क्रीडा : तुफान एक्स्प्रेसची निवृत्ती | पुढारी

क्रीडा : तुफान एक्स्प्रेसची निवृत्ती

मिलिंद ढमढेरे

इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट संघातील ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने अशीच कामगिरी करीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये हुकूमत गाजवली आहे. तिच्या निवृत्तीच्या निमित्ताने…

खेळाडूच्या जीवनात निवृत्तीचा क्षण कधी ना कधीतरी येत असतो. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच निवृत्त होणे, हा नेहमीच आदर्श निर्णय मानला जातो. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेली झुलन (Jhulan Goswami) हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात लॉर्ड्स मैदानावर होणारा सामना हा तिच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. तिची सहकारी मिताली राज हिने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

भारतीय महिला क्रिकेटसाठी या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंची उणीव निश्चितपणे जाणवणार आहे. तथापि युवा खेळाडूंना संधी देण्यासाठीच या दोन्ही खेळाडूंनी योग्य वेळीच आपल्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबतच्या मर्यादा ओळखल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. युवा खेळाडूंना प्रेरणा मिळावी अशीच यांची क्रिकेट कारकीर्द झाली आहे, त्यामुळेच की काय, या दोन्ही खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत.

लहानपणी मुलांबरोबर एखादी छोटी मुलगी क्रिकेट खेळायला आली, तर तिची टिंगलटवाळी केली गेली. ‘क्रिकेट हे तुझे काम नाही. तू घरी जाऊन तुझ्या आईला घरकामात मदत कर किंवा सागरगोटे खेळत बस.’ असे सल्ले तिला अनेक वेळा ऐकायला मिळत. डायना एडलजी, शांता रंगास्वामी, शुभांगी कुलकर्णी इत्यादी अनेक खेळाडूंनी महिलादेखील चांगल्या क्रिकेटपटू म्हणून नाव कमावू शकतात, हे दाखवून दिले तरीही अनेक वेळा क्रिकेट खेळण्यावरून मुलींची उपेक्षा आणि अवहेलनाच केली जाते.

झुलन हीदेखील त्यास अपवाद नाही. तथापि लहानपणापासूनच कमालीची जिद्दी असलेल्या झुलन हिने क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी कमाई करण्याचे खणखणीत नाणे असले, तरीही महिलांसाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या खूपच मर्यादित असते. हे लक्षात घेतले, तर स्थानिक सामन्यांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त बळी तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये साडेतीनशेहून जास्त बळी घेण्याची तिची कामगिरी खरोखरीच अतुलनीय आहे.

क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणापासून अनेक लहान मुलांमुलींना आपणही क्रिकेटपटू व्हावे, असे वाटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. झुलनबाबत असेच पाहावयास मिळाले. सन 1992 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिला आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहून, आपणही मोठेपणी क्रिकेटपटू व्हावे, अशी ती स्वप्ने पाहू लागली. योगायोगाने तिला 1997 मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे वेळी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि खर्‍या अर्थाने तिच्या स्वप्नांना बळ मिळाले.

या सामन्यातील श्रेष्ठ खेळाडूंच्या कामगिरीचा तिच्यावर खूपच सकारात्मक प्रभाव पडला. नाडिया जिल्ह्यामधील ‘चकदाहा’ या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली झुलन (Jhulan Goswami) लहानपणी फुटबॉलबरोबरच अन्य मुलांसमवेत अधूनमधून क्रिकेटही खेळत असे. ती टाकत असलेल्या हळू चेंडूवर प्रतिस्पर्धी फलंदाज चौकार व षटकारांची आतषबाजी करीत असत, त्यामुळे इतर मुले तिला गोलंदाजी देणे बंद करीत असत. अनेक वेळा तिला मैदानाबाहेर बसण्याचा सल्ला दिला जात असे.

एखादा खेळाडू आला नाही, तर तिला संधी मिळत असे. पण, तेव्हादेखील शेवटच्या फळीतच फलंदाजी करावी लागत असे आणि तिला चेंडू टाकण्याची संधी दिली जात नसे. झुलन हिने या टीका निमूटपणे सहन केल्या कारण केव्हातरी आपली कामगिरी चांगली होईल आणि आपले मित्र-मैत्रिणी कौतुक करतील, असे तिला वाटत असे. त्यामुळे तिने धीर सोडला नाही. घराजवळ असलेल्या मोकळ्या पटांगणात ती वेगाने चेंडू टाकण्याचाही सराव करीत असे.

वयाच्या पंधराव्या वर्षी तिने क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिच्या गावात अव्वल दर्जाच्या प्रशिक्षणाची सुविधा नव्हती. चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण घ्यायचे असेल, तर दररोज कोलकाता शहर गाठण्याखेरीज पर्याय नाही, हे तिने ओळखले होते. तिच्या गावापासून कोलकाता हे ऐंशी किलोमीटर अंतरावर होते. घरच्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत तिने हा सराव सुरू केला. सरावासाठी तिला दररोज पहाटे चार वाजताच रेल्वेगाडी पकडावी लागत असे. काही वेळेला ही गाडी चुकली किंवा या गाडीला विलंब झाला, तर आपोआपच सरावाच्या ठिकाणी पोहोचण्यास तिला विलंब होत असे. उशिरा झाल्यानंतर प्रशिक्षकांकडून होणार्‍या शिक्षाही तिला सहन करावी लागत असे. संघर्ष केल्याशिवाय चांगली फळे मिळत नाहीत, हे तिला पक्के ठाऊक होते.

उशिरा पोहोचल्यामुळे बुडलेले व्यायाम प्रकार किंवा सराव ती जास्त वेळ थांबून पूर्ण करीत असे. साहजिकच घरी पोहोचण्यासही तिला विलंब होत असे. तिची ही धावपळ आणि दगदग पाहून क्रिकेट सोडण्याचा सल्ला पालकांकडून दिला जात असे. हा वेळ वाया घालवण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दिले तर चांगल्या प्रकाराची नोकरी मिळेल, असाही उपदेश तिला घरच्यांकडून मिळत असे. मात्र, क्रिकेटमध्येच करिअर करण्याबाबत तिचा द़ृढनिश्चय होता. त्यामुळे तिने घरच्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्षच केले.

स्थानिक स्तरावरील सामन्यांमध्ये सतत तीन वर्षे तिने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे, तिला बंगाल संघाकडून व त्यानंतर पूर्व विभागाकडून खेळण्याची संधी मिळाली. सन 2000 मध्ये भारतीय संघातील काही खेळाडूंचा समावेश असलेल्या, एअर इंडियाविरुद्धच्या सामन्यात तिने दहा षटकांमध्ये केवळ 13 धावांमध्ये तीन गडी बाद केले. या कामगिरीमुळे तिला काही दिवसांनंतर एअर इंडियाकडूनच खेळण्यासाठी विचारणा करण्यात आली. याच क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत होती. या सोनेरी संधीचा फायदा घेत तिने सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि तेथूनच तिच्या भावी कारकिर्दीची पायाभरणी झाली. त्यानंतर तिने मागे पाहिलेच नाही आणि भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले. (Jhulan Goswami)

सन 2002 हे इंग्लंडविरुद्ध कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांद्वारे आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये पदार्पण करण्याची संधी तिला मिळाली. इंग्लंडविरुद्ध 2006 मध्ये झालेल्या टी-20 सामन्याद्वारे तिच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. 2006-07 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत तिच्या प्रभावी कामगिरीमुळेच भारतीय महिला संघाने ऐतिहासिक मालिका विजय साकारला. या मालिकेतील पहिल्या कसोटीत ‘नाईट वॉचमन’ म्हणून भूमिका पार पाडताना तिने अर्धशतक टोलावले. पाठोपाठ दुसर्‍या कसोटीत दोन्ही डावांत प्रत्येकी पाच गडी बाद करताना सामन्यात दहा विकेट्स घेण्याची किमयाही करीत आपली निवड सार्थ ठरविली.

एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2011 मध्ये केवळ 31 धावांमध्ये सहा बळी, ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 धावांमध्ये पाच गडी करीत टी-20 मध्येही प्रभावी यश मिळू शकते, हे तिने दाखवून दिले. 2008 ते 2011 या कालावधीत तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय बारा सामने, तर टी-20 चे आठ सामने जिंकले आहेत.

महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनशे बळी घेणारी जगातील पहिली गोलंदाज होण्याचा मान तिला मिळाला. ताशी 120 किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला गोलंदाजांमध्ये तिला सर्वोच्च स्थान आहे. सन 2007 मध्ये आयसीसी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू, तर 2011 मध्ये एम. ए. चिदंबरम स्मृती सर्वोत्तम महिला खेळाडू या पारितोषिकाने तिला गौरविण्यात आले आहे. ‘पद्मश्री’ हा सन्मान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. याखेरीज तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले असले तरी चाहत्यांचे प्रेम हाच आपल्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार असतो, असे ती सांगत असते.

द्रुतगती गोलंदाजीतील श्रेष्ठ गोलंदाज कपिल देव, ग्लेन मॅकग्रा, जवागल श्रीनाथ यांच्यासारख्या गोलंदाजांच्या शैलीचा बारकाईने अभ्यास करीत त्यांच्यासारखी अचूकता आणण्यासाठी तिने नेहमीच प्रयत्न केला आहे. चेन्नई येथील अकादमीत डेनिस लिली या ऑस्ट्रेलियाच्या श्रेष्ठ द्रुतगती गोलंदाजांकडूनही द्रुतगती गोलंदाजीचे बाळकडू तिला मिळाले. आपल्या गोलंदाजीत भेदकता, अचूकता, योग्य दिशा ठेवून चेंडू टाकणे आदी विविधता आणण्यासाठी तिने नेहमीच एकाग्रतेने सराव केला आहे.

सतत शिकण्याच्या वृत्तीमुळे आपले सहकारी किंवा कधीकधी प्रतिस्पर्धी गोलंदाजांकडून काही महत्त्वपूर्ण टीपा ती घेत असते. तसेच संघांचे वेगवेगळे प्रशिक्षक यांच्याकडून जे काही मौलिक मार्गदर्शन केले जाईल, त्यानुसार आपल्या शैलीत योग्य तो बदल करीत आपल्या गोलंदाजीत अधिकाधिक परिपक्वता येण्यासाठी ती प्रयत्नशील असते. वैयक्तिक कामगिरीपेक्षा आपल्या संघास कसा विजय मिळवून देता येईल, हेच तिच्यासाठी महत्त्वाचे असते. वयाच्या 39 व्या वर्षीही तिचे अष्टपैलू कौशल्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायीच आहे.

Back to top button