आरोग्‍य : कफ सिरप आणि आपण | पुढारी

आरोग्‍य : कफ सिरप आणि आपण

मेडन फार्मास्युटिकल्सच्या कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर औषध व्यवहाराविषयी चर्चा सुरू आहे. यापूर्वीदेखील अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. भारतात औषधनिर्मितीबाबतचे निकष आणि कायदे कठोर असले, तरी ते केवळ कागदावरच आहेत की काय? अशी शंका येते. औषधातील विविध घटकांचा नेमक्या प्रमाणातील वापर, त्या घटकांची गुणवत्ता यावर नियंत्रण कोण करणार?

कोरोनाचे जनमानसावरील परिणाम अद्याप कायम आहेत. त्यातला एक परिणाम म्हणजे आरोग्याबद्दलची अतिजागरूकता. जागरूक राहून आरोग्याची काळजी घेणे, हा त्यातला चांगला भाग आणि आपल्याला काही होऊ लागले, तर त्याबद्दलची सर्वच्या सर्व माहिती गुगलवर शोधून स्वतःच औषधोपचार घेेणे हा ‘सेल्फ मेडिकेशन’चा धोकादायक भाग. यातील एक औषध म्हणजे कफ सिरप – खोकल्याचे औषध. सप्टेंबर महिन्यात पश्चिम आफ्रिकेतील गाम्बिया या छोट्याशा देशातील पाच वर्षांखालील 66 मुलांचा मृत्यू, कफ सिरप प्यायल्यामुळे झाला असल्याचे समोर आले. हे कफ सिरप हरियाणा येथील मेडन फार्मास्युटिकल्स नावाच्या भारतीय कंपनीने बनविलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या कफ सिरपस्वर तातडीने बंदी घालून, तसा अलर्ट जारी केला आहे आणि या औषध कंपनीची चौकशी सुरू केली आहे.

मेडन फार्मा तयार करत असलेल्या प्रोमेथॅझिन ओरल सोल्युशन, कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप या चार कफ सिरपचा वापर थांबवण्याच्या सूचना ‘डब्ल्यूएचओ’ने केल्या आहेत. या कारवाईनंतर संबंधित औषधांबद्दलची संकेतस्थळावरील माहिती कंपनीने नाहीशी केली आहे.

या चारही प्रकारच्या कफ सिरपमध्ये डायईथिलीन ग्लायकॉल – DEG – (Diethylene Glycol) आणि इथिलीन ग्लायकॉल (Ethylene Glycol) यांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. आतापर्यंत हे चारही कफ सिरप केवळ गाम्बियातच आढळून आले असले, तरी इतर देशांतही यांचा वापर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाम्बियातील ही 66 मुले कफ सिरप घेतल्यानंतर 3 ते 5 दिवसांतच आजारी पडली. त्यानंतर ती मृत्युमुखी पडली. डायईथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे कफ सिरपमधील अधिकचे असलेले प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक असते.

खरे तर, डायईथिलीन ग्लायकॉल (DEG) हे इथिलीन ग्लायकॉल (MEG) आणि ट्रायईथिलीन ग्लायकॉल तयार करत असताना दुय्यम उत्पादन (co-product) म्हणून तयार होते. उद्योग-व्यवसायामध्ये डायईथीलिन ग्लायकॉलला, इथिलिन ग्लायकॉलइतकी मागणी असत नाही. कारण, त्याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. त्यामुळे DEG हे पॉलिस्टर, पॉलियुरेथेन, रेझिन्स, रंग-उत्पादने, ब्रेक ऑईल्स, लुब्रिकंटस् अशा अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये वापरले जाते; पण खाण्यासाठी याचा वापर होत नाही. औषध म्हणून वापरण्यावर अनेक देशांत यावर बंदी आहे; पण दुर्दैवाने ती बंदी भारतात नाही. शरीराच्या वजनानुसार प्रतिकिलो 0.14 मिलिग्रॅम इतक्या प्रमाणातच हे औषध एखादी व्यक्ती घेऊ शकते, असे निर्देश आहेत. हेच प्रमाण जेव्हा प्रतिकिलो एक ग्रॅम किंवा एक मि.लि. इतके घेतले जाते, तेव्हा ते जीवघेणे ठरते.

पहिल्या टप्प्यात मळमळणे, उलटी होणे, पोट दुखणे आणि जुलाब अशा तक्रारी उद्भवतात. काही रुग्णांमध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होतो. वर्तणुकीतील बदल, मज्जासंस्था शिथिल होणे आणि शुद्ध हरपणे, असे दुष्परिणाम दिसतात. दुसर्‍या टप्प्यात म्हणजे साधारणत: तीन दिवसांनंतर मूत्रपिंड निकामे होऊ लागते आणि मग हृदय, स्वादुपिंड यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शरीरातील क्षारांचे प्रमाण बिघडून जाते.

अखेरच्या टप्प्यात म्हणजे, पाच ते दहा दिवसांच्या कालावधीनंतर मेंदूवरील दुष्परिणाम वाढतात. शरीरातील सर्व स्नायू शिथिल होतात आणि रुग्णाचा मृत्यू होतो.

DEG हे रसायन गंधहीन असते; पण चवीला एकदम गोड असते. या एका कारणासाठी खोकल्याचे औषध गोड व्हावे, या हेतूने आरोग्यासाठी असलेले कायदेशीर नियम पायदळी तुडवून हा घटक मोठ्या मात्रेमध्ये वापरला जातो. लहान मुलांना वारंवार सर्दी आणि खोकला येत असतो. भारतासारख्या देशात असे औषध डॉक्टरांना न सांगता मेडिकल स्टोअरमधून खरेदी केले जाते. खोकल्याचे औषध अधिक गोड केले, तर लहान मुले कोणतीही खळखळ न करता ते घेतात. पालकही त्यामुळे सुखावतात. या औषधांमध्ये गुंगी असल्यामुळे मुले शांत झोपी जातात. या सर्व कारणांमुळे असे औषध मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. डॉक्टरांनी जरी लिहून दिले नाही, तरी ‘सेल्फ मेडिकेशन’ म्हणून ते वापरले जाते. औषधाचा खप प्रचंड वाढतो. भारतासारख्या देशामध्ये आज औषधांची बाजारपेठ मोठी झाली आहे. म्हणजे मोठा बाजारच झाला आहे आणि दुर्दैवाने, नफा हेच या बाजाराचे उद्दिष्ट आहे.

यानिमित्ताने एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी ती अशी की, जर तुम्ही खोकल्याचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे औषध ‘बरे वाटते’ या सबबीखाली डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांनी दिलेल्या कालावधीनंतरसुद्धा जर वापरत असाल; तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका. खोकल्याच्या बर्‍याचशा औषधांमध्ये गुंगी येणारी द्रव्ये असतात. ही द्रव्ये अत्यंत कमी मात्रेत असली, तरी तुम्ही ते औषध शांत झोप यावी म्हणून घेत असाल; तर तुम्हाला त्याचे व्यसन लागू शकते. अशा औषधाचा दुष्परिणाम मेंदूवर, मूत्रपिंडावर आणि एकंदर शरीरावर होऊ शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे.

मेडन फार्मास्युटिकल्सच्या कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाला म्हणून औषध व्यवहारातील हा गैरप्रकार सर्वांसमोर आला. प्रश्न आहे तो, अशा प्रकारांना आळा बसणार का? याचा. यापूर्वी भारतातदेखील अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. केरळमधील न्यायालयाने मेडन या फार्मा कंपनीला एका प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा केली होती, तरीही अशी फार्मा कंपनी फॉर्मात कशी चालते? याचा शोध घ्यायला हवा. 1970 च्या दशकात भारतात औषधाची बाजारपेठ 650 कोटी रुपयांची होती, ती आता दीड हजार अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. येत्या काही वर्षांत ही बाजारपेठ गगनाला भिडेल; पण मग गुणवत्तेचे काय? सामान्य माणसाच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न पडतोे.

आणि… एकंदर औषध व्यवहाराबद्दल बोलायचे झाले, तर जगभरातील प्रमाणित केलेली औषधे, जगभरात बंदी असलेली औषधे, भारतातील त्यांचा वापर (जगभरात बंदी असलेली अनेक औषध-उत्पादने आपल्याकडे राजरोसपणे वापरली जातात.), औषधनिर्मितीच्या प्रक्रियेवर असणारे सरकारी यंत्रणेचे नियंत्रण, औषधनिर्मितीपासून औषध विक्रीपर्यंत असलेले सर्व कायदेशीर नियम, त्यातल्या त्रुटी, यात असलेली नफेबाजी, या सर्वांवर कुठे तरी कायदेशीर नियंत्रण आणि कमाल मर्यादा असायला हवी, तरच सामान्य माणसाचे जगणे सुसह्य होईल.

डॉ. अनिल मडके

Back to top button