सिंहायन आत्‍मचरित्र : उमदे नेतृत्व हरपले | पुढारी

सिंहायन आत्‍मचरित्र : उमदे नेतृत्व हरपले

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी  

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव
मुख्य संपादक, दैनिक पुढारी 

‘Some men change their party for the sake of their principles; others there principles for the sake at there party.’

विन्स्टन चर्चिल यांचं हे विधान सार्वकालिक आहे, यात शंका नाही. राजकारणाचा राज्यकर्त्यांचा आणि राजकीय पक्षांचा सरड्यासारखा पालटणारा हा रंग, 1989 नंतर सार्‍या देशानं पाहिला. हा डोंबार्‍याचा खेळ पाहून सर्वसामान्य जनतेची भरपूर करमणूक झाली, तर देशाची चिंता वाहणार्‍या विचारवंतांना अतीव वेदना झाल्या.

एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाचा खेळखंडोबा चालू असतानाच मी मात्र स्थानिक पातळीवर महापुरासारख्या अस्मानी संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यात गुंतून पडलो होतो. तसेच जोतिबा तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी जमवण्यापासून ते गॅझेटियरचा लढा देण्यासारख्या संवेदनाशील घटनांमध्येही आघाडीवर होतो.

तरीही माझं राजधानी दिल्लीमध्ये जाणं-येणं चालूच होतं. कारण तो माझ्या पत्रकारितेमधलाच एक भाग होता. दिल्लीचा कानोसा घेतल्याशिवाय आपल्याला अपडेट राहाता येत नाही, याची मला कल्पना होती. म्हणूनच मी आय.एन.एस. म्हणजेच इंडियन न्यूजपेपर सोसायटीचा पहिल्यापासूनच सदस्य होतो. तसेच दिल्ली प्रेस क्लबचंही मी सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. सेंट्रल हॉललाही माझी भेट ठरलेलीच असे. कारण संसदेचा सेंट्रल हॉल हा देशातील राजकीय घडामोडी समजून घेण्याचं एक महत्त्वाचं केंद्र होतं आणि आजही आहे.
अनेक नेते, आमदार-खासदार आणि मंत्र्यांची सेंट्रल हॉलमध्ये ये-जा सुरू असते. चहापान करता करता त्यांच्या गप्पागोष्टींची मैफील रंगत असते. तिथं गेल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक खासदार तसेच शंकरराव चव्हाण, बी. शंकरानंद, जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते यांच्यासारखे मंत्री या सर्वांशी माझ्या गप्पागोष्टी होत असत. या ठिकाणी त्यांना इतर पक्षांचे खासदारही येऊन भेटत असत. तसेच सर्वच पक्षांच्या महिला खासदारही इथं एकत्र बसून नर्मविनोद करीत गप्पाष्टक रंगवीत.

देशाच्या राजकारणाची दिशा काय आहे, राजकारण कोणतं वळण घेत आहे, या गोष्टी तिथल्या चर्चेतून कळत असत. त्याद़ृष्टीनं 1989 ते 1991 हा देशातील फार गतिशील काळ म्हणावा लागेल. अशा चर्चेकडे मी अभ्यासू द़ृष्टीनं पाहात असे. त्याचा उपयोग माझ्या ज्ञानात भर पडण्यासाठी होई तसेच अयोध्येतील राम मंदिर आंदोलन, त्यातून भाजपची चाललेली घोडदौड आणि केंद्रातील आघाडी सरकारची झालेली खिचडी असे असंख्य पैलू असलेला हा धामधुमीचा काळ. या सर्व घडामोडींचा मी साक्षीदार होतो आणि आहे.

या कालखंडात भारतीय राजकारणानं अनेक रंग पाहिले. शह-काटशह अनुभवले. गळ्यात गळे घालणार्‍यांनी एकमेकांचे गळे कापल्याचंही सार्‍या देशानं पाहिलं. खरं तर, याची सुरुवात 1977 च्या सत्तांतरापासूनच झालेली असली, तरी त्याला खरी गती मिळाली ती 1989 नंतरच. या काळातील राजकारणानं अवघ्या देशाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. राज्यकर्त्यांनी आपल्या निष्ठांना तिलांजली दिली.
1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजे 191 जागा मिळाल्या होत्या; पण निर्णायक बहुमत नव्हतं. परंतु, जनता दलाला 198, तर भाजपला केवळ 88 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तरीही काँग्रेसला सत्ता स्थापन करू द्यायची नाही, असा चंगच बांधून, जनता दलाला भाजप आणि डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा द्यायचं ठरवलं. मग नेता निवडीसाठी बैठक भरली. पंतप्रधानपदासाठी चंद्रशेखर उत्सुक होते आणि सकृतदर्शनी त्यांना पाठिंबा असल्याचं चित्रही दिसत होतं. परंतु, ‘दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं’, ही उक्ती काही खोटी नाही. चंद्रशेखर यांचीही अशीच फसगत झाली.

व्ही. पी. सिंग यांनी ऐनवेळी पलटी मारली. बैठक सुरू होताच त्यांनी नेतेपदासाठी देवीलाल यांचं नाव सुचवलं! मात्र, देवीलाल व्यासपीठावर आले आणि म्हणाले, “अहो, मी तर ताऊ आहे. काकाची भूमिका पार पाडणारा!” असं म्हणून त्यांनी चक्क व्ही. पी. सिंग यांचंच नाव जाहीर करून टाकलं. त्यावर प्रा. मधु दंडवते यांनी लगेचच व्ही. पी. सिंग यांची निवड झाल्याचं घोषित करून टाकलं. वस्तुतः हे सगळं आधीच शिजलं होतं आणि त्याची चंद्रशेखर यांना सूतरामही कल्पना नव्हती. व्ही. पी. सिंग यांनी पद्धतशीरपणे चंद्रशेखर यांना चकवा दिला. राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या व्ही. पी. सिंग यांनी एकप्रकारे राजकीय भ्रष्टाचारच केला, असं म्हणावं लागेल. परंतु, याच खेळीत भविष्यातल्या फाटाफुटीची बीजं रोवली गेली होती.

व्ही. पी. सिंग यांच्या तिरक्या चालीबद्दल पत्रकारांनी छेडले असता संतप्त झालेले चंद्रशेखर म्हणाले, “आधी एक ठरलं होतं. प्रत्यक्षात भलतंच घडलं. व्ही. पी. सिंग यांनी देवीलाल यांचं नाव सुचवलं. मी अनुमोदन दिलं. परंतु, देवीलालनी त्यावरही पाणी फिरवलं. माझी मात्र दिशाभूल केली!”

मग, दोन डिसेंबर रोजी व्ही. पी. सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि चमत्कार घडला. ‘मी आपला ताऊ म्हणूनच बरा आहे’ म्हणणार्‍या देवीलाल यांचा चक्क उपपंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. तेव्हा जनता दलातील दंडवते यांच्यापासून अनेक ज्येष्ठ नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. व्ही. पी. सिंग खर्‍या अर्थानं सर्वात मोठे खेळिया ठरले. त्यांची खेळी तर राजीवजींना बोफोर्स भूत उभं करून बदनाम करण्यापासूनच सुरू झाली होती आणि त्यांचा हा धूर्तपणा नियतीच्याही लक्षात आला नसावा!

‘सत्तेवर येणार्‍यांनी शहाणपण दाखवावे’, अशा शब्दांत आम्ही अग्रलेखातून या गोष्टींचा खरपूस समाचार घेतला आणि ही राजकारणातील अस्थैर्याची नांदी असल्याचं सूतोवाच केलं होतं. याबाबत सेंट्रल हॉलमधील वारं कोणत्या बाजूनं वाहतंय, याचाही मी वेळोवेळी मागोवा घेतला होता. त्यावरून हे सरकार फार काळ टिकणार नाही, याचा मला अंदाज आला होता आणि मी तो ‘पुढारी’तून मांडलाही होता. आमची ही दोन्ही अनुमानं बिनचूक ठरली!

भाजपनंही आता राम मंदिर प्रश्न ऐरणीवर आणला होता. या प्रश्नावर लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्राच काढली. व्ही. पी. सिंग यांच्यासाठी आता हे अवघड जागेचं दुखणंच झालं. त्यांच्या सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा असल्यामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली. या रथयात्रेला व्ही. पी. सिंग यांचा आशीर्वाद आहे, असा संदेश जनतेत जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तरीही आत्मघाती धाडस करून त्यांनी रथयात्रा अडवण्याचे आदेश दिले आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला.

बिहारमधील समस्तीपूर येथे ही रथयात्रा अडवण्यात आली. अडवाणी, प्रमोद महाजन या नेत्यांना अटक झाली आणि ठिणगी पडली. ती पडणारच होती. हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची मुळीच गरज नव्हती. भाजपनं तत्काळ व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सिंग सरकार अल्पमतात आलं. मग चंद्रशेखर यांनीही योग्य संधी पाहून बंडाचा झेंडा फडकावला. त्यांनी व्ही. पी. सिंग यांना पाठिंबा देणार नसल्याचं जाहीरच करून टाकलं. त्यापाठोपाठ देवीलालही उलटले. त्यांनीही व्ही. पी. सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दरम्यान, चंद्रशेखर राजीव गांधींना भेटले. राजीवजींनी चंद्रशेखरना पाठिंबा दिला. दुसर्‍याच दिवशी व्ही. पी. सिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठराव प्रचंड बहुमतानं फेटाळला गेला. केंद्रातील सरकारवरील विश्वासदर्शक ठराव नामंजूर होण्याचा हा भारतीय संसदीय इतिहासातील पहिलाच प्रसंग! वास्तविक आपलं सरकार अल्पमतात गेलं आहे, हे ठाऊक असूनही व्ही. पी. सिंग ठरावाला सामोरे गेले. त्याऐवजी राजीनामा देऊन बाजूला होणं जास्ती योग्य होतं. परंतु, आत्मघाती निर्णय घेण्यात व्ही. पी. यांचा हात कुणीही धरू शकत नव्हतं. त्यामुळेच संसदेत अविश्वास ओढवून घेऊन त्यांनी स्वतःच्या हातांनी स्वतःची नाचक्की करून घेतली.

व्ही. पी. गेले आणि पंतप्रधानपदी चंद्रशेखर आले. चंद्रशेखर यांच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या बँकेत सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली. त्यातच आखाती युद्धामुळे इंधन तेलाचे दर आकाशाला भिडले. महागाईच्या वणव्यात सारा देश होरपळून निघाला. त्याच दरम्यान मंडल आयोगाचा अहवाल खुला करण्यात आला. त्यातून अनेक राज्यांत जातीय दंगली उसळल्या. त्यात तीनशेहून अधिक लोकांचे बळी गेले. देशात बेबंदशाही माजली.

त्यातच भरीत भर म्हणून राजीव गांधी यांच्या ‘10 जनपथ’ निवासस्थानावरील पाळत प्रकरण उघडकीस आलं. गदारोळ झाला. चंद्रशेखर यांनी काँग्रेस नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत काँग्रेस नेते नव्हते. काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेणार, हे निश्चित झालं. मग मात्र चंद्रशेखर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि लोकसभा बरखास्त करण्याची राष्ट्रपतींना शिफारस केली. या सगळ्या सावळ्या गोंधळावर निवडणुका हाच पर्याय असल्याचं मत आम्हीही ‘पुढारी’तून मांडलं होतं आणि अखेर तसंच घडलं. देशात मुदतपूर्व निवडणूक जाहीर झाली. मे महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडणार होती.

काँग्रेसच्या मानेवर बोफोर्सचं भूत बसलं होतं. तर भाजपला राम मंदिरानं झपाटलं होतं. या सर्वात कसोटी होती, ती राजीव गांधी यांची. विरोधकांनी राजीव गांधींचा बोफोर्स प्रकरणाशी थेट संबंध जोडल्यामुळे त्यांच्याबाबत जनमत काय आहे, हे आता मतदानाच्या पेटीतूनच कळणार होतं.

तसं पाहिलं तर एक उमद्या मनाचं व्यक्तिमत्त्व म्हणून राजीव गांधींचा ठसा माझ्या मनावर होता आणि आजही आहे. राजीवजींनी देशात कॉम्प्युटर युग सुरू करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची कास पकडली. त्यासाठी त्यांच्यावर वारेमाप टीकाही झाली. मात्र, राजीवजी जराही डगमगले नाहीत. राजीवजी हे काळाची पावलं ओळखून वाटचाल करणारे नेते होते. ते माझ्या विनंतीला मान देऊन ‘पुढारी’च्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याला आले होते. त्यानंतर त्यांनी मला त्रिदेश दौर्‍यावरही नेलं होतं. साहजिकच माझे त्यांच्याशी जुळलेले ऋणानुंबंध वेगळेच होते. ते पुन्हा सत्तेवर आले असते, तर देशाचं चित्र नक्कीच बदललं असतं; पण नियतीच्या मनात काही वेगळंच शिजत होतं.
21 मे, 1991 ची रात्र. मी घरी निघण्याच्या तयारीत असतानाच टेलिप्रिंटर मशिनचा खडखडाट अचानक वाढला. मशिनची घंटी वाजू लागली. जेव्हा एखादी महत्त्वाची बातमी येऊ लागते, तेव्हा टेलिप्रिंटरची घंटी अशीच एकसारखी वाजत राहते. मी बातमी पाहिली आणि मला प्रचंड धक्का बसला! राजीव गांधी नावाच्या त्या राजस नेत्याचा घात झाला होता. सार्‍या देशावर झालेला हा वज्राघातच होता. अवघ्या सातच वर्षांपूर्वी इंदिराजींची हत्या झालेली. त्यापाठोपाठ या तरुण नेत्यावर काळाचा घाला पडल्यानं देश सुन्न, बधिर झाला.

खरं तर राजीव गांधी मोठ्या हिरिरीनं लोकसभेच्या प्रचारात उतरले होते. सुदैवानं त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत होता. तेवढ्यात दैवानं घाला घातला. त्या दिवशी ते तामिळनाडूतील श्रीपेरूम्बुदूर या गावी प्रचारासाठी गेले होते. ते तामिळनाडूतील एक महत्त्वाचं शहर. रात्री दहाची वेळ. राजीवजी झपझप पावलं टाकत व्यासपीठाकडे निघाले होते. गर्दीमध्ये एक तेनोमोझी राजरत्न तथा धानू नावाची महिला होती. धानू अगदी अचानकच राजीवजींच्या समोर आली. तिनं राजीवजींच्या गळ्यात एक भला मोठा पुष्पहार घातला. सस्मित मुखानं राजीवजी तिच्याकडे पाहात होते. तोच धानू त्यांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकली आणि – होत्याचं नव्हतं झालं! एक महाभयानक प्रचंड स्फोट झाला. क्षणभर सारं वातावरणच बधिर होऊन गेलं. जेव्हा लोक भानावर आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की त्यांचं सारं विश्वच उद्ध्वस्त झालं होतं. उमद्या राजबिंड्या, राजस राजीवजींचे केवळ छिन्नविच्छिन्न अवशेष तेवढे मागे उरले होते. सर्वत्र एकच हाहाकार उडाला!

राजीवजींचे प्राण हरण करणार्‍या त्या महास्फोटानं तिथं प्रचंड घबराट उडाली. थोड्या वेळात, जेव्हा सर्व जण भानावर आले, तेव्हा ‘राजीव एंगे, राजीव एंगे’ म्हणजेच ‘राजीव कुठे आहेत’ म्हणून लोकांचा आक्रोश सुरू झाला. काँग्रेस नेते जी. के. मूपनार यांनी राजीवजींचा मृतदेह शोधून काढला. त्यांच्या पायातील बुटांवरून त्यांची ओळख पटली.

टायगर ऑफ तामिळ ईलम (लिट्टे) या नावाच्या श्रीलंकेतील दहशतवादी संघटनेनं हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला होता. धानू ही आत्मघाती महिला त्या लिट्टेचीच हस्तक होती. त्या बॉम्बस्फोटात राजीव गांधींना हौतात्म्य प्राप्त झालं. देश एका उमद्या, तरुण नेतृत्वाला कायमचा मुकला. त्याचं दुःख शब्दातीत होतं.

गांधी कुटुंबावरील हा तिसरा आघात होता. प्रथम संजय, मग इंदिराजी आणि आता राजीवजी! गांधी कुटुंबीयांनी अत्यंत धीरोदात्तपणे हा आघात सहन केला. आपल्या मातोश्रीप्रमाणेच राजीवजींनाही आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का, असाही प्रश्न पडतो. इंदिराजींनी निधनाच्या आदल्या दिवशीच त्यांच्या भाषणातून तसं सूचित केलं होतं. घातपातापूर्वी राजीवजी पत्रकारांशी बोलत होते. अत्यंत उत्साहानं उत्तरं देत होते. “या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार होईल, असं मी म्हटलं होतं आणि आता ते खरं होताना दिसत आहे.”
तेव्हा राजीवजींच्या मुखानं नियतीच तर बोलत नव्हती ना? ते काही असो; पण राजीव गांधी यांचा मृत्यू काळजाला घरं पाडणारा होता, हे मात्र नक्की! अत्यंत जड अंतःकरणानं त्यांचा छिन्नविच्छिन्न देह हवाई दलाच्या विमानानं नवी दिल्लीला आणण्यात आला. ‘तिसर्‍या गांधींची हत्या’ या शब्दांत राजीवजींच्या कारकिर्दीवर आणि त्यांच्या भीषण हत्येवर अग्रलेखातून प्रकाश टाकताना आम्हाला अतोनात यातना होत होत्या. देशात अराजकवादी आणि दहशतवादी शक्ती फोफावत असल्याचंही आम्ही त्या अग्रलेखातून निदर्शनास आणलं होतं. राजीवजींनी देशाला स्थिर सरकार दिले असते यात संशय नव्हता; पण असे स्थिर सरकार येऊ नये, यासाठी काही शक्तींची खटपट सुरू होती. त्या शक्तींचा या घातपातामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

राजीवजी ‘पुढारी’च्या सुवर्ण महोत्सवाला आले होते. त्रिदेश दौर्‍यात आमच्यातील स्नेहसंबंध अधिकच द़ृढ झाले होते. त्यांच्या निधनानं एक चैतन्य लुप्त झालं. आमचं एक आदराचं आणि जिव्हाळ्याचं स्थान नाहीसं झालं. आमच्यासाठी हे दुःख फार मोठं होतं. राजीवजी आणि माझ्यामध्ये एक आंतरिक जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यांच्या जाण्यानं घरातलंच कुणीतरी गेल्याचा शोक मला झाला. अत्यंत जड अंतःकरणानं मी त्यांच्या अंत्यविधीसाठी दिल्लीला गेलो.

24 मे रोजी शक्तिस्थळ येथे राजीवजींच्या पार्थिवावर त्यांचे पुत्र राहुल यांनी अंत्यसंस्कार केले. सूर्य अस्ताला जात असतानाच देशाचा एक उमदा, चमकता तारा पंचत्वात विलीन झाला, तेव्हा जनसागराच्या अश्रूंचा बांध फुटला. सोनियाजी मूळच्या इटालियन; पण राजीवजींची धर्मपत्नी म्हणून त्या भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या. हा आघात त्यांनी धीरोदात्तपणे पचवला. शुभ्र साडी परिधान केलेल्या सोनियाजी अत्यंत संयमानं या शोकप्रसंगाला सामोर्‍या गेल्या. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह साठहून अधिक देशांचे प्रमुख आणि सर्वपक्षीय नेते यांनी या त्यांच्या लाडक्या दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. एक पर्व समाप्त झालं.

राजीवजींच्या अकस्मात निधनानं लोकसभा निवडणुकीचे पुढील दोन टप्पे लांबणीवर पडले. काँग्रेसचे पक्षाध्यक्षपद रिकामे झाले. ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली. परंतु, त्यांनी ठामपणे नकार दिला. सोनियाजींच्या नकारानंतर अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली. कुरघोड्यांना ऊत आला. त्यातच शरद पवार यांनी सामुदायिक नेतृत्वाची कल्पना मांडली. चंद्रशेखरना पक्षात परत आणण्याचीही त्यांची खटपट चालू होती.

परंतु, अर्जुनसिंग यांनी हा बेत उधळला. पक्षाच्या विघटनासाठी काही व्यक्ती, काही शक्ती यांचं कटकारस्थान चाललेलं आहे. आम्ही या खटाटोपाचा सामुदायिकपणे प्रतिकार करू, असं निवेदनच त्यांनी काढलं. अनेकांनी तर गुडघ्यालाच बाशिंग बांधलं होतं. ‘भवति न भवति’ होऊन शेवटी पी. व्ही. नरसिंह राव यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली.

राजीवजींच्या निधनानं निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा काँग्रेस पक्षाला फायदा झाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. संसदीय पक्षनेते पदासाठी निवडणूक होऊन नरसिंह राव यांनी शरद पवारांचा पराभव केला. सुरेश कलमाडी यांनी पवारांची मोहीम राबवली होती. मात्र, नरसिंह राव प्रचंड मतांनी निवडून आले. नरसिंह राव यांनी काही रचनात्मक सुधारणा घडवून आणल्या. अर्थमंत्री म्हणून त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली. सिंग हे अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर. त्यांनी देशात आर्थिक सुधारणा आणल्या. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा, तिला गती देण्याचा प्रयत्न केला. राव यांनीही आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. त्यांच्यानंतर मात्र देशात राजकीय अस्थैर्य सुरू झाले.

पक्षांतर्गत गदारोळ संपला आणि राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील अनेक मुद्दे पुढे येऊ लागले. इंदिराजींच्या हत्येवेळी गुप्तचर यंत्रणांचं अपयश ढळढळीतपणे पुढे आलं होतं. राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातही इतिहासाची पुनरावृत्ती झाली. लिबरेशन टायगर ऑफ तामिळ ईलम तथा ‘लिट्टे’ या दहतशवादी संघटनेच्या हिट लिस्टवर राजीव गांधी होते. श्रीलंकेत शांतिसेना पाठवल्यामुळे त्यांचा राजीव गांधींवर राग होता. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी झाली, तेव्हा सुनावणीत राजीव गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळेच त्यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष न्यायालयानं काढला. ‘संडे’ नावाच्या मासिकात ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती.

राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यास, ते पुन्हा श्रीलंकेत शांतिसेना पाठवू शकतात, असं वाटल्यामुळेच ‘लिट्टे’नं त्यांच्या हत्येचा कट रचला आणि तो प्रत्यक्षात उतरवला, अशी शक्यता नाकारता येत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं. ज्या पद्धतीनं रिमोटचा वापर करून स्फोट घडवण्यात आला, ती पद्धत लिट्टेचीच होती. ‘आत्मघाती बॉम्ब’ची कल्पनाही त्यांचीच होती.

‘लिट्टे’नं तामिळनाडूत आपलं जाळं पसरलं होतं. तत्कालीन तामिळनाडू सरकारलाही ‘लिट्टे’विषयी सहानुभूती होती. त्यामुळेच ते भारतात हातपाय पसरू शकले. गुप्तचर यंत्रणेला या हालचालींची कल्पना येऊ नये, ही किती दुर्दैवाची गोष्ट. त्यातून राजीव गांधी यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्या. जे. एस. वर्मा यांची समिती नेमण्यात आली. त्या समितीनं उत्साही कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळेच हा प्रसंग ओढवला असल्याचा निष्कर्ष काढला. सीबीआयच्या विशेष शोधपथकानं धागेदोरे शोधून काढले. त्यात ‘लिट्टे’नंच ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं.

या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्या. जैन यांचा आयोगही नेमण्यात आला होता. वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांच्यावरही आयोगाचा रोख होता. आता हे चंद्रास्वामी कोण? तर ते चंद्रशेखर यांचे निकटवर्ती. सगळाच संशयकल्लोळ होता. याप्रकरणी पुढे काही हालचाल झाली नाही. मात्र मुरुगन, नलिनी, शिवरासन आणि सुब्बा या ‘लिट्टे’च्या हस्तकांना अटक करण्यात आली. खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षाही झाली. मारेकर्‍यांच्या राहण्याची व्यवस्था जयकुमारनं केली होती, तर रवीचंद्रन यानं पैशाचा पुरवठा केला होता, हेही तपासाअंती उघडकीस आलं आणि त्या दोघांनाही तुरुंगवासाची शिक्षा झाली. तसेच देशातील एक बडे राजकीय प्रस्थ या घडामोडीसाठी आर्थिक जोडणी करीत होते, अशीही चर्चा होत होती. परंतु, इतकं होऊनही यामागचा खरा ‘ब्रेन’ कोण, हे काही शेवटपर्यंत उघडकीस आलं नाही.
काही झालं, तरी आता राजीवजी काही परत येणार नव्हते. एका द्रष्ट्या नेत्याची आणि माझ्याशी जवळिकीचं नातं निर्माण झालेल्या एका सुहृदाची अचानक झालेली एक्झिट जीवाला चटका लावणारीच होती.

या ठिकाणी जाता जाता एक रूपक कथा उद्धृत करावी वाटते. एक सिंह असतो. अर्थातच तो एका जंगलाचा राजा असतो. तो राज्यकारभार उत्तमप्रकारे चालवीत असतो. मात्र, जंगलातील लांडग्या, कोल्ह्यांना त्याची असूया वाटते. सिंह जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपल्याला राजा व्हायची संधी कधीच मिळणार नाही, असं त्यांना वाटतं.

मग ते सारे मिळून एक सापळा रचतात. सिंह त्यात अडकतो. सगळे लांडगे, कोल्हे मग त्या सिंहाला मारून टाकतात. सिंह बिचारा मरून जातो; पण आता राजा मी होणार की तू, या भांडणात लांडगे, कोल्हेही एकमेकांत लढून मरतात! जंगलाला मात्र परत राजा मिळत नाही. जंगल बिचारं पोरकं होतं!
राजीव गांधींना ही रूपक कथा तंतोतंत लागू पडते.

Back to top button