Wipro layoffs | ‘विप्रो’चा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ, कारण आले समोर | पुढारी

Wipro layoffs | 'विप्रो'चा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ, कारण आले समोर

पुढारी ऑनलाईन; देशातील महत्त्वाची तंत्रज्ञान आणि आयटी सल्लागार सेवा कंपनी विप्रोने (Wipro) नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. विप्रो त्यांच्या नफ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणून ऑनसाइट ‘शेकडो’ मिड-लेव्हल कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

भारतातील चार सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांमध्ये विप्रोचे मार्जिन सर्वात कमी आहे. डिसेंबर तिमाहीत त्यांचे मार्जिन १६ टक्क्यांवर आले. टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services), इन्फोसिस (Infosys) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीस (HCL Technologies) ने अनुक्रमे २५ टक्के, २०.५ टक्के आणि १९.८ टक्के मार्जिन नोंदवले.

नोकरकपातीची माहिती देणाऱ्या सूत्रांनी म्हटले आहे की, “या महिन्याच्या सुरुवातीला प्रभावित कर्मचाऱ्यांना सूचना पाठवण्यास सुरुवात झाली होती. ऑनसाइट शेकडो मिड-लेव्हल एक्झिक्युटिव्ह्सना जबाबदारीतून मुक्त केले जात आहे.”

विप्रोने २०२१ मध्ये कॅप्को सल्लागार कंपनी १.४५ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतली होती. पण कोरोनानंतरच्या काळात वृद्धीत घट झाली आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदावली. ग्राहकांनी खर्च कमी केल्याने आयटी सेवा सल्लागार व्यवसायही मंदावला.

दुसऱ्या स्त्रोताने सांगितले की हा ‘लेफ्ट-शिफ्ट’ धोरणाचा एक भाग आहे. “लेव्हल ३ कर्मचाऱ्यांचे काम लेव्हल २ कर्मचाऱ्याकडे सोपवले जाते. ज्याला योग्य साधने दिली जातात. लेव्हल १ कर्मचारी लेव्हल २ चे काम करतो आणि लेव्हल १ कर्मचाऱ्यांचे काम स्वयंचलित असते.” (Wipro)

विप्रोच्या मुख्य वित्तीय अधिकारी अपर्णा अय्यर यांच्याकडे चालू तिमाहीत नफ्यात सुधारणा करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचेही सुत्रानी म्हटले आहे.

दरम्यान, विप्रोच्या प्रवक्त्याने नोकरकपातीच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. पण बदलत्या बाजारातील वातावरणाशी व्यवसाय आणि प्रतिभा संरेखित करणे हा कंपनीच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button