अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्न)

  • गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे 219.20 अंक व 722.98 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 21352.6 अंक व 70700.67 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.02 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.01 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. निफ्टी व सेन्सेक्समध्ये सलग दुसर्‍या आठवड्यात पडझड बघायला मिळाली. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारात सातत्याने विक्री केल्याने ही पडझड बघायला मिळाली. मागील 7 सत्रांचा विचार करता परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 4 अब्ज डॉलर्सची (सुमारे 35 हजार कोटींची) विक्री केली. अमरिकेतील व्याज दर तूर्तास तरी गतीने खाली येणार नसल्याने तेथील रोखे भाव (बाँड यील्ड) वाढली आणि अधिक परताव्याच्या आशेने परदेशी गुंतवणूकदारांनी विकसनशील अर्थव्यवस्थेमधील भांडवल बाजारात विक्रीचा सपाटा चालू ठेवला. सप्ताहात सर्वाधिक घट होणार्‍या समभागामध्ये पेंटस् (-6.8 टक्के), इंडसिंड बँकर (-6.3 टक्के), अ‍ॅक्सिस बँक (-5 टक्के), एचडीएफसी लाईफ (-4.7 टक्के), एचयूएल (-4.7 टक्के) या कंपन्यांचा समावेश होतो. सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये (7.3 टक्के), भारती एअरटेल (6.8 टक्के), एनटीपीसी (5.2 टक्के), पॉवरग्रीड (5.2 टक्के), कोल इंडिया (3.7 टक्के) यांचा समावेश होतो.
  • मनोरंजन क्षेत्रात मोठी घडामोडी या सप्ताहात पाहण्यास मिळाली. झी आणि सोनी या दोन कंपन्यांचे होणारे एकत्रीकरण (चशीसशी) अखेर रद्द झाले. सुमारे 10 अब्ज डॉलर्सचा (85 हजार कोटींचा) करार बासनात गुंडाळला गेला. एकत्रित होणार्‍या कंपनीचा प्रमुख हे सोनी कंपनीचा कर्मचारी एन. पी. सिंग असावेत असे ‘सोनी’चे मत होते. झी कंपनीला या एकत्रीकरणपश्चात कंपनीचे प्रमुख पुनीत गोएंका असावेत असे वाटत होते. पुनीत गोएंका हे झी समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा यांचे पुत्र असून या एका गोष्टीवर एकमत न झाल्याने हा करार तुटला. करार तोडल्याबद्दल सोनी कंपनीने झी ला 90 दशलक्ष डॉलर्स (750 कोटी रुपये) भरपाईची नोटीस पाठवली. याविरोधात झी कंपनीने राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे (एनसीएसटी) दाद मागितली. हा करार तुटल्यानंतर आणखी एक झी आणि डिस्ने स्टारमधील 1.5 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 13 हजार कोटी) करारदेखील रद्द झाला. 2024 ते 2027 दरम्यानच्या आयसीसी क्रिकेट सामने प्रक्षेपित करण्यासंबंधीचा हा करार होता.
  • ऑनलाईन शिक्षण सेवा पुरवणारी स्टार्ट अप कंपनी बायजूजचा आर्थिक वर्ष 2022 चा तोटा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 80 टक्क्यांनी वधारून 8,245 कोटींवर पोहोचला. तब्बल 22 महिन्यांच्या विलंबनाने कंपनीचे निकाल जाहीर झाले. यामधील सुमारे 45 टक्के तोटा (सुमारे 3800 कोटी) अधिग्रहण केलेल्या व्हाईट हॅट ज्युनिअर आणि ओस्मो यासारख्या उपकंपन्यांकडून झाला आहे. कंपनीचा महसूल 118 टक्क्यांनी वाढून 5,298 कोटी झाला. परदेशी कर्जदारांकडून बायजूजने मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे. यामधील फ्रान्सच्या टेलिपरफॉर्मन्स या कर्जदात्याने (ङरपवशी) कर्ज थकबाकी विरोधात दिवाळखोरीसाठी बायजूजची दिवाळखोरी याचिका राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) दाखल केली. सुमारे 1.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज थकवल्याप्रकरणी भारतासह अमेरिकेच्या न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालय तसेच सिंगापूरचे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्येदेखील खटले चालू आहेत.
  • देशातील महत्त्वाची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोचा चालू आर्थिक वर्षाचा तिसर्‍या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 37 टक्के वधारून 2,042 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 30 टक्के वधारून 12,165 कोटी झाला. नेट प्रॉफीट मार्जिन 15.8 टक्क्यांवरून 16.7 टक्के झाला.
  • देशातील महत्त्वाची पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टीलचा तिसर्‍या तिमाहीचा निव्वळ नफा 513 कोटींवर पोहोचला. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 2,224 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. कंपनीच्या महसुलात 3.1 टक्क्यांची घट होऊन महसूल 57,084 कोटींवरून 55,312 कोटी झाला.
  • सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवरील आयात कर वाढवला. सोन्यावरील आयात कर 10 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर नेण्यात आला. नुकतेच ऑक्टोबर महिन्यात सोन्याची आयात तब्बल 95 टक्के वाढून 7.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे भारताची व्यापारतूट वाढली. डिसेंबर महिन्यात पुन्हा सोन्याची आयात 156 टक्क्यांनी वाढून 3.03 अब्ज झाली. त्यामुळे आयात कमी करण्यासाठी आयात कर वाढवण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
  • देशातील महत्त्वाची खासगी बँक अ‍ॅक्सिस बँकचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 4 टक्के वधारून 6,071 कोटी झाला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 9 टक्के वधारून 12,532 कोटी झाले. तसेच नेट इंटरेस्ट मार्जिन 4.26 टक्क्यांवरून 4.01 टक्के झाले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 2.38 टक्क्यांवरून 1.58 टक्के झाले, तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.47 टक्क्यांवरून 0.36 टक्क्यांपर्यंत खाली आले.
  • जिंदाल समूहाची महत्त्वाची कंपनी जेएसडब्लू स्टीचा तिसर्‍या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 5 पटींनी वाढून 490 कोटींवरून 2,415 कोटी झाला. कंपनीचा महसूल 7.2 टक्क्यांवरून 419.40 कोटी झाला. नेट प्रॉफिट मार्जिन 1.25 टक्क्यांवरून थेट 5.76 टक्क्यांवर पोहोचले. कंपनीच्या संचालक मंडळाने व्यवसाय विस्तारासाठी 2 हजार कोटींचा निधी उभारण्यास संमती दिली.
  • नुकतेच आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरलेली टाटा टेक कंपनीचा तिसर्‍या तिमाहीचा निव्वळ नफा 14.7 टक्के वधारून 170 कोटी झाला. कंपनीचा महसूल मागील तिमाहीच्या तुलनेत 1.6 टक्के वधारून 1,289 कोटींवर पोहोचला.
  • महत्त्वाची सरकारी बँक पीएनबीचा तिसर्‍या तिमाहीचा निव्वळ नफा तब्बल तीन पटींनी वाढून 2,223 कोटी झाला. मिळवलेले व्याज आणि वितरित केलेले व्याज यातील फरक म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम 12.1 टक्के वधारून 10,293 कोटी झाले. यावर्षी कर्ज वाटपात 12 ते 13 टक्क्यांची वाढ बँकेला अपेक्षित आहे. बँकेचे एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 9.76 टक्क्यांवरून थेट 6.24 टक्क्यांवर आले. निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाणदेखील 2.34 टक्क्यांनी घटून 0.96 टक्के झाले.
  • आयटी क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्राचा तिसर्‍या तिमाहीचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 3.6 टक्के वधारून 524 कोटी झाला. कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 1.8 टक्के वधारून 13,101 कोटी झाला.
  • विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी आपल्या मुलांना (रशीद आणि तारिक) प्रत्येकी 1 कोटी समभाग भेट स्वरूपात दिले. 1 कोटी समभागांचे मूल्य सध्या 500 कोटींच्या जवळपास आहे. अझीम प्रेमजींकडे सध्या विप्रोचे एकूण 215.5 दशलक्ष (21.5 कोटी) समभाग आहेत.
  • 19 जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेशी चलन गंगाजळी 2.79 अब्ज डॉलर्सनी घटून 616.14 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button