Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ३६७ अंकांनी वाढून बंद, ‘या’ स्टॉक्समधील तेजीमुळे बाजारात उत्साह | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ३६७ अंकांनी वाढून बंद, 'या' स्टॉक्समधील तेजीमुळे बाजारात उत्साह

पुढारी ऑनलाईन : आशियासह आज भारतीय शेअर बाजारात आज तेजी राहिली. सुरुवातीला सपाट झालेला सेन्सेक्स आज ‍वधारुन बंद झाला. सेन्सेक्स ३६७ अंकांनी वाढून ६६,५२७ वर बंद झाला. तर निफ्टी १०७ अंकांच्या वाढीसह १९,७५३ वर स्थिरावला. बाजारात आज खालच्या स्तरावरुन जोरदार रिकव्हरी दिसून आली. विशेषतः आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, मेटल स्टॉक्सनी बाजारात उत्साह आणला. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, ऑईल आणि गॅस, पॉवर, मेटल, कॅपिटल गुड्स आणि आयटी १ ते २ टक्क्यांनी वधारले, तर एफएमसीजी निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. (Stock Market Closing Bell)

‘हे’ शेअर्स वधारले

सेन्सेक्स आज ६६,१५६ वर खुला झाला होता. तो ६६,५८१ पर्यंत वाढला. आजच्या व्यवहारात काहीवेळ तो ६६ हजारांच्या खालीही घसरला. पण त्याने तोटा मागे टाकत पुन्हा झेप घेत ४०० अंकांची वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर एनटीपीसी हा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर सुमारे ४ टक्के वाढून २१८ रुपयांवर पोहोचला. पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, टाटा स्टील, टीसीएस, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, टाटा मोटर्स, एलटी, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस हे शेअर्स वाढले. तर बजाज फायनान्स, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले.

sensex closed 367 points higher

जेट एअरवेजचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये

डीजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र नूतनीकरण झाल्यानंतर जेट एअरवेजचे शेअर्स (Jet Airways shares) बीएसईवर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये पोहोचले. हा शेअर आज सुमारे ५ टक्के वाढून ५१ रुपयांवर गेला. नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) यांनी 28 जुलै रोजी १९ मे २०२३ रोजी कालबाह्य झालेले एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) पुन्हा जारी केले. २० मे २०२२ रोजी DGCA कडून AOC मिळाल्यानंतर जेट एअरवेज एअरलाइनने ऑपरेशन सुरू केले नव्हते, असे PTI ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. ज्यावेळी एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव वाढतो त्यावेळी त्याला अप्पर सर्किट लावले जाते.

बायबॅकच्या घोषणेनंतर पिरामलचे शेअर्स घसरले

बीएसईवर पिरामल एंटरप्रायझेसचे शेअर्स (Shares of Piramal Enterprises) ८ टक्के घसरून ९८६ रुपयांवर आले. पिरामल एंटरप्रायझेसने जून तिमाहीची कमाई आणि १,७५० कोटी शेअर्सच्या बायबॅकची घोषणा केल्यानंतर त्यांचे शेअर्स घसरले आहेत. जून तिमाहीत कंपनीने ५०८.७८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत ८,१५५ कोटी रुपये होता. कंपनीच्या बोर्डाने १ कोटी ४० लाख शेअर्सच्या दर्शनी मूल्य प्रत्येकी १० रुपये प्रमाणे शेअर्सच्या बायबॅकला मंजूरी दिली आहे. त्यांनी बायबॅक शेअर्सची किंमत १,२५० रुपये निश्चित केली आहे.

आशियाई बाजारात तेजी

बँक ऑफ जपानच्या अचानक धोरणात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आशियाई बाजारात तेजी राहिली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.५४ टक्के वाढला. या निर्देशांकाने आज चार आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.६३ टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग १.४४ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ आधारावर १,०२४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सच्या विक्री केली. तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,६३४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button