Air Travel : हवाई प्रवासाला ‘अच्छे दिन’ | पुढारी

Air Travel : हवाई प्रवासाला ‘अच्छे दिन’

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अनुत्पादित कर्जात खूप मोठी घट झाली आहे. स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बँकांच्या बुडीत कर्जाच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. या कालावधीत सार्वजनिक बँकांचा नक्त नफा 65 टक्क्यांनी वाढून तो 29,175 कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच काळातल्या नफ्याशी तुलना करता बँक ऑफ महाराष्ट्रचा नफा 139 टक्क्यांनी वाढला आहे. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँकेची बुडीत कर्जे (एनपीए) अनुक्रमे 2.94 टक्के आणि 3.14 टक्क्यांवर पोहोचली आहेत. या दोन्ही बँकांची निव्वळ बुडीत कर्जे नाममात्र म्हणजे अनुक्रमे 0.47 टक्के आणि 0.77 टक्के झाली आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी माझी कारकीर्द 16 ऑगस्ट 1947 ला सुरू केली. विविध पदांवर कामाचा अनुभव घेतल्यानंतर केंद्र सरकारने माझी नेमणूक अध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणून 1977 ते 1983 सप्टेंबरअखेर केली. माझ्या बँकेची ही घोडदौड बघता मला अत्यंत आनंद होत आहे.

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर अभारतीय, पोर्तुगीज वगैरे शत्रुराष्ट्र गणली गेली. शत्रूंच्या संपत्तीच्या विक्रीतून केंद्र सरकारच्या तिजोरीत 3400 कोटी रुपयांची भर पडली होती.

फाळणीच्या वेळी जे नागरिक देश सोडून गेले तसेच 1962 व 1965 च्या युद्धानंतर ज्यांनी पाकिस्तान व चीनचे नागरिकत्व स्वीकारले त्यांचीही संपत्ती म्हणजेच शत्रू संपत्ती म्हणून ओळखली गेली. देशातील अशा संपत्तीचे नियमन करणार्‍या संस्थेने शत्रू संपत्तीची विक्री करून एकूण 3,407 कोटी रुपयांची भर घातली आहे.

शत्रू संपत्ती अधिनियम 1968 नुसार जानेवारी 2021 मध्ये ग्रह मंत्रालयाने 1699 ग्रॅम सोन्याची विक्री करून सुमारे 49 लाख 15 हजार रुपयांची तिजोरीत भर टाकली. शिवाय सुमारे 29 किलो चांदीची सुमारे 11 लाख रुपयांची विक्री केली. केंद्र सरकारने आतापर्यंत शत्रू संपत्तीतील केवळ जंगम संपत्तीचीच विक्री केली आहे. पाकिस्तान आणि चीनने नागरिकत्व घेतलेल्यांनी एकूण 12,611 मालमत्तांवर तुळशीपत्र ठेवले आहे. त्यापैकी 12 मालमत्ता पाकिस्तानी आणि 126 मालमत्ता चिनी नागरिकांशी संबंधित आहेत.

नागरिकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे व प्रवासाचा वेळ वाचत असल्यामुळे नागरिक हवाई प्रवास करण्याकडे वळले आहेत. परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. (विशेषत: अमेरिका) तसेच पर्यटनाची वृत्तीही वाढत आहे. त्यामुळेच एअर इंडिया (सलाम महाराजा) कामाचा विस्तार करण्यासाठी एकूण 470 नवी विमाने खरेदी करणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षित वैमानिकही लागणार आहेत. त्यामुळे महत्त्वाकांक्षी तरुणांनी एनडीएमध्ये प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे. त्यातून खूप मोठी संधी तरुण-तरुणींना मिळेल.

विमान खरेदीसाठी लागणारी मोठी रक्कम बँकांकडूनच घेतली जाईल. म्हणजेच याचा फायदा बँकांनाही होईल.
राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात नॅशनल स्टॉक एक्चेंजवर सोशल स्टॉक एक्स्चेंज अर्थात एसएसई ची स्थापना करण्यास ‘सेबी’ने मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 2019-20 च्या अर्थसंकल्पात एसएसईच्या स्थापनेचे संकेत दिले होते. एसएसई हा राष्ट्रीय शेअर बाजाराचाच एक भाग असेल. या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना आणि संघटनांना खुल्या बाजारातून निधी गोळा करण्यास मदत होईल. कालांतराने या क्षेत्रात येणार्‍या नव्या नव्या कंपन्यांचा ‘चकाकते हिरे’ म्हणून उल्लेख करता येईल. गुंतवणुकदारांसाठी आता, ‘अनंत हस्ते कमलावराने। देता किती घेशील दो कराने’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

डॉ. वसंत पटवर्धन 

Back to top button