य करतात. पत्रकारिता हे दुधारी शस्त्र आहे, तारेवरची कसरत आहे, हेही मी इथं मुद्दाम नमूद करतो.

वर्तमानपत्र हे समाजातील सर्वच घटकांशी संबंधित असते. तिथं हे नको, ते नको… हा आपला, तो परका… असं काही चालत नाही अन् माझे वा आबांचे अशा सर्वच स्तरांतील लोकांशी संबंध; पण नेमस्त असलेले आबा मात्र याबाबतीत थोडे संवेदनशील होते. त्यांच्या मनाविरुद्ध एखादी बातमी, भाष्य वा एखादी त्यांना न आवडणारी गोष्ट घडली, तर त्यांना ते आवडत नसे व ते आपल्या संपादकपदाचा राजीनामा माझ्याकडे पाठवून द्यायचे! मग मी माझ्या दालनातून उठून त्यांच्याकडे जायचा व वस्तुस्थिती समजावून सांगायचो. त्यानंतर ते शांत व्हायचे! पत्रकारितेच्या क्षेत्रात पिता-पुत्रामधील अशा गंभीर; पण भावनिक घटना अन्यत्र कुठंच घडल्या नसतील! पत्रकारितेतील हाही माझ्यासाठी एक धडाच होता… कुरुक्षेत्रावर अर्जुनासमोर जसे भाऊबंद होते व तो युद्धाला तयार नव्हता; पण भगवान श्रीकृष्णांनी ‘गीता’ सांगितल्यावर त्याला स्वजनांशीही जीवनात लढावे लागते, हे तत्त्वज्ञान समजले. एक संपादक म्हणून सर्वच पत्रकारांना या आधुनिक युगात सर्व वाईट प्रवृत्तींवर प्रहार करावा लागतो; त्यावेळी हा मित्र, पाहुणा असे धरून चालत नाही.

राज्य असो वा केंद्र सरकार, जनविकास हाच त्यांचा हेतू, उद्दिष्ट आणि लक्ष्य असलं पाहिजे, यात शंका असण्याचं कारण नाही; परंतु सरकारकडून आखली जाणारी अनेक धोरणं किंवा धोरणात्मक निर्णय हे नेहमीच योग्य असतात का? राज्य आणि केंद्रच कशाला, आपल्या जिल्हा परिषदा आणि महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार तरी नीट चालतो का? भ्रष्टाचाराबरोबरच राजकारणाचेही ते अड्डे बनले आहेत. अशावेळी त्यांच्या चुकांवर हल्ला करण्याचं काम तर वृत्तपत्रांनाच करावं लागतं ना? खरं तर, अशावेळी लेखणी तळपली, सपसप कापत सुटली, तर ते संबंधितांना सुधारणेची मिळालेली संधी, असंच समजलं पाहिजे.

तसं पाहायला गेलं, तर सरकार ही कुणी एक व्यक्ती नसते, तर ती एक सामुदायिक जबाबदारी असते. असं असलं, तरी त्यांनाही आपल्या धोरणांवर, निर्णयांवर टीका झालेली आवडत नसते. परंतु, मी अशा अपप्रवृत्तींची कधीच भीडभाड ठेवली नाही. त्यांच्या चांगल्या कार्याला चांगली प्रसिद्धी जरूर दिली; पण प्रसंगी त्यांची कृष्णकृत्येही चव्हाट्यावर आणायला डगमगलो नाही. साहजिकच, त्यातून मला अनेक शत्रू निर्माण झाले, तरीही मी माझ्या भूमिकेपासून तसूभरही ढळलो नाही. दुसर्‍या महायुद्धातील खंदे लढवय्ये विन्स्टन चर्चिल यांचं एक विधान प्रसिद्ध आहे. ते म्हणाले होते,

‘You have enemies? Good. That means you’ve stood up for something sometime in your life.’

…आणि हे तर मी रोजच अनुभवीत असतो. याबाबतीत मला एका राजकीय नेत्याचा आलेला एक गमतीशीर म्हणा किंवा दाहक; एक अनुभव मुद्दामच इथे सांगतो. या नेत्याच्या विरोधात ‘पुढारी’नं एखादी बातमी छापली, तर ते कमालीचे अस्वस्थ होतात; मग लगेच त्यांचा फोन येतो आणि ते आपली नाराजी व्यक्त करतात. आपलं वस्त्रहरण हे कोणालाही तसं असह्यच; पण आपल्या वर्तणुकीमध्ये सुधारणा करा, स्वतःच बदल घडवा. हे मात्र कुणाकडून होत नाही. त्यांच्याच कशाला इतरांच्या बाबतीतही माझा हा प्रदीर्घ अनुभव आहे. तर, पुढे याच नेत्यानं आपल्या वयाची पंचाहत्तरी पार केली. त्यावर मी त्यांचा गौरव करणारी एक अख्खी पुरवणी काढली. गमतीची गोष्ट म्हणजे, त्यांचा एवढा गौरव करूनही त्यांनी साधा एक फोन करून आभार मानण्याचंही सौजन्य दाखवलं नाही! हे लक्षण सुद़ृढतेच खचितच नव्हे.
सामाजिक कार्यकर्ता असो वा राजकीय नेता, यापैकी कुणीही चुकलं तरी त्याची किंमत त्यांना नाही, तर ती समाजालाच चुकवावी लागते. म्हणून अशा लोकांवर वृत्तपत्रांचा अंकुश हा हवाच. तो नसेल तर समाजात आणि देशात बेबंदशाही माजल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच, ही जबाबदारी वृत्तपत्रांवरच येऊन पडते. कारण, वृत्तपत्रं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, जागल्याची भूमिका ही त्यांच्याकडेच असते, असं मानलं जातं आणि ते खरंही आहे. लोकशाहीच्या अन्य तीन स्तंभांमध्ये संसद, प्रशासन (नोकरशाही) व न्यायव्यवस्थेचा समावेश आहे; पण आज आपण काय पाहत आहोत, तर या तीन स्तंभांमध्ये सुसंवाद नाही. संसद श्रेष्ठ की न्यायव्यवस्था, असा वादाचा कलगीतुराही रंगला आहे. अशावेळी चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांची जबाबदारी ही निश्चितच वाढते.

तसं पाहायला गेलं, तर भारतीय पत्रकारिता प्रगल्भ आहे. या व्यवसायात आपल्याकडे ज्ञानी माणसांची मांदियाळी आहे; परंतु त्यांचा नीट उपयोग करून घेतला जात नाही आणि अशी विद्वान माणसं जनतेलाही मानवतातच, असं नाही. याउलट अमेरिकेसारख्या प्रगत देशात जनताच कमालीची जागरूक आहे. तिथं वॉटरगेटसारखी घडलेली घटनाच खर्‍या अर्थानं लोकशाहीची बूज राखणारी आहे. वॉटरगेट प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर तेथील तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. संसदेकडून या प्रकरणाची निकोप चौकशी झाली होती. जागरूक नागरिकांचा या चौकशीला पाठिंबा होता. ते आपले हक्क, कर्तव्याबाबत जसे जागरूक आहेत, तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षांबाबतही दक्ष आहेत. विरोधी पक्षही सजग आहेत आणि सर्वांनीच राष्ट्राला वाहून घेतलेलं आहे. मात्र, आपल्याकडे एखादं प्रकरण चव्हाट्यावर आलं की, दोन-तीन दिवसांतच ते दडपण्याची प्रक्रिया सुरू होते. मीडिया हाऊसेसपासून जिथे जिथे दबाव टाकणं आवश्यक आहे, तिथे तिथे विविध आयुधांचा वापर करून आवाज बंद केला जातो.

महाराष्ट्रात घडलेल्या तेलगी प्रकरणाचंच उदाहरण पाहा… आम्ही तेलगी प्रकरण खोदून काढलं, स्टॅम्प घोटाळ्यात नुकसान झालेल्या शेकडो कोटींच्या महसुलाबाबत जाब विचारला. परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हे सगळं प्रकरण एकट्या तेलगीवरच शेकवून त्यामध्ये सामील असलेले सत्ताधारी महाभाग मात्र नामानिराळेच राहिले. हे असं का होतं? तर जनतेचं अक्षम्य दुर्लक्ष किंवा आपल्याला काय करायचं आहे? त्यांचे ते पाहून घेतील… ही झालेली लोकांची मानसिकता. अशा परिस्थितीत पत्रकारिता कितीही प्रगल्भ असली, तरी ती निष्प्रभच ठरते, ही वृत्तपत्र क्षेत्राची नव्हे; तर लोकशाहीचीच शोकांतिका ठरते, हे इथे दुर्दैवानं नमूद करावंसं वाटतं.

अशा राजकीय आणि सामाजिक कुचंबणेमुळेच भारतातील पत्रकारिता ही कितीही प्रगल्भ असली, तरी लिहिण्यावर मर्यादा येतातच. ही बाब सुद़ृढ लोकशाहीसाठी अत्यंत हानिकारक आहे. या गोष्टी सजग आणि प्रगल्भ माणसासाठी मानसिकद़ृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरत असतात. त्यामुळे प्रवाहाविरुद्ध पोहणे इथे सहज साध्य नाही. हे लक्षात आल्यानं इथली पत्रकारिता अस्वस्थ झालेली दिसते.

राज्यकर्ते जर नालायक निघाले, तर त्याची परिणती केवढ्या मोठ्या अधोगतीत होऊ शकते, याचं ताजं उदाहरण श्रीलंकेनं जगाला घालून दिलं आहे. तिथं तर देशातील सर्वच जनता पेटून उठली. तिनं सामुदायिक उठाव केला. जनता सजग झाली, सावध झाली, तर काय प्रकोप घडू शकतो, हे श्रीलंकेनं दाखवून दिलं. ही जनशक्ती मी आधीपासूनच ओळखून होतो. म्हणूनच मी माझ्या पत्रकारितेचा प्रदीर्घ कालखंड जनतेलाच समर्पित केलेला आहे. काय चूक, काय बरोबर, हे नेहमीच मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांना जागं केलं. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाण आणि भान करून दिलं. अर्थात, एक जागरूक आणि निर्भीड संपादक म्हणून ते माझं आद्य कर्तव्यच होतं. तो माझा धर्म होता आणि तो मी मनोभावे पाळला. आजही पाळतो आहे.
क्रांतीचा जयजयकार करताना कवी कुसुमाग्रज म्हणाले होते,

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती,
होउनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती…

पत्रकारितेचे जोखड खांद्यावर घेऊन, समाजसेवेचा वसा काखोटीला मारलेला मी एक योद्धा. मी हातात आलेल्या निखार्‍यांची कधी तमा बाळगली नाही. कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे सर्व वाईट प्रवृत्तींवर टीका करून मी माझ्याच हाताने पदोपदी निखारे पसरत होतो, याची मला पूर्ण जाणीव होती; पण त्याची कधीही पर्वा न करता या पत्रकारितेच्या ध्येयासाठी मी आयुष्यभर या पथावर बेहोश होऊन धावतो आहे, हे सत्य आहे. त्या निखार्‍यांतूनही पेटवलेली समाजसेवेची ज्योत मी सतत तेवत ठेवली. मुळात नुसतं आव्हान स्वीकारायचं नाही, तर ते थेट अंगावरच घ्यायचं, हा माझा स्वभावच आहे. जातीचा शिकारी असल्यामुळे सावज अंगावर घेऊन वार टाकण्यातलं थ्रील मला जात्याच आवडतं. पत्रकारितेत आणि समाजकारणातही त्यानुसारच माझी लढत सुरू असते.

Back to top button