Indian women’s team : गरज नव्या टीम इंडियाची | पुढारी

Indian women's team : गरज नव्या टीम इंडियाची

भारतीय महिला क्रिकेटला (Indian women’s team) संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्‍या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरद़ृष्टीचा.

भारतीय महिला क्रिकेट (Indian women’s team) संघाचा न्यूझीलंडमधील विश्वचषकाचा प्रवास गेल्या रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत हरल्याने खंडित झाला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा जागतिक पटलावरचा प्रवास बघितला, तर प्रथम नजरेत भरणारी कामगिरी होती ती 2005 च्या विश्वचषकातली. तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामना हरल्याने आपण उपविजेते ठरलो. पण तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेट संघाला आपण गंभीरतेने घ्यायला लागलो. याचीच पुनरावृत्ती गेल्या म्हणजे 2017 च्या विश्वचषकात झाली.

लॉर्ड्सवरला अंतिम सामना आपण इंग्लंडकडून हरलो, तो मुख्यतः सामन्यात खेळण्याचे दडपण घेतल्याने. पण या दोन उपविजेतेपणामुळे भारतीय महिला संघ विश्वविजेता होण्याची स्वप्ने आपण बघायला लागलो. या स्वप्नांना तडा गेला तो शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने.

उपांत्य फेरी गाठायच्या आधीच आपण स्पर्धेतून बाहेर फेकलो गेल्याचे दु:ख, निराशा आहेच; पण भावनांना दूर ठेवून आपण जर डोळसपणे आपल्या कामगिरीकडे बघितले, तर भारतीय संघात, डावपेचात आणि एकूणच भारतीय महिला क्रिकेटच्या अंगणात बर्‍याच उणिवा सहजपणे दिसून येतात. विश्वचषक जिंकायच्या जवळ जाणे आणि विश्वचषक जिंकणे, यातले अंतर या उणिवा दूर केल्याशिवाय कमी करता येणार नाहीत.

या पराभवाची कारणमीमांसा करायची झाली, तर सुरुवात आपल्याला विश्वचषकाच्या संघ निवडीपासून करावी लागेल. जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम राऊत आणि शिखा पांडे यांसारख्या अत्यंत गुणवान खेळाडूंना संघात स्थान न मिळणे अनाकलनीय होते. पूनम राऊतने तर 2017 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 86 धावांची खेळी करत भारताला जवळजवळ एकहाती विश्वचषक जिंकून दिला होता.

जेमिमा रॉड्रिग्जमध्ये सातत्याचा अभाव असल्याचा एक आरोप केला जातो. पण इंग्लंडच्या 100 आणि ऑस्ट्रेलियन बिग बॅशलीगमधला तिचा तडाखेबंद खेळ तिची गुणवत्ता दाखवायला पुरेसा होता. शिखा पांडेची गोलंदाजी ही जमेची बाब ठरली असती; पण भारतीय निवड समितीने अनुभव आणि नवोदित यांचा मिलाफ करण्याच्या प्रयत्नात संघ निवडण्यात गडबड केली, असेच म्हणावे लागेल.

कर्णधार मिथाली राज आणि झुलन गोस्वामी या महिला क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडू आहेत, पण दोघी आज अडतीस वर्षांच्या आहेत. भारतीय संघ आणि इतर संघ यांचा विचार केला, तर विश्वचषकाची संघ निवड, सामन्यासाठी संघात केलेले बदल, गोलंदाजीत वैविध्यतेची कमी आणि तंदुरुस्ती या चार प्रमुख घटकांवर भारतीय संघ फिका पडला.

भारताने आपल्या फलंदाजीच्या फळीत या विश्वचषकादरम्यान वारंवार बदल केले. पहिल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शफाली शर्मा अपयशी ठरल्यावर पुढच्या तीन लढतींसाठी तिला वगळण्यात आले. यामुळे दीप्ती शर्मा आणि मिताली राज यांना आपल्या फलंदाजीतील क्रम वारंवार बदलावे लागले. जेव्हा फलंदाजीचा क्रम अस्थिर असतो, तेव्हा तो संघाचा असमतोलपणा सहज दाखवून देतो. यामुळे फलंदाजीची जबाबदारी ही प्रामुख्याने स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यावरच होती.

कर्णधार मिताली राजने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धावा केल्या. पण तिचे वय आता रनिंग बिटवीन द विकेट्सच्या आड येत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. वास्तविकत:, बीसीसीआयने या विश्वचषकाच्या आधी भारतीय महिला संघाचे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौरे आयोजित केले होते. जेणेकरून कोरोना काळात सामन्यांचा सराव न मिळाल्याची उणीव भरून काढता येईल. या दौर्‍यानंतर फलंदाजीचा क्रम आणि गोलंदाजीचे पर्याय हे पक्के ठरायला हवे होते. (Indian women’s team)

पूनम यादवसारख्या संघातील एकमेव लेगस्पिनरला आपण फक्त एका सामन्यात खेळवले. गोलंदाजीची प्रमुख मदार आपण निवृत्तीकडे झुकलेल्या झुलन गोस्वामींवर ठेवली होती. झुलन गोस्वामींची कारकिर्द जरी देदीप्यमान असली, तरी उतारवयात संघात असलेल्या कपिल देवचे जे आपण बघितले, तेच आपण झुलन गोस्वामीबाबत बघत आहोत. तिच्या गोलंदाजीतील वेग, धार कमी झाल्याचे स्पष्ट दिसते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रमुख सामन्यात तर ती पूर्णपणे निष्प्रभ ठरली. भारताच्या गोलंदाजीतीत उठावदार आणि सातत्याने कामगिरी कुणी केली असेल, तर ती राजेश्वरी गायकवाड, स्नेहा राणा आणि पूजा वस्तरकर यांनी. न्यूझीलंडमध्ये जेव्हा आपल्याला जलदगती गोलंदाजी आणि मुख्यत्वे स्विंग करू शकणार्‍या गोलंदाजांची गरज असताना उत्तम आणि फसवा इन स्विंग गोलंदाजी करू शकणार्‍या शिखा पांडेची उणीव नक्कीच जाणवली. या गोलंदाजीतील वैविध्यतेच्या अभावाने आपण ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेच्या विरुद्ध पावणे तीनशे धावा करूनही प्रतिस्पर्ध्यांना रोखू शकलो नाही. भारताच्या या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांत आपल्याला कमीत कमी पंचवीस धावा कमी पडल्या. याचे कारण स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यासारखा स्ट्राईक रेट ठेवत धावा करू शकणार्‍या खेळाडू आपल्याकडे नव्हत्या.

थोडक्यात सांगायचे, तर भारतीय महिला क्रिकेट संघाला आता मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या पलीकडे बघायची वेळ आली आहे. या दोघींनी भारतीय महिला क्रिकेटला एका उंचीवर नेऊन ठेवले, पण बहुतेक या विश्वचषकातील पराभवानंतर या दोघी पायउतार होतील, असा अंदाज आहे. आपल्या संघात दोन सिनिअर खेळाडूंचे दोन गट होते आणि त्यामुळेही काही धुसफुस होती, अशा बातम्या होत्या. याबद्दल अधिकृत कधीच समजणार नाही, पण मिताली राजच्या संभाव्य निवृत्तीनंतर कदाचित वातावरण निवळेल.

भारतीय संघाचा सर्व SEN – म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी पराभव केला. क्रिकेटच्या दुनियेत मग ते पुरुषांचे असो वा महिलांचे, जोपर्यंत तुम्ही SEN – सेनेला धूळ चरत नाही तोपर्यंत तुम्ही जागतिक अजिंक्यपदाचे दावेदार बनू शकत नाही, हे सत्य आहे. इथे तर आपण हे चारही सामने पराभूत झालो. या SEN – गटाला महत्त्व आहे, ते त्यांच्या व्यावसायिकतेमुळे आणि मुख्यतःफिटनेसमुळे. ऑस्ट्रेलियाचे उदाहरण घेतले, तर पहिली फलंदाजी असली तर ते तीनशे धावांचे उद्दिष्ट अगदी लीलया पार करू शकतात कारण त्यांच्या खेळाडूंकडे असलेली तंदुरुस्ती.

उपांत्य सामन्यात तर त्यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध 45 षटकातच 305 धावा ठोकल्या. याउलट भारतीय संघाची एक वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना सोडला, तर दमछाक होताना दिसली. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या जोडीला मधल्या फळीत शेवटच्या षटकात धावांचा वेग वाढवू शकणारी पिंचहिटर आपल्याकडे नाही. ढिसाळ क्षेत्ररक्षण हेही तंदुरुस्तीशीच निगडित आहे.

या विश्वचषकातील पराभवाच्या निमित्ताने भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे, हे तर नक्की! पण, ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी कुचबिहार ते रणजी करंडकासारख्या नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. आपल्या देशात गुणवत्तेला तोटा नक्कीच नाही! पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्‍या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि त्यासाठी लागणार्‍या दूरद़ृष्टीचा. आज आपण उपलब्ध असलेल्या डेटा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून घेऊ शकतो.

महिला क्रिकेटमध्येही आज आपण छोट्या छोट्या गावांतून आलेल्या खेळाडू बघतो. त्यांच्या जिद्दीने त्यांना खडतर प्रवास करूनच इथपर्यंत मजल मारता आली. महिला क्रिकेटरचा प्रवास हा स्थानिक असोसिएशनचा कॅम्प, राज्य, विभाग, अ संघ आणि भारतीय संघ या मार्गातून होत असला; तरी यात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा मर्यादित आहेत, त्याचप्रमाणे काही ठिकाणी तर नोंदणी करायला कॅम्पही नाही.

बीसीसीआय भारतीय महिला क्रिकेटबाबत गंभीर असल्याचे गेल्या काही वर्षांतील प्रयत्नातून दिसले आहे. पण जोपर्यंत महिला क्रिकेटची आर्थिक उलाढाल वाढत नाही, तोपर्यंत बीसीसीआय पूर्ण गंभीरतेने याकडे बघणार नाही. नुकतीच बीसीसीआयने पुढील वर्षीपासून महिला क्रिकेटसाठी आयपीएलची घोषणा केली आहे. आर्थिक उलाढालीचा हा श्रीगणेशा असायला हरकत नाही. आज महिला क्रिकेट संघाला प्रायोजक आहे, खेळाडूंचे श्रेणीनुसार करार आहेत; पण पुरुषांच्या क्रिकेटच्या मानाने आर्थिक उलाढाल नगण्य आहे. जोपर्यंत महिला क्रिकेटमध्ये पैसा येणार नाही तोपर्यंत महिला क्रिकेटचा सर्वांगीण विकास हा खुंटलेलाच राहील.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटचा आढावा घेतला, तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड दरवर्षी 16-18 खेळाडूंची निवड करून त्यांच्याशी करार करते. त्यांना एक वर्षाच्या त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत कमीत कमी तीन कॅम्प त्यांच्यासाठी आयोजित केलेले असतात आणि याव्यतिरिक्त त्या खेळाडूंना त्यांच्या प्रातांत विशेष प्रशिक्षणाची सोय केली जाते. मुख्य प्रशिक्षक हा त्या त्या प्रांतातील प्रशिक्षकाशी चर्चा करून प्रत्येक खेळाडूचा प्रशिक्षण कार्यक्रम ठरवतो. (Indian women’s team)

मुख्य प्रशिक्षक हा वेळोवेळी स्थानिक प्रशिक्षकाकडून या खेळडूच्या प्रगतीचा आढावा घेत असतो. हा आढावा कधी प्रत्यक्ष भेटीतून, कधी प्रशिक्षण नोंदवहीतून, तर कधी दूरचित्रप्रणालीमार्फत होत असतो. इथूनच पुढे या खेळडूंची अ संघात निवड होते आणि ते राष्ट्रीय संघात येतात. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंचा प्रवास बघितला, तर वरकरणी टप्पे तेच दिसत असले तरी गुणवत्ता हेरणे, प्रशिक्षण पद्धती आणि खेळाडूंचा सर्वांगीण विकास यातला फरक दिसून येतो.

भारतीय महिला क्रिकेट संघ आज नक्कीच नावारूपाला आलेला आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी – 20 मध्ये आयसीसी क्रमवारीत आपण चौथ्या स्थानावर आहोत. आयसीसीच्या खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजीत मिताली राज, स्मृती मानधना, गोलंदाजीत झुलन गोस्वामी; तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दीप्ती शर्मा आणि झुलन गोस्वामी या पहिल्या दहा स्थानात आहेत. पण यातून हेच अधोरेखित होते ते भारतीय संघाला आता मिताली राज आणि झुलन गोस्वामींच्या नंतरचा भारतीय संघ बांधायला विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विश्वविजेतेपदाला गवसणी घालायची असेल, तर योजनाबद्ध कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही, हे आपण ऑस्ट्रेलियाकडून शिकायला हवे.

निमिष वा. पाटगावकर

Back to top button